लोकप्रिय चिनी शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप TikTok ला भारतात बॅन केल्याचा चांगलाच फायदा टिकटॉकप्रमाणेच फीचर्स असलेल्या अन्य मेड इन इंडिया अ‍ॅप्सना होतोय. असंच एक मेड इन इंडिया Mitron अ‍ॅप दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच या अ‍ॅपने एक कोटी डाउनलोडिंगचा आकडा पार केला होता, आणि आता या अ‍ॅपने केवळ पाच दिवसांनंतरच 1.7 कोटी डाउनलोड्सचा आकडा ओलांडला आहे.

युजर्सना सहज आपले क्रिएटिव्ह व्हिडिओ पोस्ट करता यावे अशाप्रकारे हे अ‍ॅप डिझाइन करण्यात आलं आहे. अ‍ॅपमध्ये विविध बॅकग्राउंड म्यूजिक आणि डायलॉग्सचा वापर करता येतो. ‘टिकटॉक अ‍ॅप बॅन केल्यापासून Mitron अ‍ॅपच्या दररोजच्या ट्रॅफिकमध्ये तबब्ल ११ पटींहून जास्त वाढ झाली’, असे या अ‍ॅपची डेव्हलपर कंपनी MitronTV कडून सांगण्यात आले. Mitron हे टिकटॉकसारखेच फीचर्स असलेलं अ‍ॅप असून हे पूर्णतः मोफत आहे. युजर्स आपले व्हिडिओ बनवून याद्वारे शेअर करु शकतात.

यापूर्वी मे महिन्यामध्ये Mitron हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आलं होतं. गुगलच्या पॉलिसीचं उल्लंघन केल्यामुळे हे अ‍ॅप हटवण्यात आलं होतं. त्यावेळी, ‘कोणतेही बदल न करता दुसऱ्या अ‍ॅपचे फीचर्स आणि कंटेंट कॉपी करणं गुगलच्या नियमांचं उल्लंघन आहे. Google Play वर आधीपासून उपलब्ध असलेल्या अ‍ॅपप्रमाणेच एखादं अ‍ॅप युजर्सना अनुभव आणि फीचर देत असेल तर आम्ही अशा अ‍ॅप्सना परवानगी देत नाही. अ‍ॅप्सनी अनोख्या फीचर्स आणि सर्व्हिसद्वारे युजर्सना चांगला अनुभव द्यायला हवा’, असं गुगलने म्हटलं होतं. पण, त्यानंतर काही बदलांसह हे अ‍ॅप पुन्हा प्ले स्टोअरवर आलं. विशेष म्हणजे आता हे अ‍ॅप प्ले स्टोअरच्या टॉप चार्ट्समध्ये पोहोचलं असून 4.5 स्टार रेटिंग मिळाली आहे.