Heart Disease sign and symptoms in feets: पायांमध्ये सूज येणे, वेदना होणे व लालसरपणा येणे हा सर्व त्रास केवळ जास्त चालणे किंवा उभे राहिल्याने होत नाही, तर तो विविध आरोग्य समस्यांमुळे होऊ शकतो, ज्यामध्ये विविध गंभीर आजारांचाही समावेश आहे. कधी कधी पायांमध्ये सूज आणि वेदना होणे हे तसे चिंतेचे कारण नाही. परंतु, जर हा त्रास कायम राहिला तर, तो हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या समस्या, मधुमेह, रक्त गोठणे, मूत्रपिंड आणि यकृताचे आजार, लोह किंवा पौष्टिकतेची कमतरता यांसारख्या अनेक अनारोग्यकारक समस्यांचे मूळ असू शकतो. शरीरात आवश्यक पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे नसा कमकुवत होतात आणि थकवा, पेटके किंवा पाय सुन्न होऊ शकतात.
परंतु, जर तुम्हाला वारंवार पायांच्या समस्या सतावत असतील, तर ते तुमच्या हृदयाला धोका असल्याचे स्पष्ट लक्षण असू शकते. तुमच्या पायांच्या स्नायूंमध्ये होणारे बदल हृदयाच्या आरोग्याचे संकेत देऊ शकतात.
आपले पाय आणि खालचे अवयव अनेकदा आपल्या हृदय आणि रक्ताभिसरण प्रणालीबद्दल सूक्ष्म संकेत देतात; परंतु बहुतेक लोक गंभीर लक्षणे दिसून येईपर्यंत त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतात. पाय किंवा घोट्यांना सूज येणे, सतत थंडी वाजणे किंवा जखमा यांसारख्या समस्या हृदय, रक्तवाहिन्या किंवा इतर प्रणालीगतच्या समस्या दर्शवू शकतात आणि त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
एका इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये भूलतज्ज्ञ व वेदनाशामक डॉक्टर डॉ. कुणाल सूद यांनी पायांमध्ये दिसणारी काही लक्षणे हृदयरोगाची लक्षणे असल्याचे वर्णन केले. ते म्हणाले की, तुमच्या खालच्या अंगांमधील बदल बहुतेकदा तुमचे हृदय, रक्तवाहिन्या किंवा रक्ताभिसरण प्रणाली यांमध्ये काय चालले आहे हे दर्शवतात. तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, थंड पाय किंवा रंगात होणारे बदल किरकोळ वाटू शकतात; परंतु ती लक्षणे गंभीर असू शकतात. हृदयाला धोका असल्याची कोणती लक्षणे पायांमध्ये दिसून येतात ते तज्ज्ञांनी सांगितली आहे ती लक्षणे जाणून घेऊया.
व्हेरिकोज व्हेन्स हे हृदयरोगाचे लक्षण
व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे पसरलेल्या आणि वळलेल्या वरवरच्या शिरा असतात. या स्थितीमुळे पाय किंवा पायांमध्ये निळ्या किंवा उंचावलेल्या शिरा दिसतात. अशा शिरा हृदयाच्या आरोग्याला धोका असल्याचे लक्षण असू शकतात.
घोट्याला सूज येणे
रक्ताभिसरण मंदावते किंवा शिरांमध्ये दाब वाढतो तेव्हा सूज येऊ शकते. जुनाट शिरासंबंधीच्या आजारामुळे पायांत जडपणा, वेदना आणि सूज येते, जी दीर्घकाळ उभे राहिल्याने आणखी वाढते.
चालताना वेदनांसह थंड पाय
हे पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD)मुळे होऊ शकते. या स्थितीत शिरा अरुंद झाल्यामुळे रक्तपुरवठ्याचे कार्य मर्यादित प्रमाणात होत, ज्यामुळे चालताना पायांमध्ये पेटके आणि वेदना होतात, या स्थितीला इंटरमिटंट क्लॉडिकेशन म्हणतात.
पायवर लालसरपणा किंवा सूज
लक्षणे म्हणजे एका बाजूला उष्णता, लालसरपणा, वेदना व सूज. जोखीम घटकांमध्ये निष्क्रियता, दुखापत, कर्करोग, गर्भधारणा आणि काही आनुवंशिक रक्त गोठण्याचे विकार यांचा समावेश आहे.
पायाच्या बोटांवर किंवा घोट्यांवर सतत व्रण असणे
खराब रक्ताभिसरणामुळे ऊतींपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही आणि जखमा बऱ्या होण्यापासून रोखल्या जातात. घोटे, पाय किंवा बोटांवर न बरे होणारे व्रण हे पीएडीचे गंभीर लक्षण असू शकते आणि उपचार न केल्यास गँगरीनचा धोका वाढतो.