फार फार प्राचीन काळापासून तुम्हा-आम्हा मानवांचा पहिला पूर्वज कसा होता, याच्याबद्दलच्या कथा-कल्पना नेहमीच विविध प्रकारे सांगितल्या जातात. मूळ मानव जन्माला आला तेव्हा त्याला प्रथम भूक लागली की तहान लागली असावी, हा मानववंश शास्त्रज्ञांचा नेहमीचाच चर्चेचा विषय असतो. आजही आपल्या पृथ्वीवर ‘पाणी’ आहे. म्हणून तुम्ही-आम्ही आहोत. पृथ्वीखेरीज अन्य ग्रहांवर पाणी आहे का, याचा शोध थोर अंतराळ शास्त्रज्ञ घेत आहेत. पृथ्वीवरचे पाणी अनेकविध स्वरूपाची भूमी, काल, हवामान अशा विविध घटकांमुळे वेगवेगळ्या स्वरूपांचे असते. नदी, नाले, ओढे, विहिरी, समुद्र, सरोवरे, पर्वतराजी व खोल खोल भूगर्भ येथे विविध प्रकारचे पाणी मिळते. जगातील बहुसंख्य मंडळी मिळेल ते पाणी, आपापल्या परीने शुद्ध करून किंवा गाळून वापरत असतात. माणसाच्या रोजच्या राहणीमानात, खाण्या-पिण्यात, कामधंद्यात कमी-जास्त अडीअडचणी आल्या, की मानवाला काही विकार होतात व अशा वेळेस नेहमीच्या पाण्यावर वेगवेगळे संस्कार करून ‘सिद्धजल’ बनवण्याची गरज पडते.

मानवाच्या जन्मापासून माणसाला ज्वर या विकाराने नेहमीकरताच पछाडलेले आहे. काही वेळेस ज्वर विकाराकरिता सिद्धजलाचा फायदा ज्वर उतरण्याकरताच नव्हे, तर त्या काळात पुरेशी ताकद राहावी म्हणूनही होतो. थोर संत विनोबाजी भावे, त्यांना कधी ताप आला तर फक्त गरम पाणीच प्यायचे.
‘घनचंदनशुण्ठ्यम्बुपर्पटोशीर साधितम!’

ताप लवकर उतरावा, थकवा येऊ नये, शोष पडू नये म्हणून एक लिटर पाण्यात प्रत्येकी दोन-अडीच ग्रॅम चंदन, मनुका, सुंठ, धने, वाळा, मिळाल्यास नागरमोथा घालून उकळावे. निम्मे पाणी उरवावे. तहानेच्या मानाने थोडे-थोडे पाणी प्यावे.

याच प्रकारे कफाकरिता सिद्धजल : तुळशीची ५ पाने, २ मिरे, आल्याचा तुकडा, पुदिना, चिमूटभर हळद, पारिजातकाची पाने, मिळाल्यास लवंग, दालचिनी हे सर्व तारतम्याने; अर्धा लिटर पाण्यात उकळून पाव लिटर पाणी उरवावे. गाळून थोडे थोडे प्यावे. कफ, दमा, खोकला, सर्दी, पडसे यावर उपयुक्त आहे.

वातविकारांकरिता सुंठजल : पाणी उकळून नंतर त्यात चिमूटभर सुंठ मिसळावी. जेवणानंतर हे पाणी प्यावे. पोटदुखी, आमवात, अजीर्ण, अपचन, अंग दुखणे, गॅसेस होणे, ढेकरा, पोटफुगी, आमांश, सायटिका, फ्रोजन शोल्डर अशा विकारांत सुंठजलामुळे रोगाला उतार पडतो.

मलावरोध ही समस्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यावर उपाय म्हणून एक-दोन गुलाबाच्या पाकळ्या, दहा मनुका, एक खजूर व थोडे धण्याचे दाणे रात्री दोन कप पाण्यात भिजत टाकावे. पहाटे कुस्करून पाणी गाळून घ्यावे, प्यावे. कोठ्यातील उष्णता कमी होऊन पोट साफ होते. वृद्ध, लहान बालकांना गोवर वा कांजिण्या, तसेच गर्भवती स्त्रिया यांच्याकरिता हे जल विशेष उपयुक्त आहे. मूत्रावरोध, खूप घाम याकरिता वरीलप्रमाणेच चमचाभर धणे, रात्रो एक कप पाण्यात भिजत टाकून सकाळी ते धणे खाऊन वर तेच पाणी प्यावे. लघवी साफ होते. घामावाटे जाणारी ताकद वाचते.

