सध्याच्या कामाच्या पद्धतींमुळे आणि सतत वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्युटर, लॅपटॉप व फोन स्क्रीनमुळे साहजिकच आपल्या डोळ्यांवर ताण येतो. डोळ्यांवर असा ताण येण्याने त्याचा परिणाम तुमच्या कामावर तर होतोच; पण सोबत शारीरिक व मानसिक तणावही जाणवतो. अक्षर योगा या संस्थेचे संस्थापक, हिमालयन सिद्ध अक्षर यांनी, हिंदुस्थान टाइम्सच्या लाइफस्टाइल विभागाला दिलेल्या मुलाखतीमध्ये डोळ्यांची निगा राखण्यासाठी आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत, त्या काय आहेत ते पाहू.
१. स्क्रीनकडे पाहण्याचा वेळ कमी करावा
तुम्ही दिवसभरात किती तास फोन, लॅपटॉप स्क्रीनसमोर घालवता ते लक्षात घेऊन तो जमेल तितका कमी करण्याचा प्रयत्न करा.
२. कामादरम्यान मधे मधे विश्रांती घ्या
शक्यतो एका दमात जास्त काम करणे टाळावे. म्हणजेच तुम्ही काम करताना मधे मधे विश्रांती घेणे गरजेचे असते. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना आवश्यक असणारा आराम मिळेल आणि त्यांच्यावर कमी प्रमाणात ताण येईल.
३. मंद प्रकाशात बसणे टाळा
तुम्ही जेव्हा काही काम करत असाल तेव्हा भरपूर उजेड असणाऱ्या ठिकाणी बसावे. वाचताना किंवा कोणतेही काम करताना कमी प्रकाश असल्यास किंवा खोलीत मंद उजेड असल्यास डोळ्यांवर ताण येतो.
४. फ्लोरोसंट [Fluorescent] रंगांच्या दिव्यांपासून दूर राहा
फ्लोरोसंट रंगाचे दिवे डोळ्यांसाठी त्रासदायक ठरून, त्याच्या परिणाम दृष्टीवर होऊ शकतो. त्यामुळे अशा रंगांच्या दिव्यांपासून जमेल तेवढे दूर राहणे चांगले.
हेही वाचा : तुम्हीही चहामध्ये साखरेऐवजी गूळ घालून पित आहात? मग पाहा, हे गुळाच्या चहाचे पाच आरोग्यदायी फायदे…
योगासनांचे डोळ्यांना कोणते फायदे होतात?
“काही ठरावीक योगासनांनी तुमच्या डोळ्यांवरील ताण कमी होण्यास, डोळ्यांवरील थकवा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनात योगासने करणे डोळ्यांसाठी उपयुक्त ठरते,” असेदेखील अक्षर यांनी सांगितले. त्यासोबतच त्यांनी काही योगासने सांगितली आहेत; जी तुमच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन, त्यावरील ताण कमी करण्यास मदत करतील.
ताडासन
जमिनीवर उभे राहून दोन्ही पायांचे अंगठे आणि टाचा एकमेकांना जोडलेले ठेवावेत. आता चवड्यांवर उभे राहून दोन्ही हात डोक्यावर ताणून धरावे. संपूर्ण शरीर काही सेकंदांसाठी ताणून धरलेले असताना नाकाने ८ ते १० वेळा मोठे श्वास घ्यावेत.
हेही वाचा : हिवाळ्यात लिंबाच्या मदतीने ठेवा वजनावर नियंत्रण; पाहा लिंबूपाणी पिण्याचे हे पाच फायदे
पदहस्तासन
हे आसन करण्यासाठी सुरुवातीला ताठ उभे राहावे. नंतर श्वास सोडून, कंबरेतून पुढच्या दिशेने वाकावे. आपल्या हाताचे दोन्ही तळवे, दोन्ही पावलांच्या बाजूला जमिनीवर ठेवून, दोन्ही गुडघे ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. छाती आणि गुडघे एकमेकांना चिकटवण्याचा प्रयत्न करून, तुम्हाला शक्य असेल तितका वेळ हे आसन करा.
शीर्षासन
या आसनाची सुरुवात वज्रासनाने करावी. आपले दोन्ही हात जमिनीवर ठेवून, हातांच्या तळव्यावर आपले डोके ठेवावे. आता हळूहळू आपले पाय आणि पाठ भिंतीच्या दिशेने पुढे सरकवून पाठ भिंतीला चिकटवावी. आता आपले दोन्ही पाय कंबरेतून आरामात वर भिंतीला समांतर असे वर उचलून धरावे. आपल्या शरीराचा तोल सांभाळत तुम्हाला शक्य असेल तितका वेळ हे आसन करा.