Twinkle Khanna Hair Hack : तुमचे सौंदर्य तुमच्या केसांवर अवलंबून असते. त्यासाठी आपण शॅम्पू, कंडिशनर, सिरम, हेअर स्पा, हेअर कटिंगची मदत घेतो. पण, त्यामुळे अनेकदा केस तुटतात, गळतात किंवा केसांची वाढच होत नाही. पण, अलीकडेच ५१ वर्षाच्या अभिनेत्री ट्विंकल खन्नाने तिच्या जाड, चमकदार केसांचे रहस्य सांगितले आहे; जे कदाचित तुम्हालाही थक्क करून जाईल.
ट्विंकल खन्नाचे दाट, चमकदार केस अनेकांना आवडतात. ट्विंकल खन्नाच्या मते, सलूनमध्ये गेल्यामुळे केस सुंदर, चमकदार दिसू लागत नाहीत. तर, लहानपणापासूनच त्यांची काळजी घ्यावी लागते. अभिनेत्री ट्विंकल महागडे सिरम किंवा लक्झरी हेअर स्पा करीत नाही. तर, तिच्या केसांच्या सौंदर्यामागील रहस्य थेट तिच्या स्वयंपाकघरात दडलेले आहे. तसेच, तिची आई डिंपल कपाडिया यांच्या सौंदर्यापासूनही तिला प्रेरणा मिळालेली आहे.
‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका ट्विंकलने इन्स्टाग्रामवर याबद्दल काही टिप्स शेअर केल्या आहेत…
ट्विंकल खन्ना तिच्या डोक्याला (टाळूला) फ्रिज म्हणते. कारण- तिच्या घरगुती केसांसाठी लागणारे सगळे पदार्थ तिला फ्रिजमधूनच मिळतात. हेअर मास्कसाठी अभिनेत्री बीअर, दही व अंडी या पदार्थांचा वापर ती करते; जे केसांना खूप चांगल्याप्रकारे पोषण देतात.
१. बीअरममुळे केस बाऊन्सी आणि चमकदार दिसतात.
२. दही केसांना शांत करते आणि आराम देते.
३. अंडी केसांना मजबूत करण्यासाठी आवश्यक ती प्रथिने प्रदान करतात.
पण यादी तिथेच थांबत नाही. तर याबरोबर ती कांद्याचा रससुद्धा केसांसाठी वापरते…
हा उपाय पिढ्यान् पिढ्या भारतीय घरांमध्ये चालत आला आहे. ताज्या कांद्याचा रस टाळूवर मालिश करून, २० मिनिटे केस तसेच ठेवून द्यायचे. नंतर स्वच्छ केस धुऊन टाकायचे. कांद्याच्या रसात सल्फरचे प्रमाण जास्त असते; जे केसांच्या फोलिक्लेसला पुन्हा सक्रिय करण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी मदत करते. त्याचा फायदा असा होतो की, टाळू निरोगी राहते आणि कालांतराने केस जाड होऊ लागतात.
जलद उपायांवर अवलंबून राहण्याऐवजी, ट्विंकल खन्ना घरगुती उपचारांचा मार्ग स्वीकारते. साधेपणावर आधारित सौंदर्य उपाय ट्रेंडचालित टिप्सच्या पलीकडे टिकू शकतात. या उपायांचे श्रेय अभिनेत्री तिच्या आईला देते. पण, ग्लॅमरस उत्पादनांच्या युगात अशा उपायांना जास्त महत्त्व दिले जात नाही. आपण बहुतेक लोक नवीन चमत्कारिक केसांची उत्पादने विकत घेण्याच्या मोहात अडकतो. त्यावेळी ट्विंकलची माहिती आणि उपाय हे लक्षात आणून देते की, कधी कधी सर्वोत्तम उपाय स्वयंपाकघरातच असतात. बीअर, दही, अंडी, कांदे हे पदार्थ दिसायला सामान्य असले तरीही ते ट्विंकल खन्ना आणि डिंपल कपाडिया यांना त्यांचे केस चमकदार, आरोग्यदायी राहावेत ठेवण्यासाठी मोलाचे ठरले आहेत.