मूत्रेंद्रिये विकार व अत्यार्तवाकरिता चंदनपाणी हा एक उत्तम सिद्धजलाचा प्रकार आहे. त्याकरिता चांगल्या वासाचे पांढरे चंदनखोड उगाळून त्याचे चमचाभर गंध एक कप पाण्यात मिसळून सकाळ-संध्याकाळ घ्यावे. त्यामुळे लघवीची तिडीक, लघवी करताना होणारी आग, मूत्रेंद्रियावरचे फोड कमी होतात. स्त्री-पुरुषांच्या गुप्तरोगात या चंदनजलाचा तात्काळ फायदा मिळतो. विशेषत: ज्या स्त्रियांना मासिक पाळीचा स्राव वारंवार व खूप मोठ्या प्रमाणावर जातो, त्यांच्याकरिता चंदनासारखा दुसरा ‘सखा’ कोणी नाही. अलीकडे वयात आलेल्या मुलींपासून ते वयाच्या चाळिशीपर्यंतच्या स्त्रियांमध्ये अंगावर पांढरे जाणे, श्वोतप्रदर, धुपणी अशी लक्षणे व त्यामुळे थकवा मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याकरिता जिरेसिद्ध जल हा अगदी सोपा उपाय आहे. अशा तक्रारी असणाऱ्या महिलांनी रात्री एक चमचा जिरे ठेचून एक कप पाण्यात भिजत टाकावे, सकाळी ते जिरे चावून खावे व वर तेच पाणी प्यावे.

जगभर ‘चहाची चाह’ खूपच मोठी आहे. लहानसहान, गोरगरीब, शेतकरी, कामगारांपासून ते हवेलीवाल्यांपर्यंत सर्वांनाच ‘मॉर्निंग टी’ हवाच असतो. अलीकडे चहाची पावडर, दूध व साखरेच्या वाढत्या किमतीमुळे तुमचे-आमचे बजेट कोसळून पडत आहे. त्याकरिता ‘काटकसरी चहा’- नव्हे ‘चहा सिद्धजल’ एक रोज पहाटे अनुभवण्याची रेसिपी आहे. पाणी उकळत ठेवावे. बुडबुडे यायला लागले की त्यात कणभर मीठ, चवीपुरते किसलेले आले व नेहमी एका कपाला जेवढी चायपत्ती लागते त्याच्या दशांश पूड – रंग व चहाच्या समाधानाकरिता टाकावी. पातेले खाली उतरावे. त्यात ५-१० थेंब कागदी लिंबाचा रस मिसळावा. झाकण ठेवून दोन मिनिटांनी प्यावा. असे सिद्धजल प्यायल्याने दिवसभराच्या कामाला उत्साह व तरतरी मिळते. दूध, साखर व चायपत्तीची बचत होते. काटकसर होतेच, पण चहाचे दुष्परिणाम होत नाहीत. चार मित्र-मैत्रिणींना सकाळी असा चहा पाजा. त्यांचा दुवा घ्या.

ऋषिपेय- गुळपाणी

अलीकडच्या बदलत्या जीवनशैलीमुळे गरिबांपासून मोठ्यांपर्यंत, लहानसहान गावांतील प्रजेपासून ते मोठमोठ्या इमलेवाल्यांना अनेक नवनवीन विकारांचा सामना करायला लागतो. रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, मूत्रपिंड विकार, चिंता, मानसविकार व अनिद्रा अशा विकारांत पैशापरी पैसा जातो, रोग संपत नाही. आधुनिक वैद्यकही अशा वाढत्या विकारांचा सामना करायला कमी पडत आहे. काही वेळेस या विकारांकरिता दिलेली औषधे पचनी पडतात व माणसे कंटाळतात. अशा क्रॉनिक विकारांचा सामना करण्याकरिता सुरक्षित व निश्चितपणे स्वास्थ्य देईल असे पुढील प्रकारचे पेय, विशेषत: साठ वर्षे वयाच्या स्त्री-पुरुषांनी जरूर करावे व नियमितपणे सकाळी घ्यावे.

ब्राह्मी चूर्ण, अर्जुन साल, उपळसरी, शतावरी, गोखरू व धणे प्रत्येकी दहा ग्रॅम चूर्ण, जिरे व सुंठ चूर्ण प्रत्येकी ५ ग्रॅम, ५०० मिलिलिटर पाण्यात वरील चूर्ण उकळावे. थोडी उकळी फुटली की गाळून गरम गरम पाणी प्यावे. हे औषध एका वेळी चार जणांना पुरते. ज्यांना मानसिक दुर्बलतेमुळे डिप्रेशन, अनुत्साह, अकाली थकवा येतो त्यांच्याकरता चहा, कॉफी, कोल्ड्रिंकपेक्षा एक उत्तम आरोग्यदायी खात्रीचा पर्याय आहे.

मे महिना किंवा ऑक्टोबर महिना, भरपूर तहान लागण्याचे दिवस. या दिवसांत एक काळ घरी आलेल्या सर्वांपुढे गुळाचा खडा व पाण्याचे भांडे ठेवण्याचा प्रघात होता. आता पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणाबरोबर कोल्ड्रिंक्स, कृत्रिम साखरेची पोटात विष निर्माण करणारी पेये आली आहेत. ‘काय कोल्ड्रिंक घेणार?’, ‘कुछ थंडा पिओगे?’ असे उद्गार बाजारात सहजपणे ऐकू येतात. बाजारातील या थंड पेयात सॅकरीन हा कृत्रिम गोडी आणणारा पदार्थ असतो. ते प्रत्यक्षात साखर नसून एक घातक केमिकल द्रव्य असते. या सॅकरीनच्या गोळ्यांमुळे मधुमेह हटत नाही, पण अनेक नवीन रोग निर्माण होतात. ‘लो कॅलरी’ अशी जाहिरात करून शीतपेय बनविणारे पब्लिकला बनवत असतात.

