मधुमेहासह येणारा सर्वात मोठा धोका म्हणजे हृदयाचं आरोग्य जपणे हा आहे.  मधुमेह हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचे प्रमुख कारण आहे. आपल्या देशात सध्याच्या ट्रेंडमध्ये तीन व्यक्तींपैकी एकाला मधुमेह असल्याचे दिसून येते. हृदयरोग व मधुमेह यांचा संबंध फार जवळचा असतो. यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचे, असे हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सचे सल्लागार डॉ. प्रमोद कुमार के यांनी सांगितले.

डॉ. प्रमोद कुमार सांगतात, जगभरात मधुमेहाचे प्रमाण वाढतानाच दिसून येत आहे. भारतात मधुमेहाचे प्रमाण वाढत असतानाच, इतर गंभीर अशा आरोग्य समस्या देखील बळावताना दिसून येत आहेत. मधुमेहींमध्ये रक्तदाबाचा विकार जास्त आढळतो. अधिक चरबी, लठ्ठपणा, अनियंत्रित मधुमेह, मानसिक ताण, धूम्रपान यामुळेही हृदयविकाराची शक्यता बळावते. मधुमेहाच्या रोग्यांमध्ये हृदयविकार यातनाविरहित असतो. त्यामुळे अटीतटीचा प्रसंग येण्यापूर्वीच हृदयरोगाचं निदान व्हायला पाहिजे.

आणखी वाचा : Health Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी व्यायाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घ्या

मधुमेहाच्या रूग्णांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त

मधुमेह असणाऱ्या रूग्णांना हृदय विकाराचा झटका येणे आणि स्ट्रोकचा अधिक धोका असू शकतो. यामागचे कारण असे की त्यांच्या रक्तातील साखर बऱ्याचदा वाढलेली आणि अनियंत्रित असते. यामुळे शरीरातील बऱ्याच रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे हृदयाला मिळणारा ऑक्सीजन अपुरा पडू शकतो आणि त्यामुळे मग हृदयाच्या आजारांना आमंत्रण मिळते. तसेच मधुमेहामुळे मेंदूचा झटका, मूत्रपिंड निकामी होणे, न्यूरोपॅथी आणि मायोपॅथी याशिवाय धमनी रोग, रक्तवाहिन्यासंबंधी रोग यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात.

मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत लक्षात घेता, उपवासातील साखर, जेवणानंतरची साखर आणि तीन मासिक सरासरी HbA1C तपासून मधुमेह लवकरात लवकर ओळखणे फार महत्वाचे आहे. मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत टाळण्यासाठी इष्टतम नियंत्रण मिळविण्यासाठी घरगुती रक्तातील ग्लुकोजचे निरीक्षण करणे खूप उपयुक्त आहे. छातीत दुखणे, श्वास लागणे, संवेदना, पाय सूजणे आणि धडधडणे यासारख्या हृदयविकाराच्या लक्षणांचे हृदयरोगतज्ज्ञांकडून मूल्यांकन करणे आवश्यक असल्याचेही डॉक्टर सांगतात.

धोके कमी करण्यासाठी काही उपाय

कोलेस्टेरॉलचा स्तर कमी ठेवा.

रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रणात ठेवणे.

रक्तदाबाचे व्यवस्थापन.

निरोगी अशा जीवनशैलीचा अवलंब करा.

आपली औषधे नियमितपणे घ्या.