संतुलित आणि योग्य आहार हा निरोगी व तंदुरुस्त शरीराचा खजिना मानला जातो. पण, आजकाल जंक फूड आणि चुकीचा आहाराला अधिक पसंती दिली जाते ज्यामुळे अनेक लोक विविध आजारांचे बळी ठरत आहेत. विशेषतः शरीरात रक्ताची कमतरता ही आजच्या काळात अतिशय सामान्य समस्या झाली आहे. त्यामुळे शरीर सतत थकल्यासारखे वाटते. वेळेवर लक्ष दिले नाही तर या रक्ताच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होण्याचा धोका वाढतो.
अॅनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता हा एक अतिशय त्रासदायक अनुभव असतो. डॉक्टर सामान्यतः यावर उपाय म्हणून लोह मिळेल असे पूरक आहार घेण्याचा सल्ला देतात. पण, अनेक लोकांना असे नैसर्गिक पर्याय हवे असतात ज्यामुळे शरीरात नैसर्गिक पद्धतीने लोह वाढेल. अशा वेळी एनेस्थेसियोलॉजी आणि इंटरव्हेन्शनल पेन मेडिसिन तज्ज्ञ डॉ. कुनाल सूद यांनी एका सुपरफ्रूटची माहिती दिली आहे, जे केवळ अॅनिमियामध्ये मदत करत नाही तर हृदयाचे आरोग्यही चांगले ठेवते.
डॉ. कुनाल सूद यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की,”रेड ड्रॅगन फ्रूट रक्ताची कमतरता दूर करण्यात उपयुक्त ठरू शकते. त्यांनी सांगितले की,”हे उष्णकटिबंधीय फळ लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढवते. हे हृदयाच्या आरोग्यास आधार देते आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते.”
पोषणाने भरपूर ड्रॅगन फ्रूट
रेड ड्रॅगन फ्रूट केवळ त्याच्या तेजस्वी लाल रंगासाठी आणि चविष्ट स्वादासाठीच नव्हे तर पोषणासाठीही प्रसिद्ध आहे. डॉ. सूद यांच्या मते, हे फळ लोह नव्हे तर व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा देखील उत्तम स्त्रोत आहे. हे तिन्ही घटक लाल रक्तपेशी निर्माण होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय या फळात फायबर, मॅग्नेशियम आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे हृदयाचे आरोग्य सुधारण्यात, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यात आणि शरीरातील सूज कमी करण्यात उपयुक्त ठरतात.
काय सांगते संशोधन?
डॉ. सूद यांच्या मते, या विषयावर अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. पण, सुरुवातीच्या अभ्यासांमध्ये सकारात्मक निष्कर्ष दिसून आले आहेत. त्यांनी एका अभ्यासाचा उल्लेख केला, ज्यामध्ये रक्ताची कमतरता असलेल्या गर्भवती महिलांना सात दिवस दररोज ५०० ग्रॅम रेड ड्रॅगन फ्रूटचा रस दिला गेला. यामुळे त्यांच्या हिमोग्लोबिन आणि एरिथ्रोसाइट म्हणजेच लाल रक्तपेशींची पातळी वाढली. यावरून हे दिसून आले की,”हे फळ तात्पुरते का होईना पण लोहची कमतरता सुधारण्यास मदत करू शकते.
तज्ज्ञांच्या मते लाल ड्रॅगन फ्रूट अॅनिमियामध्ये उपयुक्त ठरू शकते, पण ते लोह मिळण्यासाठी पूरक म्हणून वापरणे किंवा वैद्यकीय उपचार म्हणून वापरू हा पर्याय असू शकत नाही. जर कुणाला गंभीर स्वरूपाचा अॅनिमिया असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषधोपचार करणे अत्यावश्यक आहे.