हा लेख ज्या वर्गाकरिता आहे, त्यातील बरेचसे वाचक हे वैद्य लोकांचे औषध पथ्यापथ्य ऐकत आले आहेत. ज्यांचा रोजचा हॉटेल, रेस्टॉरंट किंवा बेकरीशी संबंध येतो, किमान एक जेवण किंवा एखादे खाणे बाहेर असते त्यांना शेव, भजी, चिवडा, गाठी, डाळ, ढोकळा, खारी बुंदी, इडली, डोसा, वडे, पावभाजी किंवा पाव, केक, बटर, खारी बिस्किटे किंवा पेढे, बर्फी, मलई, जिलेबी, लाडू बालूशाही, श्रीखंड, लस्सी इत्यादी पदार्थ खावे लागतात.
ज्यांचा अग्नी चांगला आहे. सकाळचा शौचाचा कॉल एकदम क्लिअर असतो.
पोटात कधी गॅस धरत नाही, पोटात अन्न कुजत नाही त्यांना वरील पदार्थांचा सहसा त्रास होत नाही. पण मुंबईसारख्या ठिकाणी बहुतेक नोकरदार लोकांना व्यायामाची आवड नाही, ओळख नाही किंवा वेळ नाही अशी अवस्था असते. त्यात भरीस भर म्हणजे भूक नसताना जेवण व भूक असताना नुसते चहापाणी असे जीवन शहरी नोकरदार व धंदेवाल्यांचे झाले आहे.
प्रश्न असा पडतो की यातील कोणते पदार्थ कोणी खावे, न खावे, काय टाळता येईल, केव्हा खाता येईल, नेहमीच पथ्य पाळावे लागेल का याची उत्तरे आपण शोधत आहोत. ज्यांना वजन वाढवायचे आहे, वजन घटू द्यायचे नाही, भूक मारता येत नाही व फरसाण, बेकरी पदार्थ किंवा मिठाई खाल्ल्याशिवाय चालत नाही त्यांनी हे पदार्थ जरूर खावे, पण वात, पित्त व कफ या तक्रारीप्रमाणे त्यावरील उतारा अनुक्रमे लसूण, ओवा, लिंबू किंवा ताक, धने, जिरे किंवा तुळस, आले, आवळा यांचा तारतम्याने वापर करावा. ‘अन्न वृत्तिकराणां श्रेष्ठम!’ अन्न खाल्ले नाही तर जीवनाचा गाडा चालवता यायचा नाही.

फरसाण

फरसाणातील बहुतांश पदार्थात मिठाचा व तिखटाचा भरपूर वापर असतो. शिवाय ज्या तेलात हे पदार्थ तयार केले जातात त्या तेलाच्या दर्जाची खात्री देता येत नाही. याकरिता पुढील विकारात फरसाण जरूर वर्ज्य करावे. अग्निमांद्य, अजीर्ण, अर्धांगवायू, आम्लपित्त, अ‍ॅलर्जी, आग होणे, आमांश, आव, अंग बाहेर येणे, उदर, उलट्या, उदरवात, कंडू, कफ विकार, कंबर व गुडघेदुखी, कावीळ, केस गळणे, पिकणे, कोड, खोकला गरमी परमा, गोवर, कांजिण्या, वायगोळा, गांधी उठणे, घाम खूप येणे, जखमा, जळवात, जुलाब, जंत, टॉन्सिल्स, डोळ्यांचे विकार, ताप, तोंड येणे, त्वचा विकार, दमा विकार, नागीण, पोटदुखी, पित्तविकार, रक्तदाबवृद्धी, भगंदर, मधुमेह, मलावरोध, महारोग, मुखरोग, मूळव्याध, रक्ताचे विकार, वातविकार, सायटिका, संधिवात, सारायसिस, सूज हृदयरोग व हाडांचे विकार इत्यादी.

बेकरी पदार्थ

बेकरी पदार्थ अग्निमांद्य, अजीर्ण, आम्लपित्त, अ‍ॅलर्जी, आग होणे, आव, उदर, कावीळ, खोकला, वायगोळा, पोटात वायू धरणे, जखमा, जुलाब, जंत, टॉन्सिल्स, त्वचा विकार, पोटदुखी, पित्त विकार, बालरोग, मधुमेह, मलावरोध, मुखरोग, मूळव्याध, लठ्ठपणा, वातविकार, अल्पार्तव, कष्टार्तव, सूज, हृदयरोग इत्यादी विकारात कुपथ्यकारक आहेत. ज्यांना घरचे अन्न मिळत नाही, नाइलाजाने बेकरी पदार्थ खावे लागतात, त्यांनी पाव भाजून टोस्ट करून खावा. ‘घरी केलेला’ पाव फार त्रास देत नाही.

मिठाई

मेवामिठाई, लग्नमुंजीची जेवणे, पाट्र्या, हॉटेलमधील कृत्रिम साखरेचे पदार्थ पुढील विकारात रुग्णांनी खाऊ नये. अग्निमांद्य, अजीर्ण, अर्धांगवायू, आमवात, आव, उदर, उलट्या, कंडू, वायुगोळा, रक्तदाब किंवा रक्तातील साखर वाढून चक्कर येणे, त्वचाविकार, दातांचे विकार, पोटदुखी, पोटात वायू धरणे, रक्तदाबवृद्धी, मधुमेह, मुखरोग, मूळव्याध, लठ्ठपणा, सूज, हृदयरोग इत्यादी. डालडा किंवा अशा कृत्रिम तुपात बनविलेली मिठाई कदापि खाऊ नये.

कोल्ड्रिंक्स

कोल्ड्रिंक्स, लस्सी, बर्फ, फ्रीजचे पाणी, आईस्क्रीम, फ्रुट सॅलड इत्यादी पदार्थ अग्निमांद्या, अजीर्ण, उलट्या, कफ विकार, कंडू, कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, मानदुखी, कानाचे विकार, कावीळ, केसांचे विकार, कॅन्सर, खोकला, गोळा उठणे, छातीत दुखणे, जुलाब, जंत, टॉन्सिल्स वाढणे, डोळ्याचे विकारात ताप, तोंड येणे, त्वचा विकार, दमा, दाताचे विकार, पांडू, पोटदुखी, फुफ्फुस विकार, बालरोग, ब्लडप्रेशर वाढणे, भगंदर, मधुमेह, मूळव्याध, लठ्ठपणा, पोटात वायू धरणे, वातविकार, शय्यामूत्र, सर्दी, सायटिक, संधिवात, सोरायसिस, सूज, हाडांचे विकार, हृदयरोग व क्षय या विकारात कृपथ्यकारक, शरीराला अपाय करणारे आहेत.