Blood thinner foods: आजकाल अनेक लोकांमध्ये रक्त गोठण्याची एक सामान्य समस्या आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि बिघडलेली जीवनशैली यांमुळे ही समस्या आणखी वाढली आहे. रक्त जाड होणे ही अशी स्थिती आहे की, जी हृदयरोग, उच्च कोलेस्ट्रॉल आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढवू शकते. जाड रक्ताचा अर्थ असा नाही की, ते खरोखर जाड किंवा चिकट झाले आहे. वैद्यकीय शास्त्रात याला हायपरकोग्युलेबिलिटी म्हणतात. याचा अर्थ असा की, रक्तामध्ये लवकर गुठळ्या तयार होतात किंवा गुठळ्या तयार होण्याची शक्यता जास्त असते.
रक्त जाड होण्यास अनेक कारणे जबाबदार आहेत. जसे की, लाल रक्तपेशी (RBCs), शरीरात प्लेटलेट्स किंवा प्रथिने वाढणे, डिहायड्रेशन, कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसराइड्स वाढणे, धूम्रपान, मद्यपान आणि चुकीची जीवनशैली. पॉलीसिथेमिया व्हेरा, मधुमेह व उच्च रक्तदाब यांसारख्या काही वैद्यकीय स्थितींमुळेही रक्तामध्ये गुठळ्या होऊ शकतात. रक्ताच्या गुठळ्या हृदय, फुप्फुस किंवा मेंदूमध्ये प्रवेश करू शकतात, ज्यामुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
अनेकदा याची लक्षणे काय आहेत अथवा नक्की रक्त का घट्ट होते आणि नसांमध्ये ते कसे जमते हेदेखील कळत नाही. पण, याचे काही संकेत शरीराला मिळत असतात की, ज्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे त्याचे संकेत या लेखातून तुम्ही जाणून घ्या.
- अस्पष्ट दिसणे
- डोकेदुखी
- उच्च रक्तदाब
- त्वचेवर सतत खाज येणे
- श्वास लागणे
- थकवा येणे
- चक्कर येणे
- त्वचा निळी पडणे
- मासिक पाळीत अधिक रक्तस्राव होणे
या स्थितीत रक्ताभिसरण मंदावते आणि शरीराच्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजन व पोषक तत्त्वे मिळत नाहीत. रक्त पातळ करण्यासाठी औषधे वापरली जातात; परंतु काही पदार्थदेखील रक्त पातळ करू शकतात. औषधांसोबतच काही घरगुती उपायांचा अवलंब करून आणि तुमच्या आहारात बदल करून तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता.
रक्त पातळ होण्यासाठी जीवनशैलीत बदल करा
मेडिकल न्यूज टुडेच्या मते, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांना सामान्य रक्तदाब राखण्यासाठी आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी डॉक्टर रक्त पातळ करणारी औषधे लिहून देतात. आजार टाळण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत छोट्या छोट्या सुधारणा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम, निरोगी आहार व पुरेशी झोप यांमुळे तुम्ही निरोगी राहू शकता आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखू शकता.
फायबरयुक्त आहार घ्या
रक्त स्वच्छ आणि पातळ ठेवण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ खाणे आवश्यक आहे. निरोगी पचनसंस्था चांगली राखण्यासाठी फायबर मदत करते आणि रक्ताभिसरण सुधारते. त्यासाठी तपकिरी तांदूळ, गाजर, ब्रोकोली, मुळा व सलगम यांचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.
घाम येणे आवश्यक
रक्त स्वच्छ ठेवण्यासाठी आणि ते जाड होण्यापासून रोखण्यासाठी घाम येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम, कठोर परिश्रम व योगासने आवश्यक आहेत.
खोल श्वास घेणे
सकाळी ताज्या हवेत लांब, खोल श्वास घेतल्याने फुप्फुसांना चांगला ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्त गोठण्याचा धोका कमी होतो.
मृत त्वचा काढून टाकणे
मृत त्वचेमुळे छिद्रे बंद होतात, ज्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. दरमहा स्क्रब, मॅनिक्युअर, पेडीक्योर किंवा स्टीम ट्रीटमेंट फायदेशीर आहे. त्यामुळे रक्ताभिसरण सामान्य होण्यास मदत होते.
हळदीचे सेवन
हळद हा औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेला मसाला आहे. तो दूध किंवा पाण्यात मिसळून प्यायल्याने रक्त शुद्ध होते आणि रक्ताभिसरण सुधारते.
लसूण खा
लसणातील अँटीऑक्सिडंट्स शरीरात जमा झालेले मुक्त रॅडिकल्स काढून टाकतात. त्यामुळे रक्त पातळ होण्यास आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.