डॉ. किरण नाबर

Health Special: “नणंदेच कार्ट किरकिर करत, खरूज होऊन दे त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला” या गाण्यातूनच आपल्याला कल्पना येते की, खरुज म्हणजे असा काहीतरी आजार आहे की ज्याच्यामध्ये माणसाला बऱ्यापैकी भोगावं लागत असावं. ते खरंच आहे. खरूज झालेल्या व्यक्तीला भरपूर खाज येते आणि दिवसापेक्षा रात्री ती खाज जास्त असते. त्यामुळे रात्री नीट झोपही लागत नाही. आज आपण खरुज या आजाराची माहिती घेणार आहोत.

Nana Patole and Ashok Chavan
भाजपा अन् काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुंपली; पटोले म्हणाले, “नाचता येईना अंगण वाकडं” तर चव्हाण म्हणतात, “नानांनी भरपूर…”
namrata sambherao shares how she resume her work after delivery
“रुद्राज चार महिन्यांचा होता”, बाळंतिणीचा संसार घेऊन कोल्हापूरला गेलेली नम्रता संभेराव, नवऱ्याने ‘अशी’ दिली साथ
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…
IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 DC vs CSK: धोनीच्या सुसाट खेळीने बायको साक्षीही भारावली, सामना हरल्याचं गेली विसरून…

पुरातन विकार

खरूज हा एक पुरातन काळापासून चालत आलेला आजार आहे. २४०० वर्षांपूर्वीही या आजाराचे वर्णन आढळते. ख्रिस्त पूर्व चौथ्या शतकात ॲरिस्टॉटलने लिहून ठेवले होते की, त्या माणसाची खाजरी पुळी फोडल्यावर त्यातून एक बारीक किडा बाहेर आला. खरूज हा आजार खरजेच्या किड्यामुळे (mite) होतो. हा किडा सूक्ष्म असतो. याला इंग्लिश मध्ये Sarcoptes scabiei असे म्हणतात. या किड्याची लांबी ०.४ मिलिमीटर व रुंदी ०.३ मिलिमीटर एवढी असते. या आजाराचा उद्भवन काळ ( Incubation period ) हा साधारण एक महिन्याचा असतो.

उद्भवन काळ

उद्भवन काळ म्हणजे या किड्याचा आपल्याला संसर्ग झाल्यापासून खाज येण्याचा कालावधी. पण जर आपल्याला पूर्वी खरूज होऊन गेलेली असेल, तर मात्र संसर्ग झाल्यानंतर दोन-चार दिवसातच खाज यायला सुरुवात होते. उद्भवन काळात देखील ती व्यक्ती दुसऱ्याला हा आजार पोहोचवू शकते. हा आजार स्त्री किंवा पुरुष दोघांना सारख्या प्रमाणातच होतो. परंतु अतिलहान मुलं व अतिवृद्ध व्यक्ती यांना मात्र हा आजार जास्त प्रमाणात होतो. हा आजार संपर्कामुळे होणारा आजार आहे. त्यामुळे हस्तांदोलन, एकत्र खेळणे, लैंगिक संबंध तसेच एकमेकांच्या वस्तू वापरणे (उदा. रुमाल, नॅपकिन, टॉवेल, कपडे, चादरी वगैरे) यामुळे हा आजार होतो. आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशिया या खंडात या आजाराचे प्रमाण जास्त आहे. गरिबी, कुपोषण, बेघरपणा, अपुऱ्या जागेत जास्त संख्येने राहणे आणि अपुरी व्यक्तिगत स्वच्छता या गोष्टींमुळे या आजाराला खत पाणी मिळते. तुरुंग, बोर्डिंग शाळा, आश्रम शाळा या ठिकाणी एका व्यक्तीला जरी खरूज झाली तरी ती इतरांना पटकन पसरते.

हेही वाचा : Health Special: काय खाण्याने अंतर्गत शारीरिक दाह कमी होतो? 

किडा कसा असतो?

संसर्ग झाल्यानंतर हा खरजेचा मादी किडा आपल्या त्वचेच्या वरील भागात (बाह्यत्वचेत) बिळ खणतो. हे बीळ थोडे नागमोडी व पाच ते दहा मिलिमीटर लांबीचे असते. यामध्ये मादी किडा दर दिवसाला दोन ते तीन अंडी घालते. तीन-चार दिवसात ही अंडी फुटून त्यातून अळ्या बाहेर पडतात आणि पुढील काही दिवसातच या अळ्यांचे रूपांतर प्रौढ किड्यामध्ये होते. खरजेचा आजार झालेल्या व्यक्तीच्या त्वचेवर साधारण दहा-बारा प्रौढ मादी किडे असतात. खरजेचा प्रौढ किडा साधारण १-२ महिने जगतो.

या आजाराची लक्षणे काय?

या आजाराचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे खाज. खरूज झालेल्या व्यक्तीला मानेच्या खाली शरीरभर कुठेही प्रचंड खाज येते. या खाजेचा विशेष म्हणजे ती रात्री -अपरात्री जास्त प्रमाणात असते. त्यामुळे खरूज झालेल्या व्यक्तीला नीट झोपही लागत नाही. अशा व्यक्तीच्या हाताच्या बेचक्यात, मनगटावर, हातापायांना, बसायच्या ठिकाणी, पोटा पाठीवर, काखेमध्ये बारीक खाजणाऱ्या पुळ्या येतात.

हेही वाचा : सतत Screen वापरून डोळ्यांवर येतोय ताण? मग करून पाहा ‘२०-२०-२०’ नियमाचा वापर…

खरूज होणाऱ्या जागा

जास्त खाज येत असल्यास त्या पुळ्यांतून लसही येते. अशा ठिकाणी जंतूंचा संसर्ग झाल्यास तिथे खटे तयार होतात व पू धरतो. लहान मुलांमध्ये अशी पिकण्याची प्रवृत्ती जास्त असते. मुलांना व पुरुषांना लघवीच्या भागावर व अंडकोशावर देखील खाजऱ्या पुळ्या येतात. काही जणांमध्ये तर अशा बारीक पुळ्यांसोबत अतिशय खाजणाऱ्या पण मोठ्या गाठी येतात. याला गाठींची खरुज (Nodular scabies) असे म्हणतात. अशा गाठी विशेष करून कंबर, काखेचा भाग व लघवीचा भाग, तसेच अंडकोषांवर येतात. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे घरातील इतर व्यक्तींनाही तो काही दिवसातच होतो. अतितान्ह्या बाळांना जेव्हा खरूज होते तेव्हा त्यांच्या तळहात, तळपाय तसेच चेहऱ्यावर देखील पुरळ येते.

नॉर्वेजियन खरूज

खरजेचा एक क्वचितच होणारा प्रकार म्हणजे नॉर्वेजियन खरूज. ही खरूज विशेष करून अतिवृद्ध व्यक्ती, जुनाट आजारामुळे  अतिक्षीण झालेली व्यक्ती व रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या व्यक्तींना होतो. अशा व्यक्तींमध्ये बेचक्यात, काखेमध्ये, अंगावर बऱ्याचशा ठिकाणी तसेच कानावर व डोक्यामध्ये देखील बारीक पुळ्यांच्या ऐवजी मोठ्या मोठ्या खपल्या दिसून येतात. नेहमीच्या खरजेमध्ये संपूर्ण अंगावर जेमतेम दहा-बारा खरजेचे किडे असतात. पण इथे मात्र ते शेकडोच्यासंख्येने असतात. त्यामुळे अशा रुग्णांची शुश्रुषा करणाऱ्या व्यक्तींना व घरातील किंवा इस्पितळातील इतर व्यक्तींना हा आजार पटकन पसरतो. तसेच क्वचित प्रसंगी विशेषतः ज्यांची व्यक्तिगत स्वच्छता चांगली आहे अशा व्यक्तींमध्ये नेहमीच्या जागी म्हणजे हातांच्या बेचक्यात, काखेमध्ये, जननेंद्रियांवर खाजरे पुरळ दिसत नाही.  तरीपण त्यांना असणारी खाज ही खरजेमुळे असू शकते. त्यामुळे जर डॉक्टरने तुमच्या आजाराचे खरूज असे निदान केले तर त्यावर शंका घेऊ नका. कधी कधी एखाद्या कुटुंबात पाळलेल्या कुत्र्याला खरूज झालेली असते. पण ती प्राण्यांची खरुज असते.अशा कुत्र्याच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीला तात्पुरते अंगावर खाजरे पुरळ येते. पण ते माणसाच्या खरजेप्रमाणे हाताच्या बेचक्यात किंवा नेहमीच्या ठिकाणी नसते व कुत्र्यांवर आजाराचा उपचार केल्यास त्या व्यक्तीच्या अंगावरचे पुरळ काही दिवसांनी आपोआप निघून जाते. त्यासाठी त्या व्यक्तीला खरजेचे औषध लावण्याची गरज नसते. 

हेही वाचा : प्रसिद्ध सायकलपटूचे वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; तीव्र प्रकारच्या व्यायामाचा हृदयावर कसा परिणाम होतो?

या आजारावर औषध काय?

हा आजार होऊ नये म्हणून खरूज झालेल्या व्यक्तीपासून लांब राहणे हे महत्त्वाचे आहे. तसेच त्याच्या व्यक्तिगत वापराच्या वस्तू आपण वापरू नयेत. अशा व्यक्तीचा रुमाल, नॅपकिन, टॉवेल, चादर वेगळी ठेवावी. खरूज झालेल्या व्यक्तीने नखे वाढली असल्यास वेळीच कापावीत व शक्यतो जास्त खाजवू नये. खरजेसाठी डॉक्टर जे अंगाला लावायला औषध देतील ते गळ्याखाली पायापर्यंत सर्वत्र लावणे आवश्यक आहे. हाताच्या बेचक्यात, तळहात, तळपाय व इतर सर्व जागी ते औषध नीट लावावे. घरातील सर्व व्यक्तींनी हे औषध अशाप्रकारे लावणे आवश्यक असते. कारण एखाद्या व्यक्तीला खाज नसेल तरी ती व्यक्ती उद्भवन काळात (Incubation period) असू शकते.

उपचार सर्वांसाठीच

घरातील सर्व व्यक्तींनी एकाच रात्री ते औषध लावावे. अन्यथा ते न लावलेल्या व्यक्तीकडून हा आजार बरा झालेल्या व्यक्तीला परत होऊ शकतो. पुष्कळदा पालक लहान मुलांना हाताला हे औषध लावावयास घाबरतात. त्यांना चिंता वाटते की ते तोंडात जाईल. पण हे लक्षात घेतले पाहिजे की हा आजार जास्त करून हाताच्या बेचक्यातच पहावयास मिळतो व तिथेच हे खरजेचे जंतू जास्त असतात. त्यामुळे हे औषध सर्वत्र लावावे. आदल्या दिवशी वापरलेले सर्व कपडे, नॅपकिन, टॉवेल, रुमाल व चादरी या गरम पाण्यात टाकाव्यात. 

खरजेचा किडा मरण्यासाठी म्हणून गोळ्याही असतात. तसेच खाज कमी व्हायच्या काही गोळ्या असतात. काही रुग्णांमध्ये योग्य उपचारांनी खरजेचा किडा मरतो व खरजेचे बारीक पुरळ निघून जाते. पण काही मोठ्या गाठी ज्यांना अतिशय खाज असते त्या पुढे काही दिवस किंवा आठवडे तशाच राहतात. अशा गाठींमध्ये एखाद वेळेस इंजेक्शन द्यावे लागते. त्यासाठी त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्यावा. तुरुंग किंवा आश्रमशाळा अशा ठिकाणी सगळ्यांनी एकदम उपचार घेणे आवश्यक आहे, अन्यथा एकाकडून हा आजार बऱ्या झालेल्या व्यक्तीला परत होऊ शकतो. तसेच आश्रमशाळेतली मुलं सुट्टीसाठी घरी आली की घरातील माणसांनाही हा आजार होतो.

हेही वाचा : थंडीत रात्री झोपण्यापूर्वी करा ‘या’ सात गोष्टी; काही दिवसांतच त्वचा होईल चमकदार अन् केस घनदाट

खरूज हा आजार जरी साधा वाटला तरी ज्याला हा आजार होतो तो माणूस बऱ्यापैकी त्रस्त होऊन जातो. वर सांगितल्याप्रमाणे नीट उपचार घेतले नाहीत तर हा आजार घरामध्ये सगळ्यांना पसरतो व ती एक मोठी समस्या होऊन जाते. आपल्याकडे भेटल्यावर पश्चिमात्य लोकांप्रमाणे हस्तांदोलन करण्याची पद्धत असल्यामुळे आपल्या सदिच्छांबरोबर आपण हा आजारही दुसऱ्याला देत असतो. त्यामुळे खरूज झालेल्या व्यक्तीने मित्र किंवा ओळखीची व्यक्ती भेटल्यास हस्तांदोलनाऐवजी नमस्काराची भारतीय पद्धत वापरलेली उत्तम!