Okra Water Benefits : जास्तीत जास्त लोक भेंडीची भाजी आवडीने खातात. काही लोक भेंडी फ्राय करून किंवा भरलेली भेंडी खातात. भेंडी खाण्याचे शरीराला अनेक फायदेही मिळतात. भेंडीची भाजी काही लहान मुलांना अतिशय प्रिय असते; पण बऱ्याच मोठ्या माणसांना मात्र या भाजीचा तेवढाच तिटकारा असतो. मस्त भेंडी फ्राय, सुनहरी भेंडी अशा काही स्पेशल डिश केल्या, तर ही भाजी आवडीने खाल्ली जाते. पण, नुसतीच फोडणी दिलेली गिळगिळीत भेंडी खायची असेल, तर अनेक जण नाकं मुरडतात. भेंडीची भाजी एक वेळ भलेही नका खाऊ; पण भेंडीचं पाणी मात्र दररोज प्या. अनेकांना हे माहीत नसतं की, भेंडीच्या पाण्यानेसुद्धा शरीराला एकापेक्षा अनेक फायदे मिळतात. तेच फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भेंडीचे पाणी म्हणजे काय? तुम्हाला काही भेंडी कापून रात्रभर ती पाण्यात भिजवावी लागतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते चिकट आणि चवरहीत पाणी प्यावे लागेल. जरी हे पेय आकर्षक दिसत नसले तरी ते त्याच्यातील समृद्ध पोषक घटकांमुळे अनेक आरोग्यदायी फायदे देणारे ठरते. भेंडीचे पाणी म्हणजेच Okra Water बनविणं अत्यंत सोपं आहे. एका व्यक्तीसाठी एक ग्लासभर Okra Water बनवायचे असेल, तर त्यासाठी दोन किंवा तीन मध्यम आकाराच्या ताजी भेंडी घ्या. या भेंड्यांची वरची आणि खालची टोके काढून टाका. ही भेंडी बरोबर मध्यभागी उभ्या चिरून घ्या. एक ग्लासभर पाण्यात चिरलेली भेंडी भिजत टाका. रात्रभर ही भेंडी या पाण्यात भिजू द्या. सकाळी हे पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी ते प्या. दररोज जर हे पाणी प्यायचे नसेल, तर महिन्यातून एकदा सात दिवसांचा Okra Water पिण्याचा कोर्स केला तरी चालेल.

दररोज सकाळी नियमितपणे Okra Water घेतल्यास आपल्याला कॅलरीज, प्रोटीन्स, फॅट्स, कार्ब्स, फायबर, मँगनीज, व्हिटॅमिन सी व बी- ६, थायामिन, फॉलेट, मॅग्नेशियम, कॉपर यांसारखे अनेक पोषक घटक मिळतात. भेंडीच्या पाण्याचे म्हणजेच Okra Water चे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे :

वजनात घट
Okra Water नियमितपणे घेतल्यास शरीराची चयापचय क्रिया म्हणजेच शरीराचा मेटाबोलिझम सुधारतो. जेव्हा चयापचय क्रिया उत्तम असते, तेव्हा खाल्लेल्या अन्नाचे योग्य प्रकारे पचन होते आणि शरीरामधील अनावश्यक चरबी साठून राहणे कमी होते. त्यामुळे वजनवाढीवर लगेचच नियंत्रण मिळवता येते. तसेच Okra Water मध्ये असणारे कार्ब्स शरीरातील अतिरिक्त चरबी शोषून घेतात. त्यामुळे वजन कमी करण्याचा एक आरोग्यदायी पर्याय म्हणून Okra Water कडे पाहिले जाते.

रक्तशर्करा कमी होण्यास मदत

मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी भेंडीचे सेवन लाभदायी आहे. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी दररोज भेंडीच्या पाण्याचे सेवन केल्यास त्यांच्या रक्तात वाढलेली साखर कमी होण्यास मदत होईल.

हृदयाशी निगडित समस्या दूर

त्यातील पॅक्टिन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. भेंडीतील विघळणारे फायबर रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झाल्याने हृदयाशी निगडित समस्या दूर होतात.

प्रोटीनचे पॉवर हाऊस भेंडी

भेंडी अशा भाज्यांपैकी एक आहे, ज्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. मधुमेहाच्या रुग्णांना नेहमीच आहारात प्रोटीनच्या सेवनाचा सल्ला दिला जातो. कारण- त्याने व्यक्तीला तृप्त ठेवण्यास मदत मिळते आणि शर्करायुक्त अन्न खाण्यापासून रोखते. त्याशिवाय भेंडीमध्ये कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळते. जे डायबिटीसच्या रुग्णांसाठी गरजेचे आहे.

अशा प्रकारे नियमितपणे भेंडीचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढून हंगामी आजारांना दूर ठेवता येते.