5 Silent Killer Habits Damaging Your Heart : आजच्या व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैलीत आपण जबाबदाऱ्या, सामाजिक जीवनात इतके गुरफटले गेलो आहोत की आपल्या आरोग्याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. धावपळीच्या जीवनशैलीत नकळत अशा काही सवयी अंगवळणी पाडल्या आहेत, ज्या हळूहळू हृदयाचं नुकसान करत आहेत. सकाळचा नाश्ता टाळणं, सतत स्क्रीनसमोर बसून राहणं, झोपेचा अभाव, ताणतणाव आणि बाहेरचं अन्न — या सवयी रोजच्या जीवनाचा भाग झाल्या आहेत. पण या निरुपद्रवी वाटणाऱ्या गोष्टींमुळे हृदयावर प्रचंड ताण निर्माण होतो.

जनसत्ताच्या वृत्तानुसार अमेरिकन कार्डिओलॉजिस्ट डॉ. दिमित्री यारानोव यांच्या मते, या सवयी सायलेंट किलर्स आहेत ज्या साध्या सवयी दिसतात पण त्यांचे परिणाम अत्यंत हृदयासाठी घातक असतात. सुरुवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, पण कालांतराने या हृदयाचं आरोग्य बिघडवतात आणि हार्ट अटॅकचा धोका वाढवतात.

आपल्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या हृदयासाठी विषासारखे काम करतात आणि आपण त्या कशा सुधारू शकतो.

झोपेचा अभाव – हृदयाचा पहिला शत्रू (Lack of Sleep – The First Enemy of Heart)

डॉ. यारानोव सांगतात की, “झोपेचा अभाव हा हृदयासाठी सर्वात मोठा शत्रू आहे. झोप पूर्ण न झाल्यास रक्तदाब वाढतो, वजन वाढतं आणि शरीर थकून जातं. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अहवालानुसार, कमी झोपेमुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो. त्यामुळे दररोज किमान सात ते आठ तास झोप घेणं अत्यावश्यक आहे.

दीर्घकाळ बसून राहणं – हृदयासाठी नवं स्मोकिंग (Sitting Too Long – The New Smoking)

तज्ज्ञांच्या मते, “सिटिंग इज द न्यू स्मोकिंग.” म्हणजेच दीर्घकाळ बसून राहणं आणि उशिरापर्यंत मोबाइल स्क्रोल करणं, दोन्हीही हृदयासाठी हानिकारक आहे. २०२४ मधील एका अभ्यासात दिसून आलं की, दिवसभर बसून राहणं हे नियमित व्यायाम करणाऱ्यांनाही हृदयरोगाच्या धोक्यात ढकलतं. त्यामुळे प्रत्येक अर्ध्या तासाने उठून थोडं चालणं, स्ट्रेच करणं आणि स्क्रीन टाइम कमी करणं आवश्यक आहे.

ताणतणावाचं दुर्लक्षण – मोठी चूक (Ignoring Stress – A Costly Mistake)

ताणतणाव हा आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, पण तो दुर्लक्षित करणं म्हणजे स्वतःच्या हृदयाशी अन्याय करणं. डॉ. यारानोव सांगतात की, दीर्घकाळाचा ताण मेंदू आणि हृदय दोघांवरही घातक परिणाम करतो. सतत चिंता, झोपेचा अभाव, छातीत दडपण जाणवणं ही लक्षणं ताण वाढल्याचं संकेत असतात. त्यामुळे दररोज काही मिनिटं ध्यान, योग किंवा मेडिटेशन केल्याने मन शांत राहतं आणि हृदय सशक्त होतं.

फास्ट फूड आणि कॅफीन – हृदयावर वाढतं ओझं (Fast Food & Caffeine – The Hidden Load on Heart)

त्याचप्रमाणे, बाहेरचं फास्ट फूड, अधिक कॅफीन आणि साखरेचं सेवन हृदयावर अतिरिक्त ताण आणतं. सकाळचा नाश्ता टाळून कॉफीवर दिवसाची सुरुवात करणं, किंवा रात्री उशिरा भारी अन्न खाणं यामुळे ब्लड शुगर असंतुलित होतं, कोलेस्टेरॉल वाढतो आणि हृदयातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो. दीर्घकाळ या सवयी टिकल्या तर हृदयातील ब्लॉकेज वाढून हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो. त्यामुळे घरचं पौष्टिक आणि संतुलित अन्न, मर्यादित कॅफीन आणि पुरेशी झोप — हेच खऱ्या अर्थानं हृदयाचं रक्षण करतात.

डॉक्टर सांगतात, “हृदयाचं आरोग्य राखायचं असेल तर ‘स्मार्ट’ जीवनशैली निवडा – वेळेवर झोप, घरचं संतुलित अन्न, नियमित हालचाल आणि ताणमुक्त राहणं. हृदयाचं नुकसान होतं तेव्हा ते आवाज करत नाही, पण वेळ गेल्यानंतर त्याचे परिणाम गंभीर ठरतात.