शरीरात जाणवणाऱ्या रोजच्या वेदना अनेकजण सामान्य समजतात. पण या वेदना आपल्या प्रत्येक अवयवांवर परिणाम करत असतात. अगदी डोकेदुखीपासून पायांच्या तळव्यांना जाणवणाऱ्या वेदना अनेकदा मोठ्या आजाराचे कारण ठरू शकतात. यात अस्लर, कॅन्सर, मल्टिपल स्केरोसिस, एड्स पित्ताशयाचा आजार, संधिवात, ऑस्टिओआर्थरायटिस सारख्या आजारांमध्ये शरीरात तीव्र वेदना होतात. अशापरिस्थितीत वेळीत उपचार न घेतल्यास हे आजार गंभीर रुप घेऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर विविध आजारांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जगातील सार्वजनिक आरोग्याबाबत जनजागृती निर्माण केली जाते.
सध्याच्या काळात प्रत्येकजण छोट्या-छोट्या शारीरिक वेदनांचा सामना करत आहेत, ज्यातील अनेक छोट्या-छोट्या दुखण्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करता, परंतु असे करणे धोकादायक ठरू शकते. जाणून घेऊया अशा ५ वेदनांबद्दल ज्याकडे दुर्लक्ष करणे टाळले पाहिजे.
‘या’ ५ वेदनांकडे दुर्लक्ष करू नका.
१) डोकेदुखी
अपुरी झोप आणि तणाव यासह अनेक कारणांमुळे डोकेदुखीची समस्या जाणवते, परंतु जर तुम्हाला सतत डोकेदुखीची समस्या जाणवत असेल तर ते मायग्रेनचे लक्षण असू शकते, त्यामुळे ताबडतोब तपासणी करणे हाच उत्तम पर्याय आहे.
२) स्नायूदुखी
व्हिटॅमिन डीची कमतरतेमुळे स्नायूदुखीची समस्या जाणवते. विशेषत: शहरी भागात अनेक घरांमध्ये योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही. यामुळे अनेकांना स्नायू दुखीच्या समस्यांचा सामना करावा लागतो, यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. पण व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी काही खाद्यपदार्थही खाऊ शकतात.
३) छातीत दुखणे
जेव्हा छातीत हलके दुखत असेल तेव्हाच डॉक्टरांना दाखवावे, साधारणपणे हे हृदयविकाराचे एक महत्त्वाचे धोक्याचे लक्षण मानले जाते, विशेषतः शरीराच्या डाव्या बाजूला वेदना सुरू होतात. काळजी न घेतल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
४) सांधेदुखी
दुखापत, सूज आणि वाढती थंडी यासह अनेक कारणांमुळे सांधेदुखीची समस्या जाणवते. सांधेदुखीची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. पूर्वी ही समस्या फक्त प्रौढ आणि वृद्ध लोकांमध्ये दिसून येत होती, परंतु आता अनेक तरुण देखील आता सांधेदुखीच्या समस्येचे बळी पडत आहेत. शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ही समस्या जाणवू शकते.
५) ओटीपोटात दुखणे
आपण सहसा पोटदुखी ही पचनसंस्थेशी संबंधित समस्या मानतो, परंतु ती मूत्रमार्गात संसर्ग, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर किंवा प्रजनन प्रणालीची समस्या असू शकते. पण खरा आजार योग्य तपासणीनंतरच ओळखता येतो.