scorecardresearch

भाषेतील करीयरच्या ‘या’ संधी माहित करुन घ्या

भाषा क्षेत्रातील थोड्या वेगळ्या संधींची वेळीच माहिती घेतल्यास तरुणांना या क्षेत्रात करीयर करणे शक्य होईल

भाषेतील करीयरच्या ‘या’ संधी माहित करुन घ्या

संवादाचे माध्यम म्हणून आपण वापरत असलेली भाषा हे करीयरचेही उत्तम माध्यम आहे. आपल्यातील अनेकांना याबाबतची योग्य ती माहिती नसल्याने भाषेमध्ये करीयर करणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. मात्र भाषा क्षेत्रातील थोड्या वेगळ्या संधींची वेळीच माहिती घेतल्यास तरुणांना या क्षेत्रात करीयर करणे शक्य होईल. भाषेवर चांगली पकड असणाऱ्यांसाठी भाषा कौशल्ये खूप उपयोगी ठरतात आणि आणि त्यातून नक्कीच चांगले भविष्य घडू शकते. पाहूयात भाषेतील करीयरचे असेच काहीसे वेगळे पर्याय.

माहिती तंत्रज्ञान

गेली दोन दशके माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे क्षेत्र ठरले आहे. अलीकडे कडक झालेले अमेरिकेचे व्हिसा निकष आणि बाजारपेठेतील परिस्थिती पाहता इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषा बोलल्या जाणाऱ्या देशांमध्ये आपला व्यापार वाढविणे सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी अत्यावश्यक बनले आहे. परकीय भाषा बोलता येत असणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांची मोठया प्रमाणावर आवश्यकता आहे. हिंदुस्थान टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार अशा उमेदवारांना सुमारे २० टक्के अतिरिक्त मानधनही दिले जाते. त्याच लेखानुसार, सद्यस्थितीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मागणी असणाऱ्या सर्वोत्तम ३ भाषा आहेत मँडरीन, जपानी व जर्मन या आहेत. दुसऱ्या देशात कार्यान्वित असलेल्या प्रकल्पांचा समन्वय साधताना समन्वयकांना किंवा व्यवस्थापक स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भाषेविषयक कौशल्य आवश्यक आहे.

बी पी ओ मध्ये काम

बिझिनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग म्हणजे थोडक्यात बी पी ओ. यामध्ये एखादी व्यापार प्रक्रिया किंवा कामकाजाचे (शक्यतो ग्राहक सेवा, कॉल सेंटर, बँकिंग, यांसारख्या कार्यालयीन प्रक्रिया) उपकंत्राट दिले जाते. या क्षेत्रामध्ये भाषातज्ज्ञांचीही आवश्यकता हल्ली मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. केवळ परकीय भाषांच्याच नाही तर बंगाली, तमीळ, मल्याळम इत्यादी भारतीय प्रादेशिक भाषांच्या भाषातज्ज्ञांचीही. डेटा एंट्री, व्हॉईस कॉल्स, ध्वनीविरहित प्रक्रिया, व्यवस्थापन, बँकिंग, बिलिंग, चॅट प्रक्रिया इत्यादी निरनिराळ्या कामांसाठी भाषा सहाय्याची गरज असते.

पत्रकारिता

पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात आधीपासूनच भाषाकौशल्यांवर भर आहे. त्याव्यतिरिक्त आणखी एखादी भारतीय/परकीय भाषाही अवगत असणे महत्वाचे आहे कारण पत्रकार त्यांच्या प्रकाशनासाठी इतर भाषेतील लेख नियमितपणे भाषांतरित करत असतात. विदेशी बातमीदार बातमी देताना त्यांचे परकीय भाषेतील कौशल्य वापरू शकतात जे त्यांच्यासाठी महत्वाचे ठरते.

प्रवास उद्योग 

१. विमानतळ साहाय्य कर्मचारीवर्ग (हवाई सुंदरी किंवा विमान देखभाल कर्मचारी) : विमान कर्मचारी (विमान परिचारक किंवा हवाईसुंदरी), विमानतळावरील कर्मचारी (तिकीटविक्री व्यवस्था सांभाळणारे) आणि ग्राहक सेवा कर्मचारी यांना २ प्रादेशिक भाषांसह एक परकीय भाषा अवगत असणे अत्यावश्यक आहे.

२. भाषिक परवानाधारक मार्गदर्शक : आवश्यक शर्तींची पूर्तता केल्यावर भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय मार्गदर्शकांना प्रादेशिक तत्वावर परवाने देते. वेळोवेळी मंत्रालयाने निर्देशित केल्यानुसार फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, कोरियन, रशियन, जपानी, थाई, अरेबिक, हंगेरियन, पोलिश, हिब्रू व चिनी अशा भाषांमध्ये अस्खलितपणे बोलणाऱ्या मार्गदर्शकांना या श्रेणीतून मान्यता मिळते. इच्छुक व्यक्तीने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी मिळविलेली असावी आणि त्याला (इंग्रजीव्यतिरिक्त) एखाद्या परकीय भाषेचे ज्ञान व अस्खलितपणे बोलण्याची कला अवगत असावी. असे परवाने राज्य व राष्ट्रीय पातळीवर दिले जातात.

३. ट्रॅव्हल एजन्सीमध्ये तिकीट आरक्षक किंवा सहल आयोजक म्हणून काम करणारे कर्मचारी – विशिष्ट देशांसाठी व भारतीय संस्कृती/पाककला/साहस सहली यांसारख्या खास क्षेत्रांसाठी प्रवाससेवा देणाऱ्या खूप एजन्सीज आहेत. त्यांना त्या विशिष्ट भाषा येत असणारे लोक हवे असतात.

पुरवठा अधिकारी, सुट्टी सल्लागार, समुद्रपर्यटन जहाज व हॉटेलमधील कर्मचारीवर्ग इत्यादींना परकीय भाषेचे थोडेफार ज्ञान तरी आवश्यक असते.

देवकी दातार-कुंटे

प्रमुख, लँग्वेज सर्व्हिसेस ब्युरो, पुणे</p>

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-07-2018 at 18:23 IST