Diabetes Type-1.5 (LADA): मधुमेहाचा विचार येतो तेव्हा बहुतेकदा टाइप १ आणि टाइप २ असा विचार डोक्यात येतो. मात्र वैद्यकीय तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, मधुमेहाचा आणखी एक प्रकार आहे जो अनेकदा दुर्लक्षित राहतो. याला ‘लेटेंट ऑटोइम्युन डायबिटीज इन अडल्ट्स’ (LADA) असं म्हणतात. याला सोप्या भाषेत टाइप १.५ देखील म्हणतात. हा आजार हळूहळू वाढतो आणि त्याला ओळखणंही काहीसं कठीण आहे. योग्य वेळी यावर काळजी घेतली नाही तर रूग्णाला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

LADA म्हणजेच टाइम १.५ मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. योग्य वेळी या प्रकाराचे निदान न झाल्यास तसंच चुकीच्या उपचारांमुळे रूग्णाला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. म्हणूनच जर ३०व्या वर्षानंतर मधुमेहाची लक्षणे दिसू लागली आणि औषधोपचारांनीही रक्तातील साखर नियंत्रणात येत नसेल तर अँटीबॉडी चाचणी करून योग्य निदान करून घेणे गरजेचे आहे. योग्य वेळी उपचार घेतल्यास रूग्ण सामान्य जीवन जगू शकतात आणि गंभीर परिणामांपासून वाचू शकतात.

मधुमेहाचे प्रकार

टाइप १ मधुमेह- जेव्हा स्वादुपिंड इन्सुलिन बनवणे थांबवते

टाइप २ मधुमेह- जेव्हा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही. बहुतेकदा वजन, जीवनशैली आणि निष्क्रियतेशी संबंधित असते.

LADA म्हणजेच टाइप १.५ मधुमेह- हा प्रकार टाइप १ सारखाच आहे. मात्र तो हळूहळू विकसित होतो आणि साधारणपणे वयाच्या तिशीनंतर दिसून येतो.

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते, प्रौढांमध्ये मधुमेहाच्या २ ते १२ टक्के केसेसमध्ये LADA असू शकते. संशोधनातून असेही समोर आले की, अनुवांशिक घटकही यामध्ये भूमिका बजावतात. मात्र श्वसनाचे आजार किंवा संसर्ग यासारखे पर्यावरणीय घटकदेखील याला कारणीभूत ठरू शकतात.

अनेकदा चुकीचे निदान का होते?

LADA या प्रकाराला अनेकदा टाइप २ मधुमेह समजले जाते. कारण त्याची लक्षणे त्या प्रकाराशी मिळतीजुळती आहेत. यामध्ये जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे, वजन कमी होणे आणि संसर्ग होणे अशी लक्षणे दिसून येतात. तज्ज्ञांच्या मते, सुमारे ५ ते १० टक्के LADA रूग्णांचे चुकीचे निदान होते. डॉक्टर असं गृहीत धरतात की, ऑटोइम्यून मधुमेह फक्त मुलांमध्येच होतो. त्यामुळे प्रौढ रूग्णांना टाइप २ औषधे आणि आहाराचे नियोजन सांगितले जाते. मात्र यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढत राहते.

चुकीचे उपचार किती धोकादायक?

ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी वेक्सनर मेडिकल सेंटरच्या डॉ. कॅथलीन डंगन यांच्या मते, LADA रूग्णांना टाइप २ रूग्णांपेक्षा लवकर इन्सुलिनची आवश्यकता असते. जर त्यावर वेळेवर उपचार केले नाहीत, तर रूग्णाला डायबेटिक केटोअॅसिडोसिस सारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागू शकतो.

योग्य निदान कसे करावे?

LADAचे निदान करणे सोपे नाही. अनेकदा प्राथमिक डॉक्टर निदानासाठी चाचण्या लिहून देत नाहीत. त्यामुळे रूग्णांना स्वत: जागरूक रहावे लागते. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या डॉ. कॅथलीन वेन यांच्या मते, ते ओळखण्यासाठी पाच अँटीबॉडीज GAD, ICA, IAA, IA2 आणि ZnT8ची चाचणी करावी. यासाठी फक्त ग्लुकोज HbAlc किंवा C-पेप्टाइड चाचण्या पुरेशा नाहीत.