How To Remember Small Things : एखादी गोष्ट आठवणीत राहावी म्हणून जवळ ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी नक्की कोणत्या ठिकाणी ठेवली याचा विचार करत बसायचा. एक वस्तू शोधायला जायची आणि दुसरीच वस्तू शोधून परत यायचे. याचबरोबर पासवर्ड, वाढदिसाच्या तारखा, नाव लक्षात न राहणाऱ्याच्या समस्या आपल्या सगळ्यांसमोरच उद्भवतात. मग नक्की या गोष्टी लक्षात का राहत नाही, या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी नेमकं काय करावं? याच्याबद्दल आपण या बातमीतून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात…

तर तुमच्याबरोबरही असेच घडत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. या परिस्थितीला लेथोमँथिया असे म्हणतात. ही अशी अवस्था आहे जिथे तुम्हाला एखादी गोष्ट खूप मनोरंजक वाटते. पण, ती लक्षात ठेवता येत नाही. मानसोपचारतज्ज्ञ, न्यूरोसायंटिस्ट आणि तत्वज्ञानी इयान मॅकगिलक्रिस्ट यांनाही कधीकाळी अशीच अडचण यायची. मग या समस्येसाठी त्यांनी नेक्सस मेथड (Nexus Method) तयार केली.

त्यांनी सुरवातीला ७० महत्वाचे शब्द वेगवेगळ्या कागदावर लिहून काढले आणि प्रत्येक शब्दासाठी एक छोटी टीप दुसऱ्या कागदावर लिहून काढली. उदाहरणार्थ झोप हा महत्वाचा शब्द आणि टीप म्हणून दुसऱ्या कागदावर तुम्ही ७ ते ८ तास झोप घ्या. अशाप्रकारे ७० शब्द आणि त्यांच्या टिप्स लिहून त्याचे छोटे तुकडे करून कागद ड्रॉईंग रूममध्ये उलटून सुलातून पसरवून ठेवले. त्यानंतर त्यांनी ७० शब्द आणि त्याच्या योग्य टिप्स शोधून काढल्या.

अशाप्रकारे एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी त्याचे लहान गटात विभाजन केले ज्यामुळे लक्षात ठेवायला आणि आठवायला सोपे जाते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

इयान मॅकगिलक्रिस्ट यांची नेक्सस पद्धती…

थीम कार्ड तयार करा – एखादी संकल्पना, शब्द किंवा वस्तुस्थिती लक्षात ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे थीम कार्ड. पुस्तक, व्याख्यान किंवा पॉडकास्टमधील एखादा विषय निवडा आणि एका कार्डवर लिहा. प्रत्येक कार्डावर एकाच विषयाची माहिती लिहा. म्हणजे गोंधळ उडणार नाही. वेळोवेळी ही कार्ड्स वाचत गेलो की, आपल्या मेंदूत एक मॅप ऑफ मिनिंग म्हणजे अर्थांचा नकाशा तयार होतो. त्यामुळे आपण फक्त माहिती वाचत नाही, तर त्यात सक्रियपणे गुंततो आणि ॲक्टिव्ह लर्नर बनतो.

सर्च करा – आता प्रत्येक थीमचा विस्तार करणारी माहिती गोळा करा. यामध्ये पुस्तके वाचणे, पॉडकास्ट ऐकणे किंवा ट्यूटोरियल पाहणे यांचा समावेश करा. त्या थीम संबंधित वेगवेगळी माहिती जोडून ते कार्ड अपडेट सुद्धा करा. यामुळे तुमची आकलनशक्ती वाढते आणि आपण जे शिकतो, ऐकतो ते लक्षात ठेवण्याची क्षमता मजबूत होते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास जेव्हा केव्हा तुम्हाला एखादी उपयुक्त माहिती मिळते तेव्हा ती लगेचच संबंधित कार्डवर लिहून काढायची आणि ती वाचत रहायची.

तुमच्या कल्पना जोडा – प्रत्येक थीमबद्दलचे तुमचे वैयक्तिक विचार कार्ड्सवर लिहा. यामुळे ज्ञान केवळ आत्मसात केले जाणार नाही तर वैयक्तिकृत देखील केले जाईल. यामुळे एखाद्या नवीन माहितीला आपण स्वतःच्या कल्पनांशी जोडून, ​​स्मरणशक्ती मजबूत करतो.

एकमेकांशी कनेक्ट करा – ज्याप्रमाणे आपण आपल्या जीवनातील लोकं, ठिकाणे आणि घटनांना जोडतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संकल्पनांना एकमेकांशी जोडता येते. यामुळे कल्पनांचं एक जाळ तयार होते जे आठवणीत राहते आणि प्रत्यक्षात वापरता सुद्धा येते. थोडक्यात, संकल्पना जोडल्या की त्या वेगळ्या-वेगळ्या तुकड्यांसारख्या न वाटता, एकत्रित ज्ञानासारख्या वाटतात.