पंजाबमध्ये सधन शेतकऱ्यांकडे स्वत:चा गूळ स्वत: बनवायची पद्धत आहे. घरच्या वापराकरिता गूळ बनवायच्या त्यांच्या काहिलीत धणे, सुंठ, बडीशेप असे मिश्रण टाकून गूळ तयार केला जातो. असा गूळ व पाणी उन्हाळ्यात खाण्यापिण्याचे भाग्य मला लाभले होते. दिवसभर कितीही ऊन लागले तरी त्रास होत नाही. विशेषत: सन स्ट्रोक, फ्ल्यू, तीव्र उन्हाळा यांच्यापासून उन्हात फिरणारा सुरक्षित राहतो. आपण आपल्या घरी उन्हाळ्यात गूळ, वरील सर्वांचे चूर्ण व पाणी देऊन आलेल्यांचे स्वागत करावे.

ताजे व शिळे पाणी

ताजे पाणी व शिळे पाणी हे शब्द आताच्या राहणीसंदर्भात थोडे चमत्कारिक आहेत. ज्या वेळेस वाहत्या नदीतील किंवा जिवंत विहिरीतील ताजे पाणी लोक पिण्याकरिता वापरत होते त्या वेळेस ताजे पाणी हा शब्द योग्य होता. जे पाणी जलाशयात बंदिस्त आहे, जेथे जिवंत झरे नाहीत, पाण्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळत नाही ते पाणीसुद्धा शिळ्या पाण्यासारखे असते. आपल्या घरात हंड्यात, पिंपात भरून ठेवलेले पाणी बंदिस्त असते. त्या पाण्यावर नकळत त्या त्या भांड्यांच्या धातूंचे परिणाम होत असतात. विशेषत: लोखंड, स्टील, प्लास्टिक, रबरी टाक्या यांमध्ये भरलेले पाणी चोवीस तासांनंतर पिण्यालायक नाही, असे समजावे.

उकळून गार केलेले पाणीसुद्धा आठ तासांनी शिळे पाणीच समजावे. शिळे पाणी पचायला जड, पोटात वायू निर्माण करणारे व पोटाचे पावसाळी विकार उत्पन्न करणारे असते. त्यामध्ये हवेतील सूक्ष्म जीवजंतूंचा नकळत प्रादुर्भाव झालेला असतो. वाहत्या पाण्यात हे जीवजंतू तितक्या प्रमाणात टिकत नाहीत. फिल्टर प्लॅन्टमधून येणाऱ्या पाण्यात भरपूर क्लोरिन टाकलेले असल्यामुळे रोगराई होत नाही. तांब्याच्या भांड्यातील रात्री भरलेले पाणी सकाळी प्यावयास हरकत नाही. मात्र ते भांडे पाणी भरण्यापूर्वी लख्ख घासलेले असावे. त्याचा कलंक पूर्ण निघून गेलेला हवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नारळपाणी

नारळ ही देवाची अजब करणी आहे. आपल्या समाजात घरीदारी अनेक वडीलधारी मंडळी असतात. वरून रागीट, पण करणीने गोड. मुलाबाळांना, लेकीसुनांना प्रसंगी धाक वाटेल, पण ऐन वेळी हीच कठीण हृदयाची माणसे आपल्या गोड करणीने घरातील छोट्या घटकांना दिलासा देतात. नारळ वरून खडबडीत, पण आतले त्याचे पाणी म्हणजे एक जीवनदायी, नैसर्गिक तयार पेय आहे. जगभरात या नारळपाण्याची किंवा शहाळ्याच्या पाण्याची ‘चाह’ आहे. ज्या श्रमजीवी वर्गाला उन्हातान्हात काम करावे लागते, खूप घाम गाळावा लागतो, खड्डे खणावे लागतात, शोष पडतो, त्यांच्याकरिता चहा, कॉफी व कोल्ड्रिंगपेक्षा नारळपाणी केव्हाही चांगले. बाहेरच्या हवेपासून पूर्णपणे संरक्षित असलेले हे पाणी नारळ फोडल्याबरोबर किंवा शहाळे कापल्याबरोबर लगेचच प्यावे. उन्हाळ्यात जरूर प्यावे. ज्यांना बुद्धीचे काम आहे, खूप बोलावे लागते अशांनी उन्हाळ्यात नक्की प्यावे. लघवी कष्टाने होत असल्यास, लघवीची आग होत असल्यास, लघवीचा दाह होत असल्यास, योनिदाह विकारांत मूतखडा असताना अवश्य प्यावे. ज्यांना भरपूर लघवी होते व पोटात थंडीमुळे गॅस धरतो त्यांनी नारळपाणी टाळावे.