Chaha IN Summer : भारतात चहा हे अत्यंत लोकप्रिय पेय आहे. भारतीयांची दिवसाची सुरुवात एक कप चहाने होते. काही लोक दिवसातून दोन तीन वेळा चहा पितात पण उन्हाळ्यात अनेक लोक चहा पिणे टाळतात. कारण चहा उन्हाळ्यात उबदार वाटत नाही उलट गरम वाटतो पण खरंच उन्हाळ्यात चहा पिणे आरोग्यासाठी चांगले नाही? खरं तर शरीराची यंत्रणा समजून घेण्यासाठी उन्हाळ्यात चहा हा एक उत्तम पर्याय आहे. चिनी मेडिसीन तज्ज्ञांनी याला समर्थन दिले आहे. ते पोटाला ‘यांग’ (Yang) अवयव मानतात. यांग म्हणजे गरम होय. पोटाचे कार्य सुरळीत पार पडण्यासाठी ते संतुलित ठेवणे गरजेचे आहे. पाणी हे ‘यिन’ आहे. यिन म्हणजे थंड होय. शरीरात थंड आणि गरम ऊर्जेचा समतोल राखण्यासाठी उन्हाळ्यात जास्त पाणी पिण्याबरोबर गरम पेये पिणे देखील शरीर संतुलित ठेवण्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. उन्हाळा असो किंवा हिवाळा, चहाचे सेवन का करावे? हे जाणून घेऊ या.

चहा शरीराला थंडावा देतो?

खूप कमी लोकांना हे माहिती असेल की जिथे अति जास्त उष्णता असते किंवा वाळवंटी प्रदेश असतो, तिथे चहा पिणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. हे अनेक अभ्यासातून समोर आले आहे की उष्ण वातावरणात चहा पिणे टाळू नये. कारण त्यामुळे शरीर थंड होण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे?

उन्हाळ्यात चहा प्यावा का?

२०१२ मध्ये, ऑली जे (Ollie Jay) यांनी एक अभ्यास प्रकाशित केला होता त्यामध्ये असे सांगितले होते की थंड पेयाच्या तुलनेत जर आपण गरम पेयाचे सेवन केले तर व्यायामानंतर शरीरात साठवून ठेवलेली एकूण उष्णता कमी होते. यामुळे स्पष्टीकरण हे चहा किंवा गरम पेयांमुळे बाहेर पडणाऱ्या घामाच्या संकल्पनेत आहे.

गरम पेये किंवा चहा हे जर एखाद्या व्यक्तीने एकदा प्यायले तर त्यांच्या शरीरातील उष्णता वाढते, ज्यामुळे त्यांना घाम येतो. घाम वाढल्याने शरीरातील घामाचे बाष्पीभवन होते आणि शरीर थंड होते. ५० अंश सेल्सियस तापमान गरम पेय घेतल्यास शरीरातून ५७० मिली घाम बाहेर पडतो ज्यामुळे उष्णता कमी होते आणि शरीरात कमी उष्णता साठवून राहते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बर्फामुळे शरीराची उष्णता वाढते?

थंड पेये किंवा बर्फामुळे तुमच्या शरीरावर तापमानाचा परिणाम होतो ऑली जे यांनी केलेल्या दुसऱ्या अभ्यासात असे दिसून आले आहे की बर्फ खाल्ल्यानंतर, त्वचेच्या बाह्यभागावरून घामाचे बाष्पीभवन कमी होते त्यामुळे शरीरातून उष्णता बाहेर पडत नाही. शरीराच्या तापमानात होणारे बदल व्यक्तीच्या सहनशक्तीवर अवलंबून असतात. बर्फ खाल्याने तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो कारण शरीरातील उष्णता वाढते आणि व्यायाम करणे कठीण होते म्हणून, चहा प्रेमींनो, उन्हाळ्यात चहाचा आनंद घ्या.