Jaswand Flower Growing Tips: जास्वंदाचं रोप घरी असावं असं सगळ्यांनाच वाटतं. श्रीगणेशाचं आवडतं फूल म्हणजे जास्वंद. घरी बाप्पाची पूजा करताना आपल्या बागेत फुललेलं एखादं तरी फूल चरणावर वाहावं अशी अनेकांची इच्छा असते. याच इच्छेपोटी आपण बाजारातून जास्वंदाच्या फुलांची रोपं आणतो, त्याला वेळोवेळी सूर्यप्रकाश व पाणी देऊन त्याची निगासुद्धा राखतो, रोप तुम्ही लावलेल्या लहानश्या कुंडीत बहरत जातं, त्याला अगदी टवटवीत पाने येतात, पण कळ्या व फुले अनेकदा येतच नाहीत. अशावेळी काय करावं हे आज आपण पाहणार आहोत.

जास्वंदाचे झाड वर्षभर फुले देत राहते पण हिवाळ्यात इतर ऋतूंच्या तुलनेत फुले कमी येतात. पण झाडाची योग्य काळजी घेतली आणि वेळोवेळी त्याला खत दिले तर हिवाळ्यातही झाडांना भरपूर कळ्या फुले येऊ शकतात.

जास्वंदच्या झाडाला जितकी खत देण्याची आवश्यकता असते तितकंच त्या रोपाला सूर्यप्रकाशाचीदेखील गरज असते. तरच झाड चांगले वाढते आणि फुले भरपूर लागतात. म्हणून कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे कमीत कमी ४ ते ५ तास रोपाला सूर्यप्रकाश मिळेल.

चहापावडर

चहापावडर झाडांसाठी अतिशय उपयुक्त असते कारण यात नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस हे घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे झाडे चांगली वाढतात तर कळ्या, फुलेही मोठ्या प्रमाणात येतात. फुलांचा रंग गडद होण्यासाठीदेखील मदत होते. पण जेव्हा ताजी चहापावडर वापरायची असते तेव्हा त्याचा वापरही प्रमाणशीर करणे गरजेचे असते.

ताज्या चहापावडरपासून खत कसे तयार कराल?

एक चमचा चहापावडर रात्रभर १ ग्लास पाणी ओतून त्या पाण्यात भिजत ठेवायची. जेणेकरून यातली पोषकतत्त्वे पाण्यात उतरतील आणि खत तयार होईल. दुसऱ्या दिवशी तुम्हाला पाण्याचा रंग बदलेला दिसेल म्हणजे हे खत तयार आहे.

या खताचा वापर थेट न करता यात पाणी मिक्स करून वापर करावा. म्हणजे जर एक ग्लास चहापावडरच्या पाण्याचा वापर जर तुम्ही केला असेल तर त्यात अजून एक ते दोन ग्लास साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर करा.

बटाट्याच्या साली

बटाट्याच्या साली झाडांना फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. बटाट्याच्या सालीत फुलांच्या वाढीसाठी लागणारे सगळे घटक असतात. बटाट्याच्या सालीप्रमाणेच कांद्याच्या किंवा केळीच्या सालीचा वापरही करता येतो. एका झाडासाठी एक ते दीड मूठ बटाट्याच्या सालींचा वापर करायचा आहे.

खत देण्यापूर्वी माती एकदा हलवून मोकळी करून घ्यावी. वर्तुळात बटाट्याच्या साली टाकून त्यावर मग चहापावडपासून तयार केलेलं पाणी टाका.