‘Monkey-barring’, a toxic dating trend: कोणी विवाहित किंवा अविवाहित व्यक्ती असो, कुठल्यातरी टप्प्यावर नातेसंबंधांमध्ये अडचणी या येतातच. जीवनशैली, कामाचे तास, कामामुळे येणारा तणाव, भावनिक स्पष्टतेचा अभाव, संवादाचा अभाव या सर्व गोष्टी नात्यांमधील तणावाला कारणीभूत ठरतात. त्यातच सध्या एक नवीन ट्रेंड आला आहे तो म्हणजे ‘मंकी बॅरिंग’ नावाचा. हा एक विचित्र आणि टॉक्सिक असा डेटिंग ट्रेंड आहे. यामध्ये एखादं नातं अडकलं तर ते अगदी खोलवर जखमा देतं अशी चर्चा सध्या आहे.

मंकी बॅरिंग हा एक डेटिंग पॅटर्न आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीचे नातेसंबंध असतानाही तो दुसऱ्या व्यक्तीसोबत नातं, प्रेमसंबंध निर्माण करतो. ही कल्पना मंकी बार वापरण्यासारखी असल्याचे म्हटले जाते. दुसऱ्यावरची पकड निश्चित होईपर्यंत पहिल्यावरची पकड सोडायची नाही अशी ही कल्पना आहे. अनेक जण याला विश्वासघातच मानतात. यातली गुप्तता आणि मॅनिप्युलेशन हे सर्वात जास्त हानिकारक आहे.

काहीजण भावनिक सुरक्षितता हवी म्हणून असे करतात. तसंच काहींना असं वाटतं की यामुळे नात्यातील संघर्ष टाळता येईल. ब्रेकअपच्या कठीण संभाषणांऐवजी हा मार्ग अधिक सोपा समजला जात आहे.

याबाबत मानसशास्त्र तज्ज्ञ काय सांगतात?

मानसशास्त्र तज्ज्ञ जय अरोरा यांनी याबाबत सांगितले की, आपण ज्या जगात राहतो ते सोशल मिडिया, लगेचच उपाय हवे असणारे आणि डोपामाइनच्या प्रभावांनी भरलेले आहे. हेदेखील भावनिक असुरक्षिततेसाठी कारणीभूत आहे. भावनिकरित्या सावरण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे एकटेपणा घालवण्यासाठी घाई करण्याऐवजी त्याला सामोरं गेलं पाहिजे. जर्नलिंग, थेरपी किंवा कॅफेमध्ये एकट्याने वेळ घालवणं यासारख्या लहान लहान गोष्टी केल्याने कोणीही एकाकी व्यक्ती स्वत:सावरू शकते. एखादं सुंदर मैत्रीचं नातं, छंद आणि वैयक्तिक ध्येय स्थिरतेची भावना निर्माण करतात. जेव्हा तुमची ओळख ही केवळ नातेसंबंधांमुळे किंवा त्यातच अडकलेली नसते, तेव्हा तुम्ही कुठल्याही भीतीपोटी समोरच्या व्यक्तीला धरून ठेवण्याची शक्यता कमी असते.

याचा मानसिक परिणाम काय आहे?

यावर अरोरा सांगतात की, अशाप्रकारे बदल होणं ब्रेकअपपेक्षा जास्त वेदनादायी असू शकतं. कारण ते नुकसान तर करतंच पण विश्वासघाताचा घावही देतं. ज्या व्यक्तीला अशा प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे त्या व्यक्तीच्या मनात अपुरेपणा घर करू शकतो. तसंच भविष्यातील नातेसंबंधांमध्ये स्वत:चं मूल्य कमी होणं, विश्वासाचा प्रश्न किंवा अतिदक्षता अनुभवू शकता. यावर थेरपीसुद्धा केली जाते. थेरपीमध्ये वेदनेवर प्रक्रिया करणे, मित्रांवर अवलंबून राहणे आणि स्वत:ला दोष न देता दु:ख पचवण्याची ताकद मिळवणे महत्त्वाचे असते. हळूहळू सुरक्षित, पारदर्शक नातेसंबंधांच्या संपर्कामुळे विश्वास पुन्हा निर्माण होण्यास मदत होऊ शकते.

जोडीदाराशी सामना करण्यापूर्वी आत्मचिंतन केल्याने काय चुकीचे वाटते हे स्पष्ट होण्यास मदत होते. बोलताना स्पष्ट, दोष न देणारी भाषा वापरल्याने बचावात्मकतेऐवजी संवाद सुरू होतो. एखाद्याला अडकवण्यापेक्षा समजूतदारपणे गोष्टी संपवणे खूप आरोग्यदायी आहे असे तज्ज्ञ सांगतात. असं असलं तरी एखाद्या नात्यात असताना दुसऱ्या नात्याचा विचार करणं किंवा तसे संबंध जोडणं हा एखाद्या व्यक्तीसाठी अत्यंत भावनिक आणि वैयक्तिक विषय आहे.