भूक न लागणे हा प्रकार बहुतेक सर्वांबरोबरच कधी ना कधी होतो. काही दिवसांसाठी असं होणं हे सामान्य आहे मात्र अनेक दिवस भूक लागत नसेल तर नक्कीच तो चिंतेचा विषय आहे. भूक न लागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. अगदी शारिरीक जडणघडणीपासून ते मानसिक कारणामुळेही भूकेवर परिणाम होतो. भूक न लागण्याच्या समस्येकडे जास्त काळ दूर्लक्ष केल्यास शरिरावर त्याचे दिर्घकालीन परिणाम होऊ शकतात म्हणूनच जाणून घेऊयात भूक न लागण्याची कारणे काय असतात आणि त्यासंदर्भात काय करता येईल याबद्दल…
ताणतणाव
जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ताण असेल किंवा तुम्ही तणावाखाली असल तर शरिरात एड्रेनालाईन नावाचे संप्रेरक स्त्राव मोठ्या प्रमाणात होतो. ज्यामुळे हृदयाची धडधड वाढते आणि पचनक्रीया मंदावते. त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही.
औषधे
अनेक औषधांमुळे कमी भूक लागते. प्रतिजैविके (अॅण्टीबायोटिक्स), अॅण्टीफंगल्स, आणि स्नायू शिथिलतेसंदर्भातील औषधांमुळे भूक कमी होते. साध्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्ही डिप्रेशन, मायग्रेन, उच्च रक्तदाब, अनेक वर्षांपासूनचे आजार, फुफ्फुसांसंदर्भातील आजार आणि पार्किन्सन संदर्भातील औषधे घेत असाल तर तुमची भूक मरते.
सर्दी ताप
तुम्ही आजारी असताना शरिरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचा जास्त वापर होत असतो. यामुळे अधिक अशावेळेस शरिरामध्ये सायटोकीन्स नावाच्या रसायनाचा स्त्राव होतो. त्यामुळे भूक कमी लागते किंवा लागतच नाही. मात्र अशा परिस्थितीमध्ये भूक न लागणे हे इंडिकेशन असते की शरिराला आरामाची गरज आहे. मात्र आजारी असताना अधूनमधून थोडं खालल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
वय
वढत्या वयाबरोबर भूकदेखील मंदावते. यामागे अनेक कारणे असतात असे आपण म्हणू शकतो. पचनक्रीया मंदावल्याने थोडेसे खाल्ले तरी बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. तसेच पदार्थांकडे पाहून, त्यांच्या सुगंधाने अवेळी लागणारी भूक असा प्रकार वयस्कर लोकांच्या बाबतीत होत नाही. संप्रेरकांचे प्रमाण बदलणे, आजारपण, औषधे अशा अनेक कारणांने वय वाढत असताना भूक मंदावते.
मधुमेह
मधुमेहावर वेळीच नियंत्रण न मिळवल्यास रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढल्याने रक्त वाहून नेणाऱ्या नसांवर परिणाम होऊ शकतो. अशावेळेस सर्वाधिक ज्या नसांवर परिणाम होतो त्यापैकी एक नस म्हणजे पोटातील स्नायूंना रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करणारी व्हेगस नर्व्ह. कोणत्याही कारणाने या नसेच्या कार्यावर परिणाम झाल्यास अन्ननलिकेतून अन्नपदार्थ सामान्य गतीने पुढे सरकरण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे भूक कमी लागते.
दारु
जास्त प्रमाणात दारु प्यायल्याने भूक कमी लागते. भूक लागण्यासंबंधीची रासायनिक प्रक्रिया दारुच्या सेवनाने मंदावते. त्यामुळे अधिक प्रमाणात दारु प्यायल्यास भूक कमी लागते.