Men’s Fertility: शरीरसंबंधांमुळे नव्या जिवाचा जन्म होतो. या प्रक्रियेदरम्यान पुरुषाच्या वीर्यातील शुक्राणू हे स्त्रीच्या गर्भामध्ये पोहोचत असतात. त्यातून पुढे गर्भधारणेची प्रक्रिया सुरू होते. प्रजननाच्या या एकूण प्रक्रियेमध्ये पुरुषांच्या शरीरातील शुक्राणू खूप महत्त्वपूर्ण असतात. निरोगी शुक्राणूंवर पुरुषांची प्रजननक्षमता अवलंबून असते. शरीरामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असल्यास गर्भधारणा होण्यास अडचणी येऊ शकतात. विविध कारणांमुळे ही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. जीवनशैलीमधील काही सवयी बदलून या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी मदत होऊ शकते.
निरोगी शुक्राणूंची निर्मिती होण्यास मदत व्हावी यासाठी सवयींमध्ये करा हे बदल –
नियमितपणे व्यायाम करा.
वजन नियंत्रणात नसल्यास गर्भधारणा होण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. वजन खूप जास्त असल्याने शरीरातील हार्मोन्समधील संतुलन बिघडण्याची शक्यता असते. तसेच वजन कमी केल्यामुळे हार्मोन्सवर परिणाम होत असतो. यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहते. शिवाय नियमितपणे व्यायाम केल्याने शरीराला अन्य फायदेदेखील होत असतात.
सात-आठ तास झाेप घ्या.
झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड, तणाव अशा समस्या उद्भवतात. ताण घेतल्याने शरीराप्रमाणे मानसिक स्थिती बिघडू शकते. अशा वेळी निरोगी शुक्राणूंची संख्या कमी होऊन प्रजननक्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. निद्राचक्र पूर्ण झाल्याने ताणतणावाचे प्रमाण कमी होते. डेन्मार्क विद्यापीठाद्वारे करण्यात आलेल्या एका अध्ययनानुसार, झोप पूर्ण झाल्याने स्ट्रेस लेवल कमी होते. त्यासह शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या यांमध्येही सुधारणा होते.
धूम्रपान आणि मद्यपान करणे टाळा.
धूम्रपान केल्याने फुप्फुस खराब होत असते. तसेच मद्यपान केल्यानेही शरीरावर वाईट परिणाम होत असतो. या सवयींमुळे शुक्राणूंच्या गुणवत्तेची पातळी खालावते. त्याशिवाय त्यांची संख्यादेखील कमी होत जाते. प्रजननक्षमता वाढवण्यासाठी धूम्रपान, मद्यपान करणे टाळणे गरजेचे असते.
टेस्टिकल्स थंड राहावेत याकडे लक्ष देणे.
टाइट अंडरवेअर घातल्याने टेस्टिकल्सचे तापमान वाढू शकते. याचा परिणाम शुक्राणूंच्या निर्मितीवर होऊ शकतो. शरीराच्या तापमानाच्या तुलनेत, टेस्टिकल्स हे थंड असणे आवश्यक असते. यामुळे निरोगी शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)