डॉ. अविनाश भोंडवे
गेल्या महिन्यापासून तापमानाचा पारा वाढल्यामुळे मे महिना येण्याआधीच उन्हाच्या झळा आणि तीव्र चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. वाढत्या उन्हाचे शरीरावर आणि आरोग्यावरही परिणाम होत असून विविध विकार या काळात डोके वर काढतात.
मूत्रमार्गाचे विकार
उन्हाळय़ातील वातावरणातल्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन लघवीचे प्रमाण कमी होते. लघवी होताना जळजळ होते. लघवी पिवळी किंवा प्रसंगी तांबडट रंगाची होते. याबरोबरच मूत्रामध्ये जंतुसंसर्ग होऊन थंडी-ताप येऊ शकतो. मूत्रिपडात किंवा मूत्रमार्गात खडे निर्माण होऊ शकतात. ज्यांना हा त्रास पूर्वी होऊन गेला आहे अशांना पुनश्च तो त्रास उद्भवण्याची शक्यता जास्त असते. मूत्रमार्गाचे किंवा मूत्रिपडाचे खडे झाले असल्यास, वैद्यकीय तपासणी करून योग्य तो उपचार करावा.
पोटाचे विकार
उन्हाळय़ात आपल्या आतडय़ांमधील पाण्याच्या तसेच क्षारांच्या प्रमाणात होणाऱ्या बदलामुळे अनेकांना उलटय़ा-जुलाबाचा त्रास होतो. लहान मुलांना विशेषत: नवजात अर्भकांना याचा त्रास होतो. उन्हाळय़ात पाण्याचे साठे कमी पडल्यामुळे, शुद्ध आणि फिल्टर न केलेले पाणी प्यायले जाते. या काळात अनेक लग्ने-मुंजी आणि सार्वजनिक समारंभांमध्ये जेवणे असतात, अनेकांचा बाहेरगावी प्रवास होतो. सुट्टय़ांमुळे गावातल्या गावातदेखील बाहेर खाणे, बागेत जाऊन तेथील उघडय़ावरील पदार्थ खाणे, सरबते किंवा रस पिणे वारंवार होते. उघडय़ावरील पदार्थ सेवन केल्याने अन्नातून जंतुसंसर्ग होणे, आमांश होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे उन्हाळय़ात अपचन, उलटय़ा, जुलाब, डिसेन्ट्री, आमांश,फूड पौयझिनग असे विकार वाढतात.
संसर्गजन्य आजार
गोवर, कांजिण्या, गालफुगी किंवा गलगंड, डोळे येणे या आजारांच्या साथी उन्हाळय़ात पसरतात.
डोळय़ांचे विकार
आपल्या डोळय़ांच्या बुबुळावर एक बारीकसा द्रवाचा तवंग असतो. त्यामुळे आपले डोळे थंड राहतात. उन्हाळय़ात हा द्रव पदार्थ हवामानातल्या उष्णतेने कमी होतो आणि डोळे जळजळणे, लाल होणे, डोळय़ातून पाणी येणे, डोळे येणे असे त्रास उद्भवतात.
त्वचेचे विकार
तीव्र उन्हात गेल्याने सर्वानाच त्वचा लाल होणे, काळी पडणे, चेहऱ्याची आग होणे, तळपायांची आग होणे असे होतात. लहान मुले, नाजूक त्वचा असलेल्या व्यक्तींना अंगावर घामोळय़ा येण्याचा त्रास होतो. सतत घाम येत असल्यामुळे काखा आणि जांघा स्वच्छ आणि कोरडय़ा न ठेवल्यास तिथे गजकर्णासारखे त्वचाविकार होऊ शकतात.
