US food authority issues warning against indian cookware brand : अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन (FDA)ने एका भारतात तयार झालेल्या एका विशिष्ट ब्रँडच्या अन्न बनवण्याच्या भांड्यांबाबत अलर्ट जारी केला आहे. या भांड्यातून आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकेल इतक्या प्रमाणात शिसे (lead) अन्नात मिसळत असल्याची बाब काही चाचण्यांमधून समोर आली आहे, त्यानंतर हा इशारा दिला आहे.

१३ ऑगस्ट, २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या या अर्टमध्ये किरकोळ विक्रेते आणि ग्राहक या दोघांनाही आयात केलेल्या अशा भांड्यांची विक्री किंवा वापर टाळण्यास सांगण्यात आले आहे. हे कुकवेअर टायगर व्हाईटची कडाई/कराही हे असून याची निर्मिती भारतात प्युअर अॅल्युमिनियम युटेन्सिल्स (टायगर व्हाईट) या नावाने केली जाते.

एफडीएने म्हटले आहे की, अॅल्युम्युनियम, ब्रास आणि हिंडालियम/हिंडोलियम किंवा इंडालियम/इंडोलियम पासून बनवलेली कढाई जेवण बनवण्यासाठी वापरल्याने अन्नात शिसे मिसळत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे अन्न सेवन करण्यासाठी असुरक्षित बनते असेही सांगण्यात आले आहे.

या चांगलेच प्रसिद्ध असलेल्या या भांड्याचे विक्रेते जमैका, न्यूयॉर्कमध्ये असलेले मन्नान सुपरमार्केट हे आहे.पण अद्याप एफडीएने (FDA) हा अलर्ट जारी करण्यासाठी जबाबदार डिस्ट्रीब्युटर कोण आहे याबद्दल माहिती दिलेली नाही. त्यामुळे ही भांडी अजूनही स्टोअर्समध्ये उपलब्ध असण्याची शक्यता आहे. या भांड्याची विक्री थांबवण्याचे आवाहन किरकोळ विक्रेत्यांना करण्यात आले आहे आणि ग्राहकांना ते स्वयंपाकासाठी किंवा अन्न साठवण्यासाठी वापरू नये असा सल्ला देण्यात आला आहे.

काळजी करण्याची आवश्यकता का आहे?

शिसे हा विषारी धातू आहे. याचे थोडेही प्रमाण शरिरात गेल्यास आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता यांना विशेष धोका आहे. यामुळे मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, यामुळे आयक्यू कमी होणे आणि कोणत्याही इतर लक्षणांशिवाय वर्तवणुकीसंबंधी समस्या उद्भवू शकतात.

प्रौढांमध्ये चक्कर येणे, डोकेदुखीस, पोटदुखी, उलट्या होणे आणि जास्त संपर्कात आल्याने न्यूरोलॉजिकल बदल देखील होऊ शकतात.

असं भांडं विकत घेतलं असेल तर काय?

अमेरिकन एफडीएने ग्राहकांना स्पष्टपणे सांगितले की, अशी भांडी वापरणे तात्काळ थांबवा आणि ते फेकून द्या. अशी भांडी दुसऱ्यांना देणे टाळा जेणेकरून इतर कोणी त्याचा वापर करणार नाही. शिसे तुमच्या शरिरात गेल्याचा किंवा रक्तात त्याचे प्रमाण वाढले असल्याचा संशय असेल तर आरोग्य तज्ज्ञांशी संपर्क साधा.