लोणचे हा शब्द ऐकताच अनेकांच्या जिभेला पाणी सुटते. काहींना जेवणात कितीही भाज्या असल्या तरी लोणच्याशिवाय त्याचे जेवण पूर्ण होत नाही, डाळ, भात, पापड आणि त्यासोबत लोणच्याची एक फोड असली तरी पोटभर जेवल्यासारखे वाटते. भारतात लोणच्याचे वेगवेगळे प्रकार असले तरी महाराष्ट्रात उन्हाळात कैरीचे लोणचे आवडीने बनवले जाते. कारण यादरम्यान कैऱ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. अनेकदा कैरीचे लोणचे पटकन खराब होत असल्याचे दिसून येते. पण यामागे अनेक कारणे आहेत, ज्यामुळे असे घडते. अशा परिस्थितीत आज तुम्हाला कैरीचे लोणचे पटकन खराब होऊ नये म्हणून काही ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही अनेक वर्षे लोणचे बरणीत साठवून ठेवू शकता.
लोणचे वर्षानूवर्षे खराब होऊ नये म्हणून ‘या’ पाच गोष्टींची काळजी घ्या
१) कच्ची कैरी निवडा
जर तुम्हाला लोणचे जास्त काळ ठिकवून ठेवायचे असेल तर यासाठी तुम्हाला योग्य कच्ची कैरी निवडावी लागेल. कैरी कच्ची आणि कडक असणे खूप महत्त्वाचे आहे. थोडाशी पिकलेली कैरीदेखील लोणच्याची चव खराब करू शकते. म्हणूनच कैरी खरेदी करताना ती कच्ची आहे याकडे लक्ष द्या.
२) काचेचे किंवा चिनी मातीची बरणी वापरा
आंब्याचे लोणचे बनवल्यानंतर ते ठेवण्यासाठी काचेचे भांडे सर्वात योग्य मानले जाते. जर तुम्हाला चिनी मातीच्या भांड्यात लोणचे ठेवायचे नसेल तर तुम्ही ते काचेच्या भांड्यात किंवा डब्यात ठेवू शकता. लोणचे प्लास्टिकच्या डब्यात न ठेवण्याचा प्रयत्न करावा, कारण त्यामुळे ते खराब होण्याचा धोका वाढतो.
३) बरणीची स्वच्छता
कैरीचे लोणचे बरणीत भरण्यापूर्वी ती बरणी स्वच्छ आहे का याची खात्री करा. कारण, बरणी स्वच्छ नसेल तर त्यामध्ये बुरशी वाढण्याचा धोका असतो, ज्यामुळे लोणचे खराब होऊ शकते. बरणी गरम पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या, जेणेकरून लोणचे अनेक वर्षे टिकेल.
मिरची कापल्यानंतर हातांची जळजळ होतेय? हे ६ सोपे उपाय वापरून पाहा, काही मिनिटांत होईल शांत
४) चांगल्या तेलाचा वापर करा
लोणचे जास्त काळ टिकून राहावे, असे वाटत असेल तर त्यात चांगल्या तेलाचा वापर करावा. कैरीच्या लोणच्यामध्ये चव आणण्यासाठी तेल खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे नेहमी चांगले तेल निवडा. उत्तम दर्जाचे मोहरीचे तेल वापरणे चांगले. तसेच लोणच्यामध्ये भरपूर तेल ठेवा.
५) लोणचे काढण्याची पद्धत
तुम्ही कैरीचे लोणचे काचेच्या भरणीत भरून सुरक्षित ठेवले असेल पण ते काढताना काळजी घेणे फार गरजेचे आहे. लोणचे जास्त दिवस टिकायचे असेल तर स्वच्छतेची काळजी घ्या. अस्वच्छ चमच्याने किंवा हाताने लोणचे बाहेर काढणे टाळा. लोणचे नेहमी हवाबंद डब्यात आणि थंड ठिकाणी ठेवावे.
