मध हा आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे आपण सर्वच जाणतो. परंतु, हल्ली बाजारात भेसळयुक्त मधाच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. या कारणाने मधाच्या सेवनामुळे कोणताच फायदा होताना दिसत नाही. शुद्ध मध आणि भेसळयुक्त मधामधील फरक कसा ओळखाल हे जाणून घेणे फायद्याचे ठरणार आहे. तसं म्हटल तर शुद्ध आणि भेसळयुक्त मध दिसायला एकसारखेच असतात. त्यामुळे त्यांच्यातील फरक ओळखणे कठीण जाते. भेसळयुक्त मधात शुगर सिरप, कॉर्न सिरप आणि अनेक फ्लेव्हर्स मिसळून हुबेहुब मधाप्रमाणे बनविण्याचा प्रयत्न केला जातो. या पार्श्वभूमीवर शुद्ध मधाची परीक्षा कशी करावी हे जाणून घेऊया.
अंगठा परीक्षा – यासाठी मधामध्ये अंगठा बुडवून बाहेर काढावा. मध अंगठ्यावरून गळून खाली पडला आहे अथवा अंगठ्याला चिकटून राहिला आहे ते पाहावे. मध अंगठ्याला चिकटून राहिला असले तर तो मध शु्द्ध असल्याचे समजावे. भेसळयुक्त मध पाण्याप्रमाणे अंगठ्यावरून गळून खाली पडेल.




आयोडीन परीक्षा – आयोडिनचा वापर करूनदेखील मधाच्या शुद्धतेची परीक्षा करता येते. थोडासा मध घेऊन पाण्यात मिसळा आणि त्यात आयोडीन टाका. आयोडीन मिसळल्यानंतर या मिश्रणाला निळा रंग प्राप्त झाल्यास मधात स्टार्च अथवा तत्सम पदार्थाची भेसळ करण्यात आल्याचे समजावे.
पाणी परीक्षा – या परीक्षेत एक ग्लास पाण्याच्या वापर करून तुम्ही शुद्ध मधाची परीक्षा करू शकता. यासाठी ग्लासभर पाण्यात एक चमचा मध घाला. जर मध पाण्याच्या तळाशी गेला तर तो मध शुद्ध असल्याचे समजावे. जर मध पाण्यात मिसळला तर त्या मधात भेसळ असल्याचे समजावे.
अग्नी परीक्षा – प्रज्ज्वलित होणे ही शुद्ध मधाची परीक्षा आहे. एका पेटलेल्या काडीपेटीच्या काडीने थोड्याशा मधाला आग लावून पाहावी. मधाने पेट घेतल्यास तो मध शुद्ध असल्याचे समजावे.