How To Reduce Bitterness Of Bitter Gourd While Cooking : बाजारात भाजी खरेदीसाठी गेल्यानंतर आपण फ्लॉवर, सिमला मिरची, मटार, वांगी यांसारख्या भाज्या पटकन विकत घेतो. मात्र, सर्वांत कमी आणि बहुतांशी दुर्लक्षित भाजी म्हणजे कारली. या भाजीचा कडवटपणा, त्याचे काटेसदृश आवरण किंवा एकंदरीत त्याचे नाव ऐकूनच अनेकांना ती खाण्याची अनिच्छा होते. प्रत्येक भाजीचे आपापले गुणधर्म असतात. पण, तुम्हाला कारल्याचा कडवटपणा आवडत नसेल, तर तुम्ही पुढील उपाय करून पाहू शकता…

कारल्याचा कडवटपणा कमी करण्याच्या टिप्स खालीलप्रमाणे…

योग्य प्रकारे मीठ वापरा –

कारल्याचे तुकडे सोलून बारीक काप करा, त्यावर भरपूर मीठ शिंपडा आणि २० ते ३० मिनिटे ते तसेच राहू द्या. जेव्हा तुम्हाला वाटेल की, कारल्याच्या तुकड्यांमधून पाणी सुटत आहे, तेव्हाच त्यातील कडूपणा बाहेर येईल. त्यानंतर ते कारल्याचे तुकडे साध्या पाण्याने कमीत कमी तीन ते चार वेळा धुवा; जेणेकरून त्यातील जास्त मीठ आणि कडवटपणा निघून जाईल.

व्हिनेगर आणि साखर वापरा –

कापलेले कारले व्हिनेगरच्या पाण्यात भिजवल्याने त्यातील कडवटपणा कमी होतो. एका वाटी पाण्यात एक चमचा व्हिनेगर आणि दोन चमचे साखर मिसळा. त्यात कापलेले कारले किमान ३० मिनिटे भिजवा. आता शिजविण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

बिया काढून टाका –

कधी कधी कारल्यातील कडवटपणा बिया व आतील खड्ड्यात जास्त प्रमाणात असतो. कापलेले कारले वापरण्यापूर्वी त्यातील बिया काढून टाका. हे छोटेसे पाऊल पौष्टिक मूल्य कमी न करता, चवीत मोठा फरक निर्माण करू शकते.

दह्यात भिजवणे –

आणखी एक सोपी पद्धत म्हणजे कारल्याचे तुकडे दह्यात सुमारे ३० मिनिटे भिजवून ठेवावेत. दह्याच्या नैसर्गिक आंबटपणामुळे कडवटपणा कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे कारल्याला थोडी तिखट चव येईल,ज्यामुळे तुमचा पदार्थ आणखी स्वादिष्ट बनतो.

त्याचबरोबर कांदे, टोमॅटो, लसूण, मसाले व दही यांसारख्या तीव्र चवींसह कारले शिजविल्याने कडवटपणा नैसर्गिकरीत्या कमी होण्यास मदत होते. या सोप्या पद्धतींमुळे तुम्हाला कारल्याचे सर्व आरोग्यदायी फायदे मिळतील आणि कडवटपणासुद्धा जाणवणार नाही.