Beetroot face Serum : आजच्या काळात प्रत्येकाची इच्छा असते की, त्यांची त्वचा आरोग्यदायी, मऊसर आणि गुलाबी दिसावी. परंतु, त्यासाठी बऱ्याच जणांचा कल महागड्या मार्केटमधील प्रॉडक्ट्सकडे असतो. हे प्रॉडक्ट्स चमकदार पॅकेजिंगसह विकले जातात; पण त्यामध्ये असलेल्या रसायनांमुळे त्वचेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. खरं पाहता, सुंदर आणि आरोग्यदायी त्वचेसाठी नेहमीच महागड्या प्रॉडक्ट्सची गरज नसते. निसर्गात असेही अनेक घटक आहेत, जे त्वचेची नैसर्गिक चमक टिकवून ठेवतात. त्यापैकी एक उत्तम पर्याय म्हणजे बीट रूट फेस सिरम.

बीट रूटमध्ये असंख्य व्हिटॅमिन्स, मिनरल्स व अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक त्वचेला आतून पोषण देतात. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबीपणा आणि तजेला दिसू लागतो. बीट रूटमध्ये असलेले बीटालाइन त्वचेच्या रंगावर अप्रतिम परिणाम करते. त्याशिवाय हे रक्तशुद्धीकरणासाठी उपयुक्त असल्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये कमी होतात आणि चेहऱ्यावरचा निखार अधिकच खुलून दिसतो. त्यामुळे घरीच साध्या पद्धतीने बीट रूट फेस सिरम तयार करून त्याचा वापर केला, तर महागड्या रसायनयुक्त उत्पादनांवर खर्च करण्याची गरज भासत नाही.

बीट रूट सिरम बनविण्यासाठी लागणारे साहित्य

१ छोटा कच्चा बीट रूट

१ मोठा चमचा अॅलोवेरा जेल

२ छोटे चमचे गुलाबपाणी

१ छोटा चमचा बदाम तेल

हे सर्व साहित्य सहज उपलब्ध होते. त्यापैकी प्रत्येक घटक त्वचेच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर आहे. अॅलोवेरा जेल त्वचेला हायड्रेट करतं, गुलाबजल त्वचेला थंडावा देतं आणि बदाम तेलात असणारे व्हिटॅमिन ई त्वचेची लवचिकता वाढवतात.

बीट रूट सिरम तयार करण्याची पद्धत

सर्वप्रथम बीट रूट स्वच्छ धुऊन छोटे तुकडे करून घ्या. त्याची बारीक पेस्ट मिक्सरमध्ये तयार करा. या पेस्टमध्ये अॅलोवेरा जेल आणि गुलाबपाणी घालून चांगलं एकत्र करा. अखेरीस बदाम तेल मिसळा आणि हे मिश्रण एका स्वच्छ, काचेच्या हवाबंद बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. सिरमला थंडावा मिळाल्यामुळे ते अधिक काळ टिकतं आणि ते वापरल्यानंत त्वचा ताजेतवानी झाल्यासारखी वाटते.

सिरम वापरण्याची योग्य पद्धत

बीट रूट सिरम सकाळी आणि रात्री दोन्ही वेळा वापरता येतो. चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा हलक्या फेसवॉशने स्वच्छ धुऊन कोरडा करा. मग सिरमचे काही थेंब घेऊन चेहरा व मान यांवर हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि सिरम त्वचेत चांगल्या प्रकारे शोषलं जातं.

बीट रूट सिरमचे फायदे

१. गुलाबी तजेला : बीट रूटमधील बीटालाइन त्वचेला नैसर्गिक गुलाबी रंग देतो.

२. हायड्रेशन: अॅलोवेरा जेलमुळे त्वचेतील कोरडेपणा दूर होतो.

३. थंडावा आणि ताजेपणा: गुलाबजलामुळे चेहऱ्यावर फ्रेश लूक दिसतो.

४. त्वचेची लवचिकता: बदाम तेलामुळे त्वचा मऊ आणि टवटवीत राहते.

५. रसायनमुक्त काळजी: घरच्या घरी बनवल्यामुळे त्यामध्ये रसायनं नसतात. त्यामुळे साइड इफेक्ट्सची भीती राहत नाही.