शरीरातील पाणी व क्षार कमी होणे
आपल्या शरीराच्या पेशी आणि रक्त, मांस यात ९० टक्के पाणी असते. मेंदूच्या कार्यासाठी, हातापायांच्या हालचालीसाठी आणि टवटवीत राहण्यासाठी शरीराला पाणी आणि क्षारांचे योग्य प्रमाण आवश्यक असते. वातावरणातील दाहक उष्णतेने शरीरातील पाणी आणि क्षार कमी होतात. त्यामुळे तोंडाला कोरड पडणे, तहानलेले वाटणे, तोंडाची चव जाणे, भूक मंदावणे, गळून जाणे, सतत थकल्यासारखे वाटणे, डोके जड होणे, गरगरणे, हात-पाय तसेच अंग दुखणे, पोटऱ्या दुखणे अशासारख्या तक्रारी उद्भवतात. हे त्रास उन्हाळय़ात सर्रास आढळतात.
उष्माघात (हीट स्ट्रोक)– उन्हाळय़ामध्ये खूप उन्हात काम केल्यास अंगातील क्षार आणि पाणी अतिशय कमी जर झाले तर उष्माघात होऊ शकतो. यामध्ये जास्त तापमानामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमालीची खालावते. मेंदूमध्ये शरीराचे तापमान कायम राखणारी एक यंत्रणा असते. पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ही यंत्रणा पूर्ण कोलमडते. परिणामत: त्या व्यक्तीला घाम येणे, मळमळ, उलटय़ा, घबराट आणि जास्त प्रमाणात थकवा, त्वचा निळी पडणे, शरीराचे तपमान अचानक कमी होणे, चक्कर येणे, रक्तदाब आणि नाडीचे ठोके कमी होणे अशी लक्षणे दिसतात. अशा व्यक्तीस वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर त्याला झटके येणे, बेशुद्ध होणे, कोमात जाणे अशा प्रकारचे गंभीर त्रास होतात.
उपाय
१. दर तासाला एक ग्लास याप्रमाणे २-३ लिटर पाणी प्यावे. त्याला सरबत, ताक, पन्हे, शहाळी अशा द्रवपदार्थाची जोड असावी.
२. बर्फाळलेली कोलायुक्त शीतपेये, कृत्रिम सरबते, शीतपेये, तयार पॅकबंद सरबते पिऊ नयेत.
३. उन्हातून घामाघूम होऊन आल्यावर लगेच पाणी पिऊ नका.
४. किलगड, संत्री, काकडय़ा, द्राक्षे अशा फळांचा समावेश आहारात असावा.
५. उन्हाच्या वेळी बाहेर जाणे शक्यतो टाळावे, जावे लागल्यास डोक्यावर टोपी, हॅट किंवा स्त्रियांनी डोक्यावर पदर, स्कार्फ वापरावा.
६. सैल सुती आणि फिकट रंगाचे कपडे वापरावेत.
७. बाहेर जाताना डोळय़ावर काळा चष्मा वापरावा.
८. डोळे साध्या पाण्याने दिवसातून ५-६ वेळा धुवावेत.
९. सनस्क्रीन लोशन चेहऱ्याला व हातांना लावावे.
१०. आंघोळीला थंड पाणी वापरावे, आंघोळीनंतर अंगाला टाल्कम पावडर लावावी. डीओडोरंट शक्यतो वापरू नये.
११. मांसाहार, तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. पालेभाज्यांवर भर ठेवावा.
१२. उन्हाळय़ाच्या सुट्टीत मुलांनी सकाळी लवकर उठून ११ च्या आत मैदानी खेळ खेळावेत. दुपारी ११ ते सायंकाळी पाच या काळात बाहेर खेळण्याऐवजी घरातील बैठे खेळ, वाचन, टीव्ही, कम्प्युटर अशा इतर करमणुकीच्या साधनांचा आनंद घ्यावा. संध्याकाळी उन्हे उतरल्यावर पुन्हा खेळायला हरकत नाही. खेळताना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या जवळ असाव्यात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer health mercury temperature heat sun disorder waters amy
First published on: 13-04-2022 at 00:12 IST