बैठ्या आणि व्यायामविरहित जीवनशैलीमुळे वजन वाढणं ही समस्या बळावली आहे. आपला आहार चौरस असावा. पण वाढत्या वजनाची चिंता असेल तर नक्की कुठल्या भाज्या खाव्यात हे जाणून घेऊया. त्याचवेळी लोकप्रिय सदरात न मोडणाऱ्या पण शरीरासाठी फायदेशीर भाज्यांची महती जाणून घेऊया.

भेंडी

भेंडी नुसतीच पथ्यकारक भाजी नसून शुक्रवर्धक आहे. भेंडीचे ब्राह्मणप्रिय असे वर्णन केले जाते. सुलक्षणी ललनांच्या सुंदर बोटांसारखी मऊ लुसलुशीत म्हणून ‘लेडिज फिंगर’ असे इंग्रजी नाव आहे. आहारात अशी कोवळी मऊ, हिरवी, लुसलुशीत भेंडीच हवी. शरीरातील सार्वत्रिक दाह, गलगंड, आवाज बसणे, रुक्ष त्वचा, मलावरोध, खडा होणे, स्वप्नदोष, दीर्घ आजारातील दुबळेपणा याकरिता भेंडी उत्तम आहार आहे. ताकाबरोबर भेंडी बाधत नाही. मूतखडा, जुलाब या विकारांत भेंडी खाऊ नये.

भोपळी मिरची

भोपळी मिरची ही फार औषधी उपयोगाची नव्हे पण मेदस्वी, मधुमेह, कृमी विकारग्रस्तांकरिता उपयुक्त आहे. ज्यांना तिखटाशिवाय चालत नाही. पण खाऊन मूळव्याध, पोटात आग पडणे, भगंदर इत्यादी त्रास आहे. त्यांनी नेहमीच्या मिरचीऐवजी भोपळी मिरची खावी. भोपळी मिरचीमुळे तोंडाला चव येते. भोपळी मिरचीबरोबर बटाटा, टोमॅटो वापरावा म्हणजे त्रास होत नाही. आम्लपित्त, उन्हाळी लागणे, पोटदुखी, अल्सर, वारंवार खाज सुटणे विकारांत भोपळी मिरची वर्ज्य करावी. भोपळ्या मिरचीचे पंचामृत एक उत्तम तोंडी लावणे आहे.

रताळे

रताळे, रक्ताळू या नावाने मिळणारे कंद उपवासापुरतेच वापरले जातात. रताळे बटाट्यासारखेच उत्तम पूरक अन्न आहे. बटाट्यापेक्षा काही चांगले गुण रताळ्यांत आहेत. रताळे मधुर, वृष्य, गुरू व स्निग्ध आहे. रताळ्यापासून उत्तम दारू बनवतात. रताळ्याचे पीठ व साखर सर्व सामान्यांकरिता सोपे टॉनिक आहे. कृश व्यक्तीच्या दाह या विकारात रताळे उकडून खावे. लगेच आराम पडतो. लघवी कष्टाने होणे, अडखळत होणे, त्यामुळे शरीरात सूज येणे. या तक्रारीत रताळ्याच्या चांगल्या तुपावर परतलेल्या फोडी किंवा उकडलेले या स्वरुपात वापर करावा. पोटात वायू धरण्याची खोड असणाऱ्यांनी, मधुमेही रुग्णांनी रताळे खाऊ नये. अकाली ताकद गमावलेल्यांनी शुक्र धातू वाढविण्याकरिता रताळी खावी. ज्यांचा अग्नी चांगला आहे त्यांच्याकरिता एकादशी, चतुर्थी, गुरुवार, शनिवार, महाशिवरात्र इ. पवित्र दिवशी, शेंगदाण्याचे कूट, उकडून बटाटा व रताळी, साबुदाणा व शिंगाड्याचे पीठ व सुरण किसून एकत्रित थालीपीठ पुण्यही देते, तसेच ते उत्तम ताकदीचे पोटभरू अन्न आहे.

वांगे

वांगे हे फळ औषधी गुणांचे आहे. यावर सर्वसामान्य जनांचा विश्वास बसणार नाही. हल्ली स्टेरॉईड औषधांचे बंड खूप माजले आहे. शरीरात एकदम जोम आणण्याकरिता, रोगाला लगेच आवर घालण्याकरिता स्टेरॉईड असलेली औषधे घेतली जातात. अ‍ॅथलिट, मैदानी खेळ खेळणारे खेळाडू याच घटकद्रव्यांचा गैरवाजवी उपयोग करीत असलेल्या कथा आपण ऐकतो. वांगे या फळाच्या फॅमिलीत नैसर्गिक स्टेरॉईड आहेत. थोड्याशा श्रमाने थकवा येऊ नये, शरीर सक्षम व्हावे म्हणून कोवळी बिनबियांची वांगी खावीत. घाम कमी येतो, घामावाटे शरीरातील चांगली द्रव्ये, फाजील प्रमाणात बाहेर जाण्याची क्रिया थांबते. जादा बी असलेले वांगे खाऊन आतल्या बियांमुळे वृक्क किंवा मूत्रमार्गात मूत्राश्मरी बनण्याची शक्यता असते. वांगे रुची आणणाऱ्या भाज्यांत अग्रेसर आहे. कफप्रधान व फुप्फुसाच्या विकारात कोवळ्या वांग्याचा रस किंवा शिजवून फार मसाला न मिसळलेली भाजी खावी. गळू झाले असल्यास वांगे शिजवून फार मसाला न मिसळलेली भाजी खावी. गळू झाले असल्यास वांगे शिजवून त्याच्या पोटिसाचा शेक द्याावा. गळवे बसतात. पू होत नाही. ज्वारीमध्ये वांगे शिजवले की, पूर्ण निर्दोष होते. त्यातील काही असलेले नसलेले विषार दूर होतात. कृश व्यक्तींनी शिजवलेलीच वांगी खावीत. तरुणांनी व बलवानांनी भरपूर श्रमाची कामे ज्यांना करावयाची आहेत त्यांनी कोवळे कच्चे वांगे खावे व त्यासोबत आले, लसूण, जिरे, ओवा, लिंबू, मीठ, हिंग, ताक असे तोंडी लावण्याचे पदार्थ प्रकृतीनीरुप व आवडीप्रमाणे खावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वजन कमी करण्यासाठी….

अतिस्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्याकरिता पुढील पद्धतीने दुधी भोपळा खावा. नेहमीच्या जेवणाअगोदर पाव किलो दुधी भोपळ्याच्या फोडी उकडाव्या. त्याला मीठ, साखर काहीच लावू नये. नुसत्या फोडी प्रथम खाव्या. नंतर इतर जेवण जेवावे. अशा पद्धतीने दोन वेळा दुध्या भोपळा खावा. त्यामुळे लघवी, परसाकडे साफ होते. पोटात आग पडत नाही. दुध्या भोपळ्यात कार्बोहायड्रेट, चरबी, प्रोटीन, स्टार्च किंवा पिष्टमय पदार्थ नाहीत. दुध्या भोपळा भरपूर खाऊन पोट भरते. महिन्याभरात पाच किलो वजन नक्कीच घटते. तोंडावर ताबा ठेवला तर या पद्धतीने न थकता न येता वजन घटते.