Early Signs of Kidney Disease on Skin: किडनीचे आजार बहुतेकदा मूक शत्रू मानले जातात. कारण- सुरुवातीच्या टप्प्यात त्यांची कोणतीही ठळक लक्षणं दिसत नाहीत. मात्र, आजार वाढला की, शरीराच्या आतली अवस्था त्वचेवर उमटू लागते. दिसायला साधी वाटणारी कोरडी त्वचा, खाज, विचित्र पुरळ किंवा रंग बदलणं ही लक्षणं फक्त वरवरची नसतात; तर शरीराच्या आतल्या गंभीर बिघाडाचा इशारा ती देत असतात. हे संकेत दुर्लक्षिले, तर आजार अधिक बळावतो आणि कधी कधी उशिरा कळलेला हा धोका जीव घेण्याला कारणीभूत उठतो. म्हणूनच त्वचेतील बदल समजून घेणं आणि वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

त्वचेवर दिसणारे ११ गंभीर बदल

१) अत्यंत कोरडी त्वचा – किडनीचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये त्वचा प्रचंड कोरडी पडू लागते. ती खरखरीत, खवलेदार होऊन माशांच्या कातडीसारखी दिसते. अनेकदा कातडी फाटून जखमा होतात.

२) असह्य खाज (प्रुरिटस) – अंगभर सतत येणारी खाज दैनंदिन जीवन त्रासदायक करते. काही वेळा कोणतेही मलम किंवा औषध काम करत नाही.

३) खाजवल्यामुळे खुणा व जखमा – सतत खाजवल्यामुळे त्वचेवर ओरखडे, जाडसर चट्टे किंवा गाठीसारख्या खुणा निर्माण होतात.

४) त्वचेचा रंग बदलणे – शरीरात विषारी घटक साचत गेल्यामुळे त्वचा फिकट, करडी, पिवळसर किंवा गडद दिसू शकते.

५) नखांमध्ये बदल – नखांवर पांढरे पट्टे किंवा फिकट नखं ही किडनीच्या त्रासाची निशाणी मानली जाते.

६) त्वचेला सूज येणे (ओडिमा) – पाय, टाच, हात, डोळ्यांभोवती सूज येते. त्वचा ताणली जाऊन चमकदार दिसू लागते.

७) पुरळ उठणे – रक्तातील अपायकारक घटकांमुळे अंगभर छोटे गाठीसारखे पुरळ उठतात आणि तीव्र खाज सुटते.

८) फोड येणे – प्रगत अवस्थेत हात, पाय, चेहऱ्यावर अचानक फोड येतात. ते फुटून खपली बसते आणि डाग राहतात.

९) पोटावर गाठ किंवा सूज – काही वेळा किडनी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचं लक्षण म्हणून पोटावर गाठ दिसू शकते.

१०) त्वचा घट्ट व कडक होणे – काही रुग्णांमध्ये त्वचा चमकदार कठीण व इतकी ताणलेली दिसते.

११) कॅल्शियमचे थर – किडनीत बिघाड झाल्यामुळे रक्तातील कॅल्शियम-फॉस्फेटचे संतुलन ढासळून त्वचेखाली कॅल्शियमचे थर जमा होतात.

क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) लाखो लोकांना ग्रासते आणि बहुतेकांना उशिरापर्यंत त्याची कल्पनाही नसते. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा वयोमान (६५) असलेल्या लोकांनी नियमित रक्त-लघवी तपासणी करून घ्यावी. पण, कधी कधी किडनीचा इशारा सगळ्यात आधी त्वचेतूनच मिळतो.

त्यामुळे जर त्वचेवर वरील ११ बदल दिसले, तर ते फक्त बाह्य सौंदर्याचा प्रश्न नसून, ते गंभीर आजाराच्या धोक्याची घंटा ठरू शकतात. तेव्हा वेळीच सावध व्हा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि किडनीचा आजार गंभीर स्वरूप धारण करण्याआधीच त्यावर नियंत्रण मिळवा.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)