Easy Onion Chopping Hack: कांदा चिरताना डोळ्यातून येणारे पाणी हा प्रत्येक स्वयंपाकघरातला रोजचा किस्सा. कितीही अनुभवी गृहिणी असली तरी कांदा चिरताना डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंना तिला शरण जावंच लागतं. “आज तर कांद्याने पुन्हा रडवलं”, अशी तक्रार तुम्हीही कधी ना कधी केली असेलच. पण आता हे चित्र बदलणार आहे, कारण सोशल मीडियावर एक भन्नाट जुगाड व्हायरल होत आहे, ज्यामुळे अवघ्या ३० सेकंदांत कांदा बारीक चिरून होईल आणि डोळ्यातून पाण्याचा थेंबही येणार नाही.

हो, हे खरं आहे. पोषणतज्ज्ञ मेलानी लिओनेलो यांनी इन्स्टाग्रामवर एक जुगाड दाखवला आणि पाहता पाहता लाखो लोकांनी त्याला पसंती दिली. या व्हिडीओला तब्बल दहा लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कारण आहेच तसं, जो कोणी स्वयंपाक करतो त्याला कांदा चिरण्याचा त्रास चांगलाच माहिती आहे. डोळ्यांतून पाणी येतं, नाक गळायला लागतं आणि जरा जास्त कांदा लागला तर अक्षरशः रडवून सोडतो.

पण, हा जुगाड करून बघितला की गोष्ट वेगळीच आहे. करायचं काय तर कांद्याची शेंडी व मुळाकडचा भाग कापून कांदा सोलून घ्या. मग कांदा उलटा ठेवा आणि त्याला उभे चिरा द्या. यानंतर फक्त एकदा आडवा धरून सुरी फिरवा… बस्स! अवघ्या ३० सेकंदांत कांदा बारीक चिरलेला तयार.

या हॅकमुळे स्वयंपाकघरातील मोठा प्रश्न सुटतो. मोठ्या कुटुंबासाठी भाजी करताना किंवा पार्टीसाठी तयारी करताना डझनभर कांदे चिरावे लागतात, तेव्हा डोळ्यातून पाणी आलं की जीव हैराण होतो. पण, या जुगाडमुळे वेळ तर वाचेलच, पण डोळ्यांच्या पाण्यापासूनही सुटका होणार आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी याला ‘गेम चेंजर’ म्हटलं आहे. काहींनी तर “हे आधी का नाही समजलं?” असा सवाल केला. तर काही जणांनी स्वतः ट्राय करून कमेंटमध्ये लिहिलं की, “खरंच, यामुळे कांदा चिरणं अगदी सोपं झालं.”

कांदा हा फक्त चव वाढवणारा घटक नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्यात अँटी-ऑक्सिडंट्स आहेत, कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत, पण तरीही ‘कांदा चिरताना येणारे अश्रू’ हा त्याचा कायमचा शत्रूच होता. आता मात्र हा जुगाड बघून प्रत्येक स्वयंपाक करणाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू उमटणार हे नक्की.

येथे पाहा व्हिडीओ

तर मग काय मंडळी, पुढच्या वेळी कांदा चिरताना तुम्हीही हा जुगाड करून पाहणार का?