“आधी पाय हलके होते, कुठेही फिरायला जायला वेळ लागत नसे. आता थोडं चाललं की दम लागतो, पाय भरून येतात,” असं वयस्कर व्यक्ती अनेकदा सांगतात. वयानुसार हालचाल मंदावते हे खरं, पण त्यामागची कारणं आणि उपाय समजून घेतले, तर वृद्धत्व सुखकर होऊ शकतं. वय वाढल्यानंतर हालचालीतला संथपणा हा काही प्रमाणात नैसर्गिक असला , तरी योग्य व्यायाम आणि फिजिओथेरेपीच्या मदतीने चालण्याची गती, स्थैर्य आणि आत्मविश्वास नक्कीच टिकवता येतो.
वाढत्या वयासोबत हालचालीत संथपणा का येतो?
- स्नायूंची झीज
वय वाढल्यावर शरीरातील स्नायूंचा आकार, त्यांचं वजन आणि क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. यामुळे चालताना किंवा इतर हालचाली करताना स्नायू शरीराचा भार व्यवस्थित तोलून धरू शकत नाहीत. त्यामुळे बहुतेकवेळा वयस्क व्यक्तीमध्ये चालण्याची पद्धत बदललेली दिसते आणि चालण्याचा वेगही कमी होतो. - संतुलनावर परिणाम
वयस्कर व्यक्तींमध्ये शरीराचा समतोल राखणं कठीण होऊ लागतं. डोळ्यांची, कानांची, कार्यक्षमता कमी होते, पुरेशा व्यायामाअभावी स्नायू देखील पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत. त्यामुळे वेगवान आणि स्थिर हालचालीसाठी लागणारी कान, डोळे आणि स्नायू यांची सुसूत्रता कमी होते. म्हणूनच ज्येष्ठ व्यक्तींमध्ये पाय घसरून पडण्याचा धोका वाढतो. - सांधेदुखी
बहुतेक ज्येष्ठ व्यक्तींना गुडघेदुखी, कंबरदुखी, टाचदुखी अशा समस्या असतात त्यामुळे चालताना वेदना होतात मग अशा व्यक्तींचा कल साहजिकच हालचाल टाळण्याकडे असतो त्यामुळे सुसुत्रता आणि तोल सांभाळण्याची क्षमता आणखी कमी होते. - भीती आणि आत्मविश्वासाचा अभाव
काही ज्येष्ठ व्यक्तींना आधीचा पाय घसरून पडण्याचा अनुभव असतो त्यामुळे नवीन ठिकाणी चालताना, पायऱ्या चढता उतरताना भीती वाटते, आत्मविश्वास कमी होतो. अशावेळी मनात “पडू नये म्हणून चालायलाच नको” असा विचार रुजतो.
हालचाल का महत्त्वाची?
हालचाल ही आरोग्य टिकवण्याची एक अत्यावश्यक प्रक्रिया आहे. ज्येष्ठ व्यक्तींनी दररोज थोडं चालणं, आपल्या प्रकृतीनुसार फिजिओथेरेपिस्टच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करणं आणि शारीरिकदृष्ट्या स्वतःला जास्तीत जास्त ‘अॅक्टिव’ ठेवणं महत्वाचं आहे. यामुळे खालील गोष्टी साध्य होतात:
- हाडं आणि स्नायू बळकट राहतात
- पचनक्रिया आणि झोप सुधारते
- आत्मविश्वास वाढतो
- पडण्याचा धोका कमी होतो
- मानसिक स्थिती चांगली राहते
फिजिओथेरपीचा महत्त्वाचा वाटा
फिजिओथेरपिस्ट वयोवृद्धांच्या चालण्यात आणि संतुलनात येणाऱ्या अडचणी नीट समजून घेतात आणि रुग्णानुरूप सल्ला देतात. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असतो:
चालण्याचं विश्लेषण : चालताना पाय सरळ उचलले जातात का, पावलांमध्ये समतोल आहे का हे तपासलं जातं.
सुसूत्रता वाढवणारे व्यायाम: हालचालींचा वेग वाढवणारे आणि चपळता वाढवणारे व्यायाम हे वयानुसार डिझाईन केले जातात, यात प्रत्येक रुग्णाची विशिष्ट प्रकृती आणि गरज लक्षात घेतली जाते.
तोल सांभाळणारे व्यायाम: वेगवेगळ्या हालचालीं दरम्यान तोल सांभाळता यावा तसाच अनोळखी किंवा असमान पृष्ठभागावर चालताना आत्मविश्वास वाढावा आणि पडण्याची भीती कमी व्हावी यासाठी वेगवेगळे व्यायाम सुरक्षित पद्धतीने करवून घेतले जातात.
स्नायू बळकट करणारे व्यायाम : मांडीच्या आणि गुडघ्याच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांना बळकटी आणण्यासाठी व्यायाम सुचवले जातात, यासोबतच पायाच्या स्नायूंचा लवचिकपणा वाढवणारे व्यायाम देखील समाविष्ट असतात.
वर सांगितलेल्या उपचारांसोबत काही बाह्य घटकांमध्ये देखील बदल करावे लागतात. काही वेळा ज्येष्ठांचा घरातील वातावरण हे त्यांच्या हालचाली पूरक नसतं उदाहरणार्थ टॉयलेटमध्ये आधारासाठी रॉड नसणे, जमीन अतिशय निसरडी असणे, चालताना योग्य वॉकर किंवा काठीचा उपयोग कसा करावा हे माहिती नसणे. या घटकांचा अभ्यास करून यात योग्य ते बदल सुचवले जातात जेणेकरून तोल जाऊन पडण्याची शक्यता कमी होते. वर सांगितलेल्या उपायांसोबत घरात ही काही गोष्टी करता येतात, अर्थात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतरच.
-खुर्चीतून उठताना जोर लावायची गरज पडत असेल, तर त्या हालचालीचा सराव करणं.
-चालताना नजर खाली न ठेवता समोर ठेवणं.
-पायात योग्य ग्रिप असलेले, घसरू नयेत असे शूज वापरणं. वाढलेल्या वयासोबत हालचालींचा वेग मंदावणं, पडण्याची भीती वाटणं, हे टाळण्यासाठी -शरीराची योग्य काळजी घेऊन, योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम करून, सुरक्षित वातावरणात हालचाल सुरू ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे.