कोणत्या आजारावर कोणता पदार्थ औषध म्हणून खावा याचं वाचिक ज्ञान सगळेच एकमेकांना देतात. मात्र, विशिष्ट पदार्थ कोणत्या आजारासाठी योग्य-अयोग्य याचा अभ्यास करणं, याविषयीची माहिती घेणं गरजेचं असतं. या अशा आरोग्यदायी पोषक पदार्थांपैकी पोहे, चुरमुरे आणि लाह्या यांच्याबद्दल जाणून घेऊया.
चुरमुरे
पोटाची काहीही तक्रार नाही, पचनशक्ती चांगली आहे, त्यांच्याकरता चुरमुरे-कुरमुरे हे योग्य खाणे आहे. त्यांना घाबरायचं अजिबात कारण नाही. चुरमुरे ज्या पद्धतीने तयार होतात त्यामुळे फाजील पाणी व उष्णता दोन्हीचे पोटात बिघडणारे दोष एकत्रित केले जातात. पोटात चुरमुरे गेले की त्यांचा गोळा गच्च होतो. ज्यांचे पचन मंद आहे, अग्नी बिघडलेला आहे. पोटात वायू धरतो अशांना चुरमुरे मानवत नाहीत.
अग्नी मंद असणाऱ्यांनी पोहे खाऊन वर पाणी व काहीही पातळ पदार्थ खाल्ला की लगेच जुलाब सुरू होतात. त्यात तिखट अधिक असेल तर चुरमुरे जास्त बाधतात. नेहमी जुलाब होणाऱ्यांनी, पोट दुखण्याची, अजीर्णाची किंवा पोटात गॅस धरण्याची सवय असणाऱ्यांनी चुरमुरे किंवा त्यापासून बनलेली भेळ, मिसळ, भडंग असे पदार्थ कटाक्षाने खाऊ नयेत.
पोहे
पोहे नेमके लाह्यांच्या उलट गुणधर्माचे आहेत. ज्यांना शारीरिक श्रम करावयाचे आहेत. खूप घाम गाळावयाचा आहे. पोटाची तक्रार नाही. पचन ठीक आहे, एवढ्यातेवढ्याने पोटात गॅस धरत नाही, एकवेळ शौचाला साफ होतो, त्यांच्याकरिता पोहे मोठे टॉनिक आहे. पोहे शक्यतो कोरडे पण चावून चावून खावे. त्यानंतर सावकाश पाणी घ्यावे. ज्यांना पोहे खूप जड वाटतात त्यांनी ताक, लसूण, जिरे, आले अशा पदार्थांबरोबर पोहे खावे. पोटभर भात खाऊन गॅस निर्माण होत असेल तर त्याऐवजी थोडेच पोहे खावे. भरपूर एनर्जी मिळते. पोह्यांमध्ये तांदळाच्या साळीतील रोगप्रतिकार तेल काही प्रमाणात शिल्लक असते. त्यामुळे डोळे, त्वचा, केस, हाडे यांच्या विकारांनी ग्रस्त रुग्णांनी हातसडीचा तांदूळ न मिळाल्यास पोहे जरूर खावे.
लाह्या
यो लाजैर्यजति स यशोवान भवति।
श्रीगणपती अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीत लाह्यांचे महत्त्व वेगळ्या कारणाकरता सांगितले आहे.
भाताची साळ, ज्वारी, राजगिरा अशी धान्ये भाजून त्यांच्या लाह्या तयार केल्या जातात. लाह्या भाजल्यामुळे शरीरास आवश्यक तेवढाच पिष्टमय, पचावयास हलका, अति हलका असा भाग त्यात राहतो. हा भाग पित्त कमी करतो. कफ वाढवू देत नाही. ज्याप्रमाणे टीपकागद किंवा खडूचा तुकडा शाई टिपून घेतो, त्याप्रमाणे आमाशयात गेलेल्या लाह्या वरवर येणारे, डचमळणारे पित्त टिपून घेतात. त्यामुळे आम्लपित्त, उलटी, अॅसिडिटी या विकारांत लाह्या हे नुसतेच अन्न नाही तर औषधाचेही काम करते. कावीळ, जलोदर, यकृतोदर, प्लीहावृद्धी या विकारात लाह्या हे नुसतेच अन्न नाही तर औषधाचेही काम करते. कावीळ, जलोदर, यकृतोदर, प्लीहावृद्धी या विकारात तेल तूप वर्ज्य असते. विश्रांतीची गरज असते. पोटाला फार बोजा देऊन चालत नाहीत. अशा अवस्थेत साळीच्या लाह्या भरपूर खाव्या. त्यामुळे पित्ताचे प्रमाण वाढत नाही. पोट भरते, यकृतावर ताण पडत नाही. किडनी किंवा वृक्काचा कॅन्सर, लघवी कमी होणे, डायलेसिस वारंवार करावयास लागणे या विकारात साळीच्या लाह्यांचा आहार व या लाह्या उकळून तयार केलेले पाणी हा अत्यंत निर्दोष आहार होय. मात्र लाह्या या नेहमी ताज्या हव्या. उघड्यावर असलेल्या, धूळ बसलेल्या लाह्या खाऊ नयेत.
या निर्दोष आहारामुळे वृक्काचे कार्य सुधारते, लघवीचे प्रमाण वाढते. डायलेसिस करावयाचा जो काळ आहे तो लांबतो. रक्ताच्या बाटल्या पुन: पुन्हा द्यााव्या लागतात, त्यांचा काळ लांबवता येतो.
रसक्षय, डिहायट्रेशन किंवा जुलाब-उलट्यांमुळे जेव्हा पोटात काही ठरत नाही त्यावेळेस साळीच्या लाह्या कोरड्या खाव्या. वर काही काळ काहीही पातळ पदार्थ घेऊ नये. गर्भिणीच्या उलट्यांमध्ये कोरड्या लाह्या खाव्या. कृश व्यक्तीकरिता लाह्याचे पिठाचे लाडू हे परम पौष्टिक टॉनिक आहे. अतिशय माफक प्रमाणात पिठीसाखर व साळीच्या लाह्या दळून केलेले पीठ अशा मिश्रणाचे लाडू मधुमेह नसलेल्या माणसाने जरूर खावे. अॅलर्जी, आग होणे, कफविकार, गरमी, परमा, गोवर, कांजिण्या, वायगोळा, जखमा, जळवात, नवीन ताप, तोंड येणे, भगंदर, हृदयरोग या विकारात साळीच्या लाह्या पथ्यकर आहार आहे. मात्र मधुमेही व्यक्तींच्या भाताच्या/ साळीच्या लाह्याऐवजी ज्वारी किंवा राजगिरा लाह्या खाव्या