Can Beetroot Help Sex Drive: ऑस्ट्रेलियन सुपरमार्केटमध्ये मागील काही महिन्यांमध्ये टिन कॅनमधील बीटरूटचा तुटवडा भासत आहे. ईबेसारख्या साईट्सवर AUD 65 पेक्षा जास्त किमतीला कॅन बीटरूट विकले हात आहे. बीटरूटचे फायदे पाहता लोकांनी या कंदमुळाचे सेवन वाढवल्याची बातमी नक्कीच आनंददायी असू शकते पण आश्चर्य म्हणजे एका भलत्याच दाव्यामुळे बीटरूटची विक्री वाढली आहे.

यूके टीव्ही डॉक्टर मायकेल मॉस्ले यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात बीटरूट ही भाजी व्हायग्रा सारखी काम करू शकते असं म्हटलं होतं. पण खरोखरच यात तथ्य आहे का? सेक्ससाठीच्या फायद्यांशिवाय बीटरूट आपल्या शरीराला रक्तदाब कमी करण्यासाठी किंवा तुमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी कामी येऊ शकतं का याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

बीटरूटमध्ये विशेष काय आहे?

बीटरूट हे एक सुपरफूड आहे, ज्यात विशिष्ट जीवनसत्त्वे आणि खनिजांची प्रति ग्रॅम सरासरी पातळी अधिक असते. बीटरूटमध्ये विशेषतः व्हिटॅमिन बी आणि सी, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.महत्त्वाचं म्हणजे विविध पद्धतींनी शिजवल्यावरही या कंदमुळाच्या अँटिऑक्सिडंट पातळीत लक्षणीय बदल होत नाहीत. असं असलं तरी प्रेशर कुकिंगमुळे कच्च्या बीटरूटमधील कॅरोटीनॉइड (एक प्रकारचा अँटिऑक्सिडंट) कमी होऊ शकतो.

कॅप्सूल, पावडर, चिप्स किंवा ज्यूस बनवण्याची प्रक्रिया केल्याने बीटरूटच्या अँटिऑक्सिडंटवर काही प्रमाणात फरक होऊ शकतो त्यातही बीटरूट ज्यूसच्या गुणवत्तेत विविध ब्रँडनुसार सुद्धा फरक पडतो.

बीटरूट भाजीच्या रूपातील Viagra आहे का?

रोमन लोक बीटरूट आणि त्याचा रस कामोत्तेजक म्हणून वापरतात असे म्हणतात. परंतु बीटरूट तुमचे लैंगिक जीवन सुधारते असे म्हणण्याचे मर्यादित वैज्ञानिक पुरावे आहेत. याचा अर्थ असा नाही की त्याचा अजिबातचा परिणाम होत नाही. बीटरूटच्या फायद्यांबाबत वैज्ञानिक अभ्यासांमध्ये कामवासना किंवा लैंगिक आरोग्याच्या बाबत लाभाच्या इतर पैलूंचे पुरेसे मोजमाप झालेले नाही.

जेव्हा आपण बीटरूट खातो, तेव्हा बॅक्टेरिया आणि एन्झाइम्सच्या रासायनिक अभिक्रियांमुळे बीटरूटमधील नायट्रेटचे सक्रिय होते, नंतर हेच नायट्रेट नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होते. नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्या पसरवण्यास (विस्तृत) मदत करते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. आहारातील नायट्रिक ऑक्साईडचे पुरुषांमध्ये लैंगिक संबंधापूर्वी आणि दरम्यान रक्त प्रवाह नियंत्रित करण्यासाठी टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत वाढ करू शकते.

रक्त प्रवाह सुधारण्याची बीटरूटची क्षमता हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रक्ताभिसरण प्रणालीला लाभदायक ठरू शकते. याचा पुरुष व स्त्रियांच्या लैंगिक कार्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणूनच बीट व सेक्स लाईफचे फायदे यांच्यात संबंध जोडणे व चर्चा होणे साहजिक आहे, परंतु ते तुमचे लैंगिक जीवन बदलेल अशी अपेक्षा करू नका.

बीटरूटचे आरोग्यदायी फायदे

बीटरूटला अँटीऑक्सिडंट आणि अँटी-ट्यूमर फायद्यांसाठी सुद्धा मागील काही काळात वेगळी ओळख मिळाली आहे. क्लिनिकल चाचण्यांनी बीटरूटचे सर्व सक्रिय घटक आणि त्यांचे परिणाम सिद्ध झालेले नाहीत पण ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ. तसेच काही दुर्धर आजार जसे की, कर्करोग आणि मधुमेह यांच्याशी संबंधित विविध आरोग्य समस्यांसाठी बीटरूट एक संभाव्य उपयुक्त उपचार असू शकतो. तुम्ही बीटरूट सप्लिमेंट्स घेऊ शकता किंवा तुमच्या नियमित औषधांच्या बरोबर बीटरूट खाऊ शकता, लक्षात घ्या, औषधाला पर्याय म्हणून नाही तर जोड म्हणून बीटरूटचे सेवन करावे.

उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये बीटरूटचा रस सिस्टोलिक रक्तदाब (सर्वोच्च प्रमाण) कमी करण्यास मदत करतो असे पुरावे आहेत. इतर संशोधनात असे आढळले आहे की उच्च रक्तदाब नसलेल्या लोकांना मात्र याचा त्रास होऊ शकतो. खेळाडूंमधील स्टॅमिना वाढवण्यासाठी बीटरूटचा रस व गोळ्यांचा फायदा होऊ शकतो.

बीट खाल्ल्याने काही नुकसान होऊ शकते का?

फायद्याच्या तुलनेत नुकसान होण्याचे प्रमाण कमी आहे. जर तुम्ही बीटरूट जास्त प्रमाणात खाल्ले तर तुमचे मूत्र लाल किंवा जांभळे होऊ शकते (ज्याला बीटुरिया म्हणतात). परंतु हे सर्वसाधारणपणे निरुपद्रवी आहे.

हे ही वाचा<< मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी ‘या’ वेळी व ‘इतका’ वेळ झोपणं गरजेचं! खाणं-पिणं, व्यायामाशिवाय ‘ही’ चूक ठरते घातक

तर यातून निष्कर्ष काय निघतो तर, बीटरूट कदाचित तुमच्या रक्ताभिसरणात मदत करून पुरुष आणि स्त्रिया यांच्या लैंगिकतेला थोडीशी वाढ देऊ शकते. परंतु यामुळे तुमचे लैंगिक जीवन बदलण्याची किंवा त्याला भाजीतील व्हायग्रा म्हणून संबोधण्याची गरज नाही.