हळदीपासून मिळणाऱ्या घटकापासून तयार होणाऱ्या डोळ्याचे औषधाचा (आय ड्रॉप) वापर काचबिंदूच्या सुरुवातीच्या टप्प्यात केला जाऊ शकतो असे संशोधकांना एका अभ्यासात आढळले आहे.
ब्रिटनमधील इम्पेरियल कॉलेज लंडन आणि लंडन विद्यापीठ महाविद्यालय येथील संशोधकांनी हळदीमध्ये आढळणाऱ्या करक्युमिनच्या विद्रव्यतेवर उपाय काढीत त्याचा आय ड्रॉप म्हणून वापर करण्याच्या आव्हानावर मात केली आहे. हा अभ्यास जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. हळदीपासून तयार होणाऱ्या आयड्रॉपमुळे उंदराच्या डोळ्यांमधील रेटिना पेशींचे नुकसान कमी होण्यास मदत होत असल्याचे नमूद केले आहे. रेटिना पेशी कमकुवत झाल्याने काचबिंदू होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे या औषधाचा इतर समस्यांवर काय उपयोग होऊ शकतो याचीदेखील संशोधक तपासणी करीत आहेत. काचबिंदू ते अलझायमर्स या डोळे आणि मेंदूच्या समस्यांवर उपचारासाठी करक्युमिनचा उपयोग केला जाऊ शकतो असे आढळून येत आहे. याचे आय ड्रॉप्समध्ये रूपांतर केल्यास लाखो लोकांना याचा फायदा होणार असल्याचे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील फ्रान्सिस्का कॉर्डिएरो यांनी म्हटले.
जगातील ६० दशलक्ष लोकांमध्ये काचबिंदूची समस्या असून यातील १० पैकी एका प्रकरणात अंधत्व येते. यामध्ये रेटिनाच्या पृष्ठभागावर असणाऱ्या पेशींचे नुकसान होते. पेशींच्या नुकसानावर सुरुवातीच्या टप्प्यात आळा घालण्यास अद्याप यश आले नसल्यामूळे यावर उपाययोजना शोधून काढणे हे संशोधकांचे लक्ष्य आहे. यापूर्वीच्या अभ्यासात करक्युमिनचे सेवन केल्याने रेटिनाच्या पेशींचे रक्षण होत असल्याचे समोर आले होते. परंतु याहून अधिक विश्वासार्ह पद्धत शोधून काढण्यासाठी संशोधकांनी हा अभ्यास केला.