गुरुवार, २९ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करताना सांगितले की, अविवाहित मुली किंवा महिलांनाही गर्भपाताचा अधिकार आहे. कोर्टाने सांगितल्यानुसार, विवाहित महिलांप्रमाणेच अविवाहित महिला देखील मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (एमटीपी) कायद्यांतर्गत २४ आठवड्यांपर्यंत परवानगीशिवाय गर्भपात करू शकतात. मात्र, गर्भपात हा शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर वेदनादायक असतो. गर्भपातानंतर महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. या काळात महिलांनी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबद्दल जाणून घेऊया.

  • शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका

गर्भपात झाल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते. म्हणूनच जेव्हा तुमचे शरीर गर्भपातातून बरे होत असते, तेव्हा हायड्रेटेड राहणे तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. या दिवसांमध्ये तुम्ही भरपूर द्रवपदार्थांचे सेवन करावे. तुम्ही योग्य प्रमाणात हायड्रेटेड असता तेव्हा तुमच्या लघवीचा रंग फिकट पिवळा असावा. जर ते गडद पिवळे असेल तर तुम्ही जास्त पाणी प्यायला हवे. यावेळी कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

Health Tips : ‘या’ लोकांना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका सर्वाधिक; जाणून घ्या बचाव करण्याच्या पद्धती

  • पचनासंबंधी दुष्परिणामांपासून सावध राहा

काही स्त्रियांना गर्भपातानंतर मळमळ, बद्धकोष्ठता किंवा अतिसार यासारखे दुष्परिणाम जाणवू शकतात. तुमच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे असे घडू शकते. जर तुम्हाला याचा त्रास होत असेल तर तुम्ही या समस्या दूर करण्यासाठी तुमचा आहार बदलू शकता.

  • जड कामे करणे टाळावे

गर्भपातानंतर कपडे-भांडी धुणे आणि पाण्याच्या बादल्या उचलणे यासारखी जड कामे टाळा. या दरम्यान तुम्हाला पुरेशी विश्रांती आवश्यक आहे. तसेच, दररोज किमान आठ तासांची झोप जरूर घ्या.

  • शरीराची मालिश करा

विश्रांती बरोबरच शरीराला मसाज करणेही आवश्यक आहे. यासाठी तुम्ही मोहरी किंवा तिळाचे तेल वापरू शकता. तसेच, या दिवसांमध्ये तुम्ही शांत आणि तणावमुक्त राहणे खूप महत्वाचे आहे.

  • चांगला आणि संतुलित आहार घ्या

संतुलित आहार घेणे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. परंतु जर तुम्ही गर्भपातातून बरे होत असाल, तर संतुलित आहार घेते अधिक महत्त्वाचे ठरते. गर्भपातानंतर तुमच्या आहारात भरपूर प्रथिने, लोह, ब जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम यांचा समावेश असल्याची खात्री करा. या काळात बरे होण्यासाठी तुमच्या शरीराला यापैकी अनेकांची आवश्यकता असेल.

या दिवसांमध्ये फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्य आणि कॅल्शियम आणि लोह समृध्द असलेले पदार्थ तुमच्या शरीरासाठी विशेषतः चांगले असू शकतात. गर्भपातानंतर महिलांनी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, आले, लसूण, तीळ, सुका मेवा, दूध यांचा समावेश करावा. त्याच वेळी, जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्न आणि साखरयुक्त पेये यांचे सेवन करणे पूर्णपणे टाळा. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी, लोह आणि कॅल्शियमसारखी सप्लिमेंट्स घेऊ शकता.

Sweets In Diabetes : आता चिंता नाही! कोणत्याही सणात मधुमेही रुग्ण खाऊ शकतात ‘या’ मिठाई

आहारात खालील पदार्थांचा समावेश करा

शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळण्यासाठी तुम्ही आहारात टोफू, सुकामेवा, सीफूड, दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करू शकता, तर लोह आणि व्हिटॅमिन सीसाठी तुम्ही पालक, खजूर, भोपळा आणि बीटरूट खाऊ शकता. शरीराला फॉलिक अ‍ॅसिडचा पुरवठा करण्यासाठी आहारात अ‍ॅव्होकॅडो, बदाम आणि अक्रोड यासारख्या गोष्टी समाविष्ट करा. तसेच, लाल भात, क्विनोआ, ओट्स, लोणी, पनीर यांचाही आहारात समावेश करावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)