वाढते वजन ही आजच्या युगातील सर्वात मोठी समस्या आहे. खराब आहार आणि बैठी जीवनशैली वजन वाढण्यास कारणीभूत आहे. वाढत्या वजनामुळे तुम्ही मधुमेह, रक्तदाब यांसारख्या अनेक आरोग्य समस्यांना बळी पडू शकता. वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात, परंतु तरीही वजन कमी होत नाही, कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. झपाट्याने वजन कमी करण्यासाठी कोणता फंडा तुमच्या कामी येईल, याविषयी आरोग्यतज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, वजन कमी करणे हे बहुतेक लोकांसाठी मोठे आव्हान असते. अनेक जण खूप प्रयत्न करतात, पण वजन कमी होत नाही. काही लोक थोडे कष्ट करून वजन कमी करतात, तर काही लोक खूप मेहनत करूनही वजन कमी करू शकत नाहीत. जर तुम्ही वजन कमी करू इच्छित असाल, तर अधूनमधून किंवा मध्यांतराने चालण्याचा व्यायाम तुम्हाला आवश्यक आहे. यामध्ये तीन ते पाच मिनिटे मध्यम गतीने चालणे आणि ३० ते ६०-सेकंद वेगाने चालणे किंवा अगदी हळू जॉगिंगचा समावेश होतो. उच्च तीव्रतेच्या मध्यांतराच्या धावा तुमच्या कमाल हृदय गतीच्या ८० ते ९० टक्क्यांच्यादरम्यान असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही क्रॅश होणार नाही; परंतु तरीही कॅलरी बर्न करू शकता. उच्च तीव्रतेने धावल्यानंतर, थोडं रिलॅक्स होण्यासाठी ३० सेकंद चालणे हृदय गती हळूहळू कमी होण्यास मदत करते.
(हे ही वाचा: उपवास करण्यामुळे वजन कमी, रक्तातील साखर अन् कोलेस्ट्रॉल कमी होतं? तज्ज्ञ काय सांगतात…)
चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे. जर तुम्हाला लठ्ठपणा वाढू नये आणि तुम्हाला हृदयाशी निगडीत आजारांचा धोका नको असे वाटत असेल, तर त्यासाठी काही पावले चालली पाहिजेत. चालण्यामुळे तुमची पचनक्रिया आणि चयापचय क्रिया चांगली राहते, यामुळे तुमचे शरीर सक्रिय राहते; ज्यामुळे जडपणाची समस्या येत नाही, याशिवाय आपले मानसिक आरोग्यही सुधारते, त्यामुळे रोज चालण्याची सवय लावा.
याव्यतिरिक्त मध्यांतर चालणे कठोर अंतरालदरम्यान हृदय गती वाढवून हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फिटनेस सुधारते, ज्यामुळे हळूहळू हृदयाची कार्यक्षमता आणि सहनशक्ती वाढते. अंतराल चालण्याच्या विविध गतींमुळे तुमच्या शरीराची हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन पोहोचवण्याची क्षमता वाढते. मध्यांतर चालणे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी चांगले नियंत्रित करण्यास मदत करते.
फक्त चालल्याने वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी डाएटवरही कंट्रोल असणे आवश्यक असते. अनहेल्दी गोष्टी डाएटमधून काढून टाकाव्या. शिवाय डाएटचे प्रमाणही कमी करणे गरजेचे असते, शिवाय योग्य झोप आणि तणावमुक्ती जीवन आवश्यक आहे.