Symptoms of High Cholesterol Seen in Body and Face: कोलेस्ट्रॉल ही अशी समस्या आहे, जी बराच काळ शरीरात वाढत जाते पण लक्षणं लगेच दिसत नाहीत. बऱ्याच वेळा थकवा, अशक्तपणा किंवा थोडं सुस्तपणं यापलीकडे कोणतेही ठोस संकेत मिळत नाहीत. पण, जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलची चरबी साठू लागते, तेव्हा हळूहळू हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांची शक्यता वाढते. डॉक्टरांच्या मते, २०० mg/dL पेक्षा जास्त पातळीला ‘हाय कोलेस्ट्रॉल’ मानलं जातं. मात्र, वेळेवर खबरदारी घेतली नाही तर धोका वाढू शकतो. पण, सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे शरीर आणि चेहऱ्यावर दिसणारी काही छोटी-छोटी लक्षणं कोलेस्ट्रॉल वाढल्याचा इशारा देतात. कोलेस्ट्रॉल वाढलं की शरीर शांतपणे आतून झिजतं… आणि एका दिवसात मोठा झटका देतं! पण तुम्हाला ठाऊक आहे का? डोळे, चेहरा आणि त्वचेवर काही धक्कादायक लक्षणं आधीच दिसू लागतात. ही ६ चिन्हं पाहिल्यास त्वरित सावध व्हा… जाणून घ्या ही ६ चिन्हं –
शरीर-चेहऱ्यावर दिसणारे ‘हे’ बदल देतात खराब कोलेस्ट्रॉलचं संकेत!
१) डोळ्यांभोवती पिवळसर डाग
जर डोळ्यांच्या कडेवर पिवळसर उठावदार डाग किंवा बारीक गाठी दिसू लागल्या तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. याला झँथेलाझ्मा म्हणतात आणि हे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढल्याचे प्रमुख लक्षण आहे.
२) डोळ्यांच्या बाहेरील कडेवर पांढरी/राखाडी वर्तुळं
कॉर्नियल आर्कस नावाने ओळखले जाणारे हे लक्षण तरुण वयात दिसल्यास धोक्याची घंटा समजा. डोळ्यांच्या कडेला दिसणारं पांढरं वर्तुळ म्हणजे शरीरात चरबी साठण्याची सुरुवात.
३) त्वचेवर पिवळसर लहान गाठी (झँथोमा)
गाल, पापण्या, कोपर किंवा गुडघ्याजवळ पिवळसर गाठी दिसू लागल्यास ते रक्तातील चरबी वाढल्याचं स्पष्ट लक्षण आहे.
४) चेहऱ्यावर पिवळसर छटा (झँथोडर्मा)
चेहरा किंवा डोळ्याभोवती त्वचेचा रंग पिवळसर दिसू लागल्यास हेसुद्धा कोलेस्ट्रॉल वाढल्याचे गंभीर संकेत आहेत.
५) त्वचेवर निळसर-जांभळसर जाळीसारखे डिझाईन
रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे त्वचेवर जाळीसारखी निळसर-जांभळसर छटा दिसू शकते. याकडे कधीही दुर्लक्ष करू नका; ही रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्याची खूण आहे.
६) अचानक लहान-लहान गाठींचा समूह (Eruptive Xanthomas)
अचानक चेहऱ्यावर, हातावर किंवा अंगावर लालसर-पिवळसर गाठी उमटल्या तर हा गंभीर इशारा आहे. हे केवळ साधं रॅश नसून रक्तातील ट्रायग्लिसराइड्स धोकादायक पातळीवर गेल्याचं द्योतक आहे.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येतं. थोडं वाढलेलं कोलेस्ट्रॉल परत कमी करता येतं, पण दुर्लक्ष केल्यास परिणाम जीवघेणे ठरू शकतात!