Uncontrolled diabetes signs and symptoms: गेल्या काही वर्षांत मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तरुण वयातच लोक या दीर्घकालीन आजाराचे बळी ठरत आहेत. मधुमेह हा एक असा आजार आहे, ज्याला मूक हत्यार म्हणतात. जर हा आजार नियंत्रित केला नाही, तर तो शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांना शांतपणे हानी पोहोचवू शकतो. जर रक्तातील साखरेच्या पातळीकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले गेले, तर हा आजार एखाद्या व्यक्तीची हृदयरोग, मूत्रपिंडाचे नुकसान आणि डोळ्यांशी संबंधित आजार याद्वारे ‘शिकार’ करू शकतो. जर तुम्हाला मधुमेह नियंत्रित करायचा असेल, तर वेळोवेळी रक्तातील साखरेची तपासणी करणे आणि त्याची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे.
हेल्थलाइनच्या मते, जेव्हा रक्तातील साखर अनियंत्रित होते तेव्हा आपल्या शरीरात काही लक्षणे दिसू लागतात. जर ही लक्षणे वेळीच लक्षात आली, तर रक्तातील साखरेची पातळी सहज नियंत्रित करता येते. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असताना शरीरात कोणती लक्षणे दिसतात ते जाणून घेऊया.
निर्जलीकरण
जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा शरीर जास्तीचे ग्लुकोज लघवीद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे वारंवार तहान लागते. या स्थितीला ‘पॉलीडिप्सिया’ म्हणतात. तुम्ही नेहमीपेक्षा जास्त पाणी पिऊ शकता; पण तरीही तहान लागत असेल, विशेषतः रात्री. सतत तहान लागणे हे अनियंत्रित मधुमेहाचे प्रारंभिक लक्षण असू शकते, ज्याकडे दुर्लक्ष करू नये.
वारंवार लघवी होणे
जेव्हा रक्तातील साखरेची पातळी १८० मिलिग्रॅम/डीएलपेक्षा जास्त असते, तेव्हा मूत्रपिंड मूत्रमार्गे अतिरिक्त साखर बाहेर टाकते. त्यामुळे दिवसा आणि रात्री वारंवार लघवी होते, ज्याला पॉलीयुरिया म्हणतात. त्यामुळे झोपेत अडथळा आणि थकवा येऊ शकतो. या लक्षणांमुळे डिहायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकते म्हणून ते गांभीर्याने घेणे महत्त्वाचे आहे.
वाढलेली भूक
जेव्हा शरीराच्या पेशी इन्सुलिनची कमतरता किंवा इन्सुलिनचा प्रतिकार यांमुळे ग्लुकोज शोषू शकत नाहीत, तेव्हा मेंदू अधिक खाण्याचे संकेत देतो आणि त्यामुळे वारंवार भूक लागते, ज्याला पॉलीफॅगिया म्हणतात. जास्त खाल्ल्यानंतरही तुम्हाला समाधान वाटत नाही. जर हे लक्षण कायम राहिले, तर रक्तातील साखर आणि वजन अशा दोन्ही बाबी वाढू शकतात.
वजन कमी होणे
जेव्हा शरीराला ग्लुकोजपासून ऊर्जा मिळत नाही, तेव्हा ते चरबी आणि स्नायूंचे उर्जेत रूपांतर करण्यास सुरुवात करते. त्यामुळे तुमचा आहार सारखाच राहिला तरीही वजन जलद गतीने कमी होते. हे लक्षण टाईप १ मधुमेहात अधिक सामान्य आहे; परंतु अनियंत्रित टाईप २ मधुमेहातदेखील त्याचे रूपांतर होऊ शकते. हे एक गंभीर धोक्याचे लक्षण आहे.
थकवा आणि अशक्तपणा
ग्लुकोज हा शरीराच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. जेव्हा ग्लुकोज पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही तेव्हा शरीरात ऊर्जेची तीव्र कमतरता निर्माण होते. परिणामी, तुम्ही जेवत असलात आणि विश्रांती घेत असलात तरीही सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. या थकव्याचा तुमचे काम, विचार करण्याची क्षमता यांवर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.
धूसर दृष्टी
जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते तेव्हा ते डोळ्याच्या लेन्समधून द्रव खेचते, ज्यामुळे लेन्सचा आकार बदलतो. त्यामुळे दृष्टी बिघडून धूसर दिसू लागते. जर रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त काळ राहिले, तर ते डोळ्यांच्या नसांना नुकसान पोहोचवू शकते आणि डायबेटिक रेटिनोपॅथीसारख्या गंभीर समस्या निर्माण करू शकते. म्हणून वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे.
जखमा हळूहळू बरे होणे
रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळपर्यंत वाढल्याने शरीराची रक्ताभिसरण प्रणाली आणि रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. त्यामुळे जखमा बरे होण्याचे प्रमाण मंदावते आणि विशेषतः पाय, त्वचा, हिरड्या व मूत्रमार्गाच्या संसर्गाची शक्यता वाढते. किरकोळ दुखापती काही आठवड्यांपर्यंत बऱ्या होऊ शकत नाहीत. हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
हात आणि पाय सुन्न होणे
मधुमेह न्यूरोपॅथी तेव्हा होते जेव्हा दीर्घकाळापर्यंत उच्च साखरेचे प्रमाण शरीराच्या नसांना नुकसान पोहोचवते. त्याची सुरुवात प्रथम पायांच्या किंवा हातांच्या बोटांमध्ये मुंग्या येणे, जळजळ होणे किंवा सुन्नपणाने होते. हळूहळू हे वेदना किंवा संवेदना कमी होण्यापर्यंत वाढू शकते, ज्यामुळे हालचाल करणे कठीण होते आणि दुखापत होण्याचा धोका वाढतो.