Worst Foods For Bones: कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी एक अत्यंत आवश्यक पोषक तत्व आहे, जे आपली हाडे, दात आणि स्नायू मजबूत करण्यासाठी प्रभावी आहे. शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास स्नायू आणि सांधे कडक होणे, दात दुखणे, त्वचा कोरडी होणे, नखे कमजोर होणे, तुटणे अशा समस्यांचा त्रास होऊ लागतो. कॅल्शियमची कमतरता असल्यास गुडघेदुखीची समस्यादेखील सतावते. ही समस्या दूर करण्यासाठी आपण घरच्या घरीच काही पौष्टिक पदार्थांचे सेवन करतो. परंतु, तुम्हाला ठाऊक आहे का? आपण अनेकदा नकळत असे अनेक पदार्थदेखील खातो, जे आपल्या शरीरातील कॅल्शियम पूर्णपणे कमी करतात.
‘या’ पदार्थांमुळे शरीरातील कॅल्शियम कमी होते
शीतपेय
कोका-कोला किंवा इतर सोडा-आधारित पेय तुमच्या शरीरातील कॅल्शियम कमी करतील. त्यामध्ये सोडा असतो, जो तुमच्या हाडांमध्ये जमा होतो, ज्यामुळे कॅल्शियम कमी होते.
साखर
जास्त साखर आरोग्यासाठी हानिकारक आहे. जास्त गोड पदार्थ किंवा पांढरी साखर खाल्ल्याने तुमच्या शरीरातील कॅल्शियम हळूहळू कमी होऊ शकते. साखरेचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाणदेखील वाढते.
मीठ
जास्त मीठ खाणे हे उच्च रक्तदाबासाठी धोकादायक आहे, परंतु त्यामुळे शरीरातील कॅल्शियमदेखील कमी होते. निरोगी व्यक्तीने दररोज ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ सेवन करू नये. यापेक्षा जास्त मीठ खाणे हे अनेक आजारांना थेट आमंत्रण आहे.
प्रक्रिया केलेले अन्न
हल्ली अनेक जण भूक लागल्यावर पॅकेज्ड फूड खातात, परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता होऊ शकते. पॅकेज्ड फूडमध्ये कोणतेही पोषण नसते.
कॅफिनयुक्त पदार्थ
जास्त प्रमाणात कॅफिनयुक्त पदार्थ किंवा चहा आणि कॉफीसारखी पेये सेवन केल्याने कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊ शकते. कॅफिन केवळ कॅल्शियम कमी करत नाही तर मेंदूची गतीदेखील कमी करते, म्हणून चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित करा.
कॅल्शियमसाठी ‘हे’ पदार्थ खा
दूध आणि दही
कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी, तुम्ही दूध, दही आणि चीजसारखे पदार्थ खाऊ शकता. या पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते आणि शरीराला इतर फायदेदेखील मिळतात.
नट-ड्राय फ्रूट्स
कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही काजू किंवा सुकामेवादेखील खाऊ शकता. भोपळा, चिया सीड्स आणि अळशीचे बियाणे खूप आरोग्यदायी आहेत. याव्यतिरिक्त, मखाना आणि काजू खा.
हिरव्या भाज्या
तुमच्या आहारात पालक, कोबी, शिमला मिरची आणि वाटाणे यांसारख्या हिरव्या भाज्यांचा समावेश करा. हे पदार्थ खाल्ल्याने तुमच्या कॅल्शियमची गरज पूर्ण होण्यास मदत होईल.
