What Happens to Your Body if You Eat Chia Seeds for 14 Days: आरोग्याच्या दुनियेत आजकाल ‘चिया सीड्स’ या छोट्याशा बियांच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. बाहेरून छोट्या व साध्या दिसणाऱ्या या बिया शरीरासाठी खूप मोठे काम करू शकतात. तुम्ही नियमितपणे १४ दिवस या