Pre Wedding Checkup : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा अन् तितकाच महत्त्वाचा क्षण असतो. त्यामुळे लग्नासाठी वधू-वर आणि त्यांचे कुटुंबीय फार उत्साही असतात. पण लग्न जमवताना सर्वांत आधी दोघांची कौटुंबिक स्थिती, उत्पन्न व सौंदर्य अशा गोष्टी विचारात घेतल्या जातात. त्यानंतर वधू-वरांच्या कुंडल्या एकमेकांशी जुळतात का हे पाहिले जाते. त्यात हल्ली कुंडलीबरोबरच रक्तगटाबाबतही चौकशी केली जाते. लग्न करणाऱ्या वधू-वराचा रक्तगट सारखा असेल, तर अडचणी येतात, असे अनेकदा म्हटले जाते. पण, हा नेमका समज आहे की गैरसमज हेच अनेकांना समजत नाही. त्यात हल्ली अनेक जोडपी लग्न करण्यापूर्वी विविध आरोग्य चाचण्या करण्यावर भर देत असल्याचे दिसते. त्यासाठी मेडिकल लॅब वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्सही देतात.

आतापर्यंत लग्न करण्यापूर्वी जोडप्याने एचआयव्ही एड्सची चाचणी करावी, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात असल्याचे ऐकले किंवा अनेक जोडपी तशी चाचणी करतातही. पण, त्यासह अशा काही आरोग्य चाचण्या आहेत की, ज्या तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी जोडप्याने कोणत्या आरोग्य चाचण्या कराव्यात आणि त्याची गरज का आहे? याविषयी महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवेचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी लोकसत्ता डॉट कॉमला दिलेली माहिती जाणून घेऊ..

रक्तगट

लग्न करण्यापूर्वी दोघांना एकमेकांचा रक्तगट माहीत असणे गरजेचे आहे. जे आजार स्त्री-पुरुष संबंधांतून पसरतात, जसे की एचआयव्ही एड्स, हेपॅटायटिस बी, ई, सी, इतर गुप्तरोग जसे सिफिलिस या आजारांची तपासणी करणे सहज शक्य आहे. अनेकदा काही आनुवंशिक आजारांचाही यात समावेश असतो.

सिकल सेल

महाराष्ट्रात अनेक आदिवासी भागांत सिकल सेल अॅनिमियाचे प्रमाण अधिक आहे. पत्नी आणि पतीला सिकल सेल अॅनिमियाची लागण झाली असेल, किंवा जर ते या आजाराचे वाहक असतील तर त्यांच्या होणाऱ्या बाळालाही तो होण्याची शक्यता अधिक वाढते. सिकल सेल प्रभावित क्षेत्रातील लग्न करणाऱ्या जोडप्यांनीही सिकल सेल अॅनिमियाची चाचणी करून घेणे आवश्यक आह

डाऊन सिंड्रोम

आजकाल लग्नाचे वय वाढत आहे. त्यामुळे बाळ होतानाचे आईचे आणि वडिलांचे वय ३५ च्या पुढे गेले, तर विविध आजारांचा धोका वाढतो. निसर्गाने निरोगी अपत्य जन्माला येण्याचे एक वय निश्चित केले आहे. त्यामुळे लग्न खूप उशिरा झाले, तर अनेकदा बाळाला आनुवंशिक आजार होण्याचा धोका असतो किंवा स्मरणशक्ती आणि बुद्धीमत्तेने कमजोर असलेले बाळ जन्माला येणाचा धोका वाढतो. त्यामुळे दोघांमध्ये एक जरी जनुकीय दोष असेल, तर दिव्यांग मूल जन्माला येण्याची शक्यता असते.

युरिन टेस्ट

युरिन टेस्टच्या माध्यमातून दोघांना काही मूत्रमार्गाचा संसर्ग आहे का ते समजते. स्त्री-पुरुष संबंधांच्या अनुषंगाने हा महत्त्वाचा मुद्दा आहे; पण युरिनसंबंधित काही आजार असेल तरी तो आठवडाभराच्या औषधोपचाराने बरा होऊ शकतो.

जेनेटिक डिजीज टेस्ट

लग्न करण्यापूर्वी वधू-वराने जेनेटिक डिजीज टेस्ट करून घेतली पाहिजे. कारण- दोघांपैकी एकाला कोणताही आनुवंशिक आजार असल्यास तो एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत होऊ शकतो. आनुवंशिक आजारांमध्ये मधुमेह, किडनीचे आजार, कर्करोग यांसारख्या आजारांचा समावेश आहे. त्यामुळे जेनेटिक डिजीज टेस्टमुळे पती-पत्नी यापैकी कोणाला एखादा आजार असेल, तर मूल जन्माला घालण्याचा विचार करताना आवश्यक ती काळजी घेता येते.

इन्फर्टिलिटी टेस्ट

मूल जन्माला घालण्यात व्यक्ती किती सक्षम आहे हे इन्फर्टिलिटी टेस्टद्वारेच कळू शकते. कारण- या आजारासंबंधीची लक्षणे डोळ्यांनी दिसत नाहीत. या चाचणीद्वारे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या आणि महिलांच्या अंडाशयाचे आरोग्य तपासले जाऊ शकते. त्यामुळे बाळाचे नियोजन आणि चांगले शारीरिक संबंध राखण्यास मदत होते.

सेक्शुअली ट्रान्स्मिटेड डिजीज टेस्ट

उशिरा लग्न करण्याच्या वाढत्या ट्रेंडमुळे लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याचे प्रमाण वाढताना दिसतेय. हल्ली ही एक सामान्य गोष्ट झाली आहे; परंतु त्यासोबतच लैंगिक आजारांचा धोकाही खूप वाढला आहे. अशा रोगांमध्ये एचआयव्ही एड्स, गोनोरिया, नागीण, सिफिलीस व हेपॅटायटिस सी यांचा समावेश आहे. त्यापैकी बरेच रोग घातकदेखील आहेत. ते लक्षात घेता, लग्न करण्यापूर्वी सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीज टेस्ट (STDs चाचणी) करणे महत्त्वाचे आहे. कारण- लग्नानंतर हे आजार तुमच्या जीवनसाथीद्वारे तुमच्यापर्यंत पसरू शकतात.

मानसिक आरोग्य

लग्नापूर्वी मानसिक आरोग्याशी संबंधित करण्यायोग्य कोणत्याही विशिष्ट चाचण्या नाहीत. पण, ते तपासल जाणे ही गरजेची गोष्ट आहे. अनेकदा मानसिक आरोग्य तपासणीतून तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे मानसिक आणि भावनिक आरोग्य कशा पद्धतीचे आहे ते समजते.

विवाहपूर्व समुपदेशन का गरजेचे आहे?

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट असते. त्यात दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती एकत्र येतात, एकत्र संसार करतात. त्यांनी कशा पद्धतीने राहावे, त्यांच्यातील ताणतणाव कसा कमीत कमी राहील आणि दोघांनी एकमेकांना स्पेस कशा पद्धतीने द्यावी हे समजून घेण्यासाठी समुपदेशन गरजेचे असते. या गोष्टी आपोआप कोणाला जन्मजात कळत नाहीत. त्यात दिवसेंदिवस घरे छोटी होत आहेत. त्यामुळे मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी मोठी माणसे नाहीत. पूर्वी आजी, आजोबा किंवा जाणती अशी माणसे काही झाले, तर समजून सांगायची; पण विभक्त कुटुंबात नवविवाहित जोडप्यांना मार्गदर्शन करणारी पूर्वीसारखी जाणती माणसे नाहीत. त्यामुळे विवाहपूर्व समुपदेशनात तुमचे नात काय आहे, तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि त्या कशा पद्धतीने निभावल्या पाहिजेत, तसेच त्या निभावताना आपल्यातील नाते भावनिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक भक्कम करणे गरजेचे असते. तसेच आपली कर्तव्ये काय आहेत, कसे वागले पाहिजे, काय टाळले पाहिजे हे सर्व कळणे आवश्यक आहे.

रक्तगट सारखा असावा की नसावा?

ज्यावेळी आईचा रक्तगट RH निगेटिव्ह असतो त्यावेळी तिला RH पॉझिटिव्ह बाळ होते. अशा परिस्थितीत बाळाच्या आणि तिच्या आरोग्याला धोका असतो. त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत आई RH निगेटिव्ह आहे हे जर आधीच समजले, तर त्याबाबत योग्य ती काळजी घेता येते.

आई आर एच निगेटिव्ह आणि वडील RH पॉझिटिव्ह असतात तेव्हा त्यांच्या जन्माला येणारे बाळ आर एच positive असेल तर बाळाला त्रास होऊ शकतो. पण, त्यामुळे लग्न टाळण्याची काही गरज नाही. कारण यावर वैद्यकीय सल्ल्याने आवश्यकती काळजी घेता येते.

आईचा रक्तगट निगेटिव्ह आणि वडिलांचा पॉझिटिव्ह आहे हे जर आधीच समजले, तर त्यानुसार बाळाची काळजीही घेता येते. एवढ्याशा कारणावरून लग्न न करण्याचा निर्णय घेणे अयोग्य आहे. त्यामुळे तसेच समान रक्तगटाचे लोक लग्न करू शकतात. या बद्दल उगीच गैरसमज आहेत.

लग्न करणाऱ्या जोडप्याचा चा रक्तगट सारखा नसावा हे सांगण्याला काही शास्त्रीय आधार नाही त्यामुळे रक्तगट कोणताही असो; पण तो जोडप्याला लग्न करण्यापूर्वी माहीत असणे आवश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमचे लग्नाचे वय जन्माला येणाऱ्या मुलांसाठी का महत्त्वाचे असते?

तुम्ही अनेकदा पाहता की, थोरल्या मुलापेक्षा दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरचे मूल हे हुशार असते. म्हणजे आई-वडील जेवढे परिपक्व असतील तेवढे होणारे मूल हे बुद्धिमान असते, असे म्हटले जाते; परंतु त्यालाही वयाच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे असे नाही की, ५० व्या वर्षी अपत्यप्राप्ती निर्णय द्यावा. तसेच वयाच्या पस्तिशीनंतर बाळाला जन्म दिल्याने डाउन सिंड्रोमचा धोका वाढतो. याचा अर्थ प्रत्येक बाळाला असे होईल असे नाही पण प्रमाण वाढते त्यात हल्ली लग्न उशिरा करण्याचे प्रमाण वाढतेय. त्यामुळे पस्तिशीआधी अपत्यप्राप्ती होणे योग्य ठरू शकते. त्यासाठी काही विशिष्ट नियम किंवा सक्ती नाही; पण वाढत्या वयाबरोबर वाढत्या आरोग्य समस्या लक्षात घेता, योग्य वयात अपत्य होणे गरजेचे आहे.