Plastic Plates Can Increase Microplastic: आपल्या रोजच्या वापरात प्लास्टिकच्या वस्तू असतातच. अगदी पाण्याच्या बाटल्यांपासून ते जेवणाच्या प्लेट्स, प्लास्टिकने गुंडाळलेले बाहेरचे अन्नपदार्थ आणि हवेत तरंगणारे हजारो सूक्ष्म प्लास्टिक कण आपल्या श्वासाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात. प्लास्टिकचे कण शरीरात गेल्यावर रक्तात, फुप्फुसात, लिव्हरमध्ये, किडनीमध्ये आणि मेंदूमध्ये सगळीकडे जमा होऊ शकतात. या धोकादायक कणांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने आणि योग्य स्वच्छतेचा अभाव यामुळे अनेक आजार होऊ शकतात.
मायक्रोप्लास्टिकमुळे होणारे आजार
मायक्रोप्लास्टिक्समुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांची शक्यता अनेक अभ्यासातून दिसून आली आहे. यामध्ये श्वसनाच्या समस्या, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजार, रिप्रोडक्टिव्ह समस्या, ब्रेन डॅमेज, लिव्हर डॅमेज आणि अगदी कॅन्सरचाही समावेश आहे.
तज्ज्ञ काय सांगतात?
तज्ज्ञ सांगतात की, पाण्याच्या बाटल्यांपासून ते समुद्री मीठापर्यंत प्रत्येक गोष्टीत प्लास्टिकचे अगदी सूक्ष्म कण असतात. मात्र, नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की, शरीराकडे हा कचरा साफ करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे आणि यासाठी आहारात फायबरची जास्तीत जास्त आवश्यकता आहे.
आहारात फायबरचे प्रमाण
तज्ज्ञ सल्ला देतात की, तुमच्या शरीरातील हे विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी तुम्ही जास्त फायबर खाणे गरजेचे आहे. आपल्या हे तर माहीतच आहे की पुरेशा प्रमाणात फायबरचे सेवन केल्यास पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते, कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि निरोगी आतड्यांमधील बॅक्टेरियाची वाढ होण्यास मदत होते. चीनमधील हेनान विद्यापीठातील संशोधकांनी आता हे सिद्ध केले आहे की, फायबर शरीरातून मायक्रोप्लास्टिक काढून टाकण्यास देखील मदत करते.
फायबर शरीरात पचत नाही. यामुळे ते आतड्यांमधील मायक्रोप्लास्टिकशी बांधले जाते. त्यामुळे ते रक्तप्रवाहात शोषले जात नाही. ते मायक्रोप्लास्टिकमुळे होणाऱ्या जळजळीपासून देखील संरक्षण करते आणि आतड्याच्या अस्तरांना आधार देते.
फायबरयुक्त पदार्थ
तज्ज्ञ सांगतात की, तुम्हाला वनस्पतीजन्य पदार्थांमधून फायबर मिळू शकते. यासाठी तुम्ही भाज्या, फळे, मशरूम, बीन्स, डाळी, संपूर्ण धान्य, बिया आणि काजू खाऊ शकता. ओट्स, अळशीच्या बिया आणि सफरचंद यापासून विरघळणारे फायबर मिळते. तसंच पाण्याने तुमचे शरीर हायड्रेट ठेवा.
