Skin Care Tips: चेहऱ्यावर नको असलेल्या केसांमुळे अनेकदा तुम्हाला लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागतो. हे केस काढण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा पार्लरमध्ये जावे लागते. त्यात पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नाही मिळाला, तर मग ते चेहऱ्यावर खराब दिसतात आणि त्यामुळे तुमचा संपूर्ण लूक बिघडून जातो. तसंच जर तुम्ही मेकअप करत असाल, तर या केसांमुळे तो नीट लावला जात नाही. या केसांपासून सुटका करण्यासाठी तुम्ही पार्लरमध्ये जाऊन किंवा केमिकल उत्पादने वापरून उपाय करता, परंतु जर तुम्ही यासाठी नैसर्गिक मार्ग शोधत असाल तर आम्ही तुम्हाला तांदूळ आणि बेसनापासून बनवलेल्या फेस पॅकबद्दल सांगत आहोत. हा फेसपॅक घरच्याघरी बनवता येतो आणि यासाठी लागणारं साहित्य घरीचं उपलब्ध असल्याने, तुम्हाला पैसे देखील लागणार नाहीत. याच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरील केस काढू शकता तसेच त्यात असलेले घटक तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतात. तर हा फेस पॅक कसा बनवायचा आणि त्याचे फायदे जाणून घ्या
चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी फेस पॅक कसा बनवायचा
साहित्य
१) तांदळाचे पीठ
२) बेसनाचे पीठ
३) हळद
४) दुध
५) खोबरेल तेल
फेसपॅक बनवायचा कसा?
हा घरगुती फेसपॅक बनविण्यासाठी प्रथम सर्व कोरडे साहित्य एका भांड्यात मिसळा. नंतर थोडं थोडं दूध टाका आणि मिक्स करत राहा. नंतर त्यात खोबरेल तेल टाका आणि काही वेळ तसंच ठेवा.
लावण्याची पद्धत
हा फेसपॅक लावण्यासाठी सर्वात आधी, चेहरा पाण्याने धुवून स्वच्छ करा. आता हा फेस पॅक चेहऱ्यावर चांगला लावा आणि नंतर कोरडा होऊ द्या. फेसपॅक पूर्ण सुकल्यावर एका दिशेने बोटाच्या साहाय्याने काढा. हे संपूर्ण चेहऱ्यावर करा आणि संपूर्ण फेस पॅक बोटांनी काढून टाकण्याचा प्रयत्न करा. काढून झाल्यावर तुम्हाला त्या फेसपॅक सोबत चेहऱ्यावरील केस सुद्धा निघताना दिसतील. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवून टाका. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.
फेसपॅकचे फायदे
या पॅकच्या मदतीने चेहऱ्यावरील केस काढले जातात. याशिवाय, त्यात तांदळाचे पीठ आणि बेसन टाकले जाते, ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ होण्यास मदत होते. याशिवाय, हळदीमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म आहेत, जे त्वचेला सुधारण्यास मदत करतात. दूध नैसर्गिक क्लिन्झर म्हणूनही काम करते आणि काळे डागही दूर करते. त्याचबरोबर चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने अनेक फायदे होतात .