ऋतुपर्णा मुजुमदार

हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि लाडका सण. श्रावण महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी  हा सण साजरा केला जातो. ह्या दिवसाला श्रावणी असेही म्हणतात. उत्तर भारतात हा सण फार महत्त्वाचा मानला जात असे. पण आता हा सकल भारतीय मनाच्या अत्यंत जवळ चा सण आहे. या दिवशी बहिण ही आपल्या भावाच्या हातावर रक्षा सूत्र बांधते अणि त्याच्याकडून रक्षण करण्याचे वचन घेते.  बहिण भावाच्या विशुद्ध आणि निर्मळ नात्याची ही, सुंदर प्रतीकात्मक कृती आहे.

या सणाची सार्‍या बहिणी मनापासून वाट पाहतात. या सणाची सुरुवात साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची मानस भगिनी द्रौपदी यांच्या पासून झाली आहे. झाल असं की शिशुपाल वध केल्यानंतर संतप्त कृष्णाचे बोट सुदर्शन चक्र लागून कापले. कमल करांगुलीतून रक्त येऊ लागले. हे बघताच द्रौपदीने आपल्या नेसत्या वस्त्राचा काठ फाडून भगवंताची जखम बांधली. अणि त्याच क्षणी तिने त्यांच्याकडून आपली रक्षा करण्याचे वरदान मिळवले. भगवंतानी कुरू सभेत वस्त्रे पुरवून कृष्णेचे शील रक्षण केले. जन्मभर तिच्या पाठीशी उभे राहून श्रीकृष्णाने आपल्या बंधुत्वाचे ब्रीद कायम राखले. अशी ही कहाणी, हिने रक्षा बंधनाची सुरवात केली. रक्षा बंधन म्हणजे  दृष्टी बदल. जेव्हा स्त्री एखाद्या पुरुषाला रक्षा सूत्र बांधते तेव्हा त्याची तिच्या कडे बघण्याची नजर विशुद्ध होते. ती त्याच्या कपाळावर जो मंगल तिलक लावते त्यातून ती त्याच्या साठी  मंगल कामना तर करतेच. पण याशिवाय त्याला स्त्रीकडे बघण्याची एक विशुद्ध नजर देते. भारतीय संस्कृती  मध्ये स्त्री ला माता  भगिनी समजून पुजण्याची परंपरा आहे. त्याला तिलक लावुन ओवाळून राखी बांधून ती त्याला बंधनात बांधते.

पूर्वी चितोडच्या राणी कर्णावतीने हूँमायू बादशहाला आपले रक्षण करण्याची विनंती केली व त्याला  राखी पाठवून  तिने आपला बंधू होण्याचे आवाहन केले. बादशहाने देखील राणीच्या विनंतीची लाज राखली व तिचे रक्षण केले. पूर्वीच्या काळी पुरुष योद्धे लढाई वर जात असत तेव्हा स्त्रिया मागे एकट्याच रहात असत आणि एकमेकींना सहाय्य करून रक्षा करत. उत्तर प्रदेशात काही ठिकाणी स्त्रिया एकमेकींना स्वहस्ते बनवलेल्या राख्या किंवा लूबे बनवुन बांधत असत .ही परंपरा राजस्थान आणि इतर हिंदी भाषिकां मध्ये अजूनही आहे. घरातल्या  शिवण भरतकामातून उरलेल्या  धाग्यांचा वापर करून हे देखणे  लोंबे बनत असत. राखी चे हे रूप सुंदर अणि स्त्रीशक्ती चा जयकार करणारे आहे.  राखी केवळ एक सुती धागा नसून ते बहिण भावाच्या अतीव प्रेमाचे बंधन मानले जाते.

महाराष्ट्रात ही परंपरा जपली जातेच. पण खरी मजा असते ती नारळी पौर्णिमेला. कोळी स्त्रिया समुद्राला आपला भाऊ मानतात. त्यांच्या  दर्या वर गेलेल्या पतीला  सुखरूप परत आणणारा त्यांचा भाऊ. या दिवशी त्याला नारळ अर्पण करून त्याला पूजले जाते. गोडधोड करून , पूजा करून रक्षण करण्याची विनंती करून कोळी बांधव समुद्रात आपली होडी,नाव घालतात. स्त्रिया मोठ्या सजून धजुन गाणी गाऊन नारली पूनव साजरी करतात. घराघरातून बनतो नारळीभात, ओल्या नारळाच्या करंज्या किंवा लाडु. भावासाठी तर्‍हेतर्‍हेच्या भेटवस्तू, खरेदी केल्या जातात. बहिणीसाठी भाऊ मानाची साडी घेतो. बहीण औक्षण करून भावाच्या दीर्घ आयुष्याची मंगल कामना करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा हा सण. आपल्या हिंदू धर्मातील सुंदर परंपरा.आपण त्याचे जतन करूया आणि बहिण भावंडाच्या प्रेमाचा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करूया.