Cancer Symptoms in Women: छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी, ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्रिया मराठे आता या जगात नाही. केवळ ३८ वर्षांच्या तरुण वयात प्रियाने कर्करोगाशी लढता लढता अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण मनोरंजनसृष्टी आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. ‘पवित्र रिश्ता’मध्ये प्रिया हिनं अंकिता लोखंडेच्या बहिणीचं म्हणजे ‘वर्षा’चं पात्र साकारलं होतं. तिला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. त्यानंतर मराठी मालिकांमध्येही तिनं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. पण, आयुष्याच्या या टप्प्यावर कर्करोग नावाच्या निर्दयी आजारानं तिचं सगळ्या स्वप्नांसह करिअर आणि आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकलं.

रविवार, ३१ ऑगस्ट २०२५ रोजी प्रिया मराठेनं मिरा रोड येथील आपल्या घरी अखेरचा श्वास घेतला. काही काळापासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. सुरुवातीला उपचारांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात होतं; पण अचानक आजारानं आक्रमक रूप धारण केलं. शरीरावरील कर्करोगाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि शरीरानं उपचारांना प्रतिसाद देणं थांबवलं. कमी वयात कर्करोगासारख्या गंभीर आजाराने तिची जीव घेतला. कमी वयात कर्करोग होण्याची प्रकरणे वाढत चालली आहे. प्रिया मराठेच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून, महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे.  मात्र, धक्कादायक बाब म्हणजे तिला अजूनही नेमका कोणता कर्करोग झाला होता ते स्पष्ट झालेलं नाही.

कर्करोग : शरीराला शांतपणे विळख्यात घेणारा घातक शत्रू

कर्करोग हा आजार जगातील सर्वांत भयंकर आजारांपैकी एक मानला जातो. सर्वांत मोठी धोकादायक बाब म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात हा आजार ओळखू येत नाही. लक्षणं अगदी साधी-सुधी वाटतात आणि रुग्णाला उशिरा त्याची जाणीव होते, तोपर्यंत परिस्थिती गंभीर झालेली असते. कर्करोगाचे वेळेवर निदान झाल्यास उपचार शक्य आहेतच; मात्र उशिरा कळल्यास जीव वाचवणं अत्यंत कठीण ठरतं.

‘या’ कॅन्सरच्या लक्षणांना अजिबात करू नका दुर्लक्ष!

  • सतत थकवा जाणवणं
  • अनपेक्षित वजन कमी होणं
  • शरीरात गाठ निर्माण होणं
  • सतत खोकला राहणं
  • पचनाच्या समस्या
  • अचानक रक्तस्राव होणं

वरील लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा; अन्यथा परिणाम जीवघेणे ठरू शकतात.

प्रिया मराठेच्या निधनानं मराठी-हिंदी मालिकांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एक उमदं आयुष्य कर्करोगाच्या पडछायेत हरपलं आणि पुन्हा एकदा या दुर्धर आजाराची भीषणता लोकांसमोर आली.