गुढीपाढवा हा हिंदूनवर्षातील पहिला दिवस आहे. हा दिवस लोक उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. सकाळी लवकर उठतात. अंघोळ करून घराची सजावट करतात. घरोघरी आंब्याच्या पानांचे तोरण लावतात. दारी सुंदर रांगोळी काढतात. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. प्रसाद म्हणून कडुलिंब आणि गुळ दिला जातो. गुढीपाडव्याच्या निमित्ताने जेव्हा आपण नवीन वर्षात प्रवेश करतो, नव्या ऋतुमध्ये प्रवेश करतो, ऊबदार तापमानामध्ये प्रवेश करतो तेव्हा घरामध्ये कडुनिंबांचे पानं असणे आवश्यक आहे. कारण कडूनिंबाचे भरपूर उपयोग आहेत.

चैत्र महिन्यात गुढीपाडवा साजरा केला जातो. या काळात उष्माघात होणे किंवा खूप उन्हात राहिल्यास आजारपण येणे या गोष्टी होऊ शकतात. आपण जे सण साजरे करतो, ज्या परंपराचे पालन करतो त्यामध्ये काहीतरी शास्त्रीय कारण असते. गुढीपाडव्याला कडुनिंब आणि गुळ खाण्याची पद्धतीमागेही असेच शास्त्रीय कारण आहे. आयुर्वेदामध्ये कडूनिंबाला खूप महत्त्व दिले जाते. कडुलिंब हे १२ महिने सातत्याने उपलब्ध होते आणि त्याचे शरीराला होणारे फायदे खूप आहेत. याबाबत आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत- पटवर्धन यांनी लोकसत्ताला माहिती दिली आहे. आहारतज्ज्ञ पल्लवी यांनी कडूनिंबाच्या सेवनाचे खाली काही फायदे सांगितले आहेत.

कडूनिंबाचे फायदे

रक्तशुद्धीकरण करते – कडूनिंब रक्तशुद्धीकरणाचे काम करते. रक्तामध्ये जेव्हा एखाद्या घटकाचे प्रमाण वाढते तेव्हा रक्तामध्ये संतलुन करण्याचा पाण्याद्वारे किंवा आपण खात असलेल्या अन्नाद्वारे केले जाते. पण कडूनिंब रक्त शुद्धीकरणासाठी फायदेशीर मानले जाते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले, मिठाचे प्रमाण वाढते, खनिजांचे प्रमाण वाढते तेव्हा ते संतुलित करण्याचे काम कडुनिंब करते. कडुनिंबाचे अर्काचे सेवन केल्यास शरीरातील साखर किंवा अनावश्यक पदार्थ बाहेर टाकले जातात.

दातांचे आरोग्य राखते – कडुनिंबाचे पालाच नव्हे तर त्याचे देठही अत्यंत उपयुक्त आहेत. पुर्वी लोक कडुनिंबाची काडी घेऊन त्याने दात घासत असे. कडुनिंबाच्या काडीने दात खासल्यास टुथपेस्ट वापरण्याची आवश्यकता नाही कारण त्याने दात चांगले स्वच्छ होतात आणि हिरड्या देखील मजबूत होतात.

त्वचेचे विकार कमी होतात – कडूनिंबाचा पाला उकळून त्या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेचे विकार कमी होतात. ज्यांना मुरुमाचा त्रास आहे, ज्यांना त्वचेवर डाग आहे त्यांनी कडूनिंब नियमित खाल्यास तर तो त्रास कमी होण्यास मदत होते.

रक्त प्रवाह सुधारतो – जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांनी कडुनिंबाची चटणी खाल्यास त्यांचा रक्तप्रवाह चांगला राहण्यासाठी मदत होते.

हेही वाचा – उन्हाळ्यात कलिंगड, काकडी टोमॅटो पालक का खावे? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…

शरीर थंड राहते – कडूनिंबाचे पाणी प्यायले तर त्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान खूप चांगले राहते. कडुनिंबाचे दोन ते तीन पाने पाण्यात टाकून ते नियमित प्यायल्यास तर खुप चांगले परिणाम शरीरावर होतात. शरीर थंड राहते. शरीरात आद्रता टिकून राहते.

पोटाचे विकार किंवा घाशाचे विकार कमी करते- जर एखाद्याला पोटाचे विकार किंवा घशाचे विकार असतील तर कडूनिंब खाल्यास ते कमी होते.

केसांचे आरोग्य राखते – कडुनिंबाच्या तेलामुळे केसांची वाढ होते. पांढरे केस कमी होतात. नैसर्गिकरित्या केसांना चमक वाढते.

गर्भवती महिलांसाठी उपयुक्त – जर गर्भवती महिलांनी रोज एक चमचा कडुनिंबाचा रसाचे सेवन केल्यास शरीरातील लोहाचे प्रमाण व्यवस्थित राहते. कोणत्याही प्रकारचे विकार गरोदरपणात होत नाही. तरीही कडुनिंबाचे सेवन करण्यापूर्वी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,

डासांपासून मिळते सुटका – आजकाल डासांचे प्रमाण फार वाढले आहे त्यामुळे कडुनिंबाचा पाला जर भाजून एका वाटीत ठेवला तर घरातील डासांचे प्रमाण कमी होते.

हेही वाचा – व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

गुढीपाडव्याला गुळ आणि कडूनिंब का खातात?

गुढीपाडव्याला सहसा कडुनिंबासह गुळ खाल्ला जातो. अनेकांना कडुनिंबाची कडू चव आवडत नाही त्यामुळे गुळासह कडुनिंब खाण्यास पसंती दर्शवतात. पण कडुनिंब आणि गुळ एकत्र खाण्याचे देखील आरोग्यासाठी फायदे आहे. गुळातील लोहाचे पचन कडुनिंबाच्या पानांमुळे खूप चांगले होते. कडूनिंब हा थंड प्रवृत्तीचा पदार्थ आहे तर गुळ उष्ण प्रवृत्तीचा आहे त्यामुळे संतुलन राखण्यास मदत होते. एकाच वेळी उर्जा आणि अँटी ऑक्सिटंड दोन्ही मिळते.

लक्षात ठेवा कोणत्याही स्वरुपात कडूनिंबाचे सेवन केल्यानंतर पाणी आवश्यक असते.