How To Get Rid Of Earthworms In Home : पावसाळ्यात घरात कितीही स्वच्छता ठेवली, तरी लहान कीटक, पाली, झुरळ व गांडूळ घरात येतातच. मुख्यत: इमारतीच्या तळमजल्यावर किंवा चाळीत राहणाऱ्या लोकांना त्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बाथरूममध्ये तर सर्रास हे सर्व येत असतात. इतकेच नाही, तर ते हळूहळू रेंगाळत घरभरही पसरतात. मुसळधार पावसात बऱ्याचदा घराच्या पायऱ्या, बाल्कनी व गटारे यांतून मोठ्या प्रमाणात गांडूळ घरात शिरतात. अनेकांना गांडुळांना हात लावणेही नकोसे वाटते. त्यामुळे ते गांडुळांना लहान काठी किंवा कागदाच्या मदतीने उचलताना अंगावर शिसारी आल्यासारखे करीत बाहेर फेकतात. पण, आज आपण हात न लावताही गांडुळांना घरापासून दूर ठेवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, जे केल्यास घरात पुन्हा कधी गांडूळ दिसणार नाहीत.
गांडुळे सहसा ओलसर आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध मातीत राहतात; पण पावसाळ्यात मातीत पाणी साचत, ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. अशा परिस्थितीत गांडुळे ऑक्सिजनच्या शोधात पृष्ठभागावर येतात आणि पाण्याचा प्रवाह किंवा ओलाव्याच्या शोधात ते घराचा दरवाजा, पायऱ्या, बाल्कनी किंवा गटारांमधून तुमच्या घरात प्रवेश करतात.
गांडुळांना घरापासून दूर ठेवण्यासाठी सोपे उपाय
काही प्रभावी व सोप्या उपायांच्या मदतीने तुम्ही गांडुळांना स्पर्श न करताही त्यांना तुमच्या घरापासून दूर ठेवू शकता.
१) मिठाचा वापर
मीठ गांडुळांसाठी नैसर्गिक उपाय म्हणून काम करते. मिठातील क्षार गांडुळांना मारून टाकतात. त्यामुळे जिथे गांडूळ अधिक प्रमाणात दिसतात, त्या जागी थोडे मीठ शिंपडा, जसे की पायऱ्या किंवा गटारावर आणि बाथरूममध्ये. तुम्ही गांडुळांवर थेट थोडे मीठदेखील टाकू शकता.
२) लिंबू आणि पाण्याचे मिश्रण
पावसाळ्यात घरात सतत गांडूळ येत असतील, तर त्या जागी लिंबू आणि पाण्याचे मिश्रण शिंपडा. कारण- लिंबातील आम्लपणामुळे गांडूळ घरापासून दूर राहतात. त्यासाठी एका स्प्रे बाटलीमध्ये लिंबाचा रस आणि समान प्रमाणात पाणी मिसळा. हे मिश्रण ज्या ठिकाणी गांडूळ दिसतात किंवा जिथे येतात तिथे स्प्रे करा. तुम्ही लिंबाच्या जागी व्हिनेगरदेखील वापरू शकता.
३) हळद पावडर
हळद हा आणखी एक नैसर्गिक पर्याय आहे, जो गांडुळांना दूर ठेवण्यास मदत करू शकतो. जिथे गांडुळे दिसतील, तिथे कोरडी हळद पावडर शिंपडा. हळदीमध्ये अशी काही संयुगे असतात, जी गांडुळांचा नायनाट करतात.
४) डांबर गोळ्या
बाथरूम मध्ये व घरातील सर्व कानाकोपर्यात आपण नेप्थलीन बॉल म्हणजे डांबर गोळ्या पसारवून ठेवा
५) ब्लिचिंग पावडर
बाथरूम व टॉयलेटमध्ये किंवा घराबाहेरील गटरावर ब्लिचिंग पावडर टाका. या पावडरचा गंध खूप उग्र असतो त्यामुळे एक दिवस आड टाकू शकता. किंवा काही वेळ ठेवून व फारशी घासून धुवून काढू शकता.