Monsoon Hacks For Your Home : पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. दमट वातावरणामुळे घराच्या भिंती, फरशीवर सर्वत्र ओलावा निर्माण होतो. अशा वातावरणामुळे घरात जीवाणू तर वाढतातच आणि कुबट वास येऊ लागतो. त्यामुळे आरोग्यावरही गंभीर परिमाण होऊ शकतात. अशा वेळी घरातील आर्द्रता दूर करण्यासाठी अनेक उपाय करून पाहिले जातात; पण काहीच उपयोग होत नाही. पण, तुमच्या या समस्येवर उपाय म्हणून आम्ही काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही घरातील आर्द्रता, कुबट वास कमी करू शकता.
पावसाळ्यात घर कोरडं अन् दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ ट्रिक्स
१) व्हेंटिलेशन फॅन
पावसाळ्यात घरातील ओलावा कमी करण्यासाठी एक्झॉस्ट किंवा व्हेंटिलेशन फॅन वापरा. स्वयंपाकघर आणि बाथरूमच्या ठिकाणी हे फॅन चालू ठेवा; जेणेकरून घरातील ओलावा बाहेर जाऊ शकेल.
२) एसी
जर तुम्हाला घरातील ओलावा दूर करायचा असेल, तर एसी चालू ठेवा. त्यामुळे खोलीतील ओलावा तर कमी होईलच; पण त्याशिवाय खोली थंडदेखील राहील.
३) डिह्युमिडिफायर
घरातील आर्द्रता कमी करण्यासाठी तुम्ही बाजारातून डिह्युमिडिफायरही खरेदी करू शकता. प्रत्येक ऋतूमध्ये तुमच्या खोलीला आर्द्रतेपासून वाचविण्यासाठी हे उपकरण प्रभावी ठरू शकते.
४) रोप घराबाहेर ठेवा
जर तुम्ही घरात कोणतीही इनडोअर रोपे ठेवली असतील, तर ती पावसाळ्यात घराबाहेर ठेवा. कारण- त्यामुळेही घरात मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण होतो.
५) मीठ
मीठ देखील घरातील ओलावा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. कारण- ते नैसर्गिकरीत्या घरातील ओलावा शोषून घेते. त्यासाठी एका वाटीत मीठ घ्या आणि ते उघडेच खोलीत ठेवा. मग ते मीठ हवेतील आर्द्रता शोषून घेईल.
६) खिडक्या उघड्या ठेवा
पाऊस नसेल त्यावेळी घरातील खिडक्या उघड्या ठेवा. जेणेकरून बाहेरून घरात ताजी हवा येईल आणि निर्माण झालेला दमटपणा, कुबट वास कमी होईल.
७) फिनाईल वापरा
बहुतेक लोकांना फिनाईलचा वास आवडत नाही; पण फिनाईलने घरातील फरशी पुसल्यास कीटक, जीवाणू मारण्यास मदत होईल. त्याशिवाय जमिनीवरील ओलावाही निघून जाईल.