उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे खूप चिडचिड होते. या दिवसांत न सोसवणारा सूर्यप्रकाश, धूळ आणि घामामुळे दुपारी घराबाहेर पडण्याची इच्छा होत नाही. यात बाहेर पडल्यानंतर शरीरातून वाहणाऱ्या घामाच्या धारांमुळे अजिबात फ्रेश वाटत नाही, कामात पटकन लक्ष लागत नाही. उन्हाळ्यात बाहेरून आल्यानंतर सारखी अंघोळ करावीशी वाटते. अंघोळ केल्याने उष्णतेपासून आराम मिळतोच, पण त्यामुळे शरीरात साचलेला घाम, बॅक्टेरिया आणि जंतूंपासून सुटका होते. सकाळी अंघोळ केल्यानंतर दिवसभर फ्रेश वाटावे असे प्रत्येकाला वाटते. पण दुपारी घाम येतो. अशा परिस्थितीत घामामुळे अंग चिकट होते आणि खूप दुर्गंधी येते. मात्र या समस्येपासून सुटका करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती टिप्स देणार आहोत. त्या फॉलो करून तुम्ही दिवसभर फ्रेश राहू शकता. तुम्ही अंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिसळून अंघोळ करू शकता. यामुळे तुम्हाला फ्रेश तर वाटेलच त्या सोबत खाज येणे, घाम येणे इत्यादी समस्यांपासून आराम मिळवू शकता. चला तर मग ते कोणते पदार्थ आहेत आहेत जाणून घेऊ…

कडुलिंबाची पाने

कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेचे वेगवेगळ्या बॅक्टेरियांपासून संरक्षण करतात. उन्हाळ्यात तुम्ही अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने किंवा कडुलिंबाचे तेल मिसळून अंघोळ करू शकता. ज्यामुळे त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे, मुरूम इत्यादी समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते आणि तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटू शकते.

हळद

हळदीमध्येही अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-एजिंगसारखे अनेक गुणधर्म असतात. जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात, उन्हाळ्यात हळद पाण्यात मिसळून अंघोळ केल्यास त्वचेवरील पिंपल्स, रॅशेसपासून आराम मिळू शकतो, शिवाय त्वचा चमकदार होण्यास मदत होते आणि टॅनिंग कमी होते.

गुलाबाच्या पाकळ्या

अंघोळीच्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून अंघोळ केल्यास दिवसभर ताजेतवाने वाटू शकते. मानसिकदृष्ट्यादेखील तुम्ही फ्रेश राहून काम करू शकता. याशिवाय तुमचा मूडही दिवसभर चांगला राहील. तसेच त्वचा ताजी राहते आणि घामामुळे येणारी दुर्गंधीही कमी होण्यास मदत होते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)