How To Clean Hidden Spots In Home : घर स्वच्छ आणि नीटनेटके दिसावे असे आपल्याला सगळ्यांनाच वाटते. त्यासाठी दिवसातून दोनदा झाडू, दोनदा लादी पुसणे असे आपण करतच असतो. पण, घरातील काही छोट्या छोट्या ठिकाणांकडे आपल्या सगळ्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे या छोट्या वस्तू सहसा आपल्याकडून स्वच्छ केल्या जात नाहीत. तर घरातील ही ठिकाणे, छोट्या जागा, वस्तू कोणत्या आहेत आणि त्याची स्वछता का महत्त्वाची आहे याचबद्दल आपण या बातमीतून जाणून घेऊयात…
१. लाईट स्विच आणि दरवाजाचे हँडल
लाईटच्या स्विच आणि दरवाजाच्या हँडलला आपण सतत स्पर्श करत असतो. त्यामुळे त्यात अनेक प्रकारचे जीवाणू, विषाणू शकतात. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा जंतुनाशकाने या दोन्ही वस्तू स्वच्छ केल्याने जंतू कमी होऊ शकतात.
२. रिमोट आणि गेम कंट्रोलर्स
साफसफाई करताना आपण अनेकदा बारीक-बारीक गोष्टी विसरून जातो. त्यात रिमोट आणि गेम कंट्रोलर्सचा समावेश आहे. टीव्ही बघताना आणि गेम खेळताना आपण चिप्स खात असतो. त्यामुळे घाण, तेल आणि सूक्ष्मजंतू सहजपणे या वस्तूंवर गोळा होतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा मायक्रोफायबर कापड किंवा कापसावर रबिंग अल्कोहोल वापरून स्वच्छ करायला विसरू नका.
३. बाथरूममधील एक्झॉस्ट फॅन आणि व्हेंट्स
बाथरूमसारख्या ओल्या ठिकाणी धूळ आणि बुरशी लवकर जमा होऊ शकते. महिन्यातून किमान एकदा एक्झॉस्ट फॅनचे कव्हर आणि व्हेंट्स स्वच्छ करा. त्यामुळे हवा खेळती राहते.
४. फर्निचर आणि विविध उपकरणे
सोफा, बेड, रेफ्रिजरेटर व वॉशिंग मशीनखाली धूळ, अन्नाचे तुकडे आणि पाळीव प्राण्यांचे केस जमा होऊ शकतात. दर १ ते २ महिन्यांनी या जागा स्वच्छ केल्याने अॅलर्जी आणि कीटक कमी होण्यास मदत होऊ शकते.
५. टूथब्रश होल्डर आणि साबण ठेवायचा बॉक्स
बाथरूममधील या ॲक्सेसरीजकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. पण, त्यामध्ये पाणी, साबण आणि जीवाणू जमा होऊ शकतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा या ॲक्सेसरीज कोमट साबणयुक्त पाण्याने आणि ब्रशने स्वच्छ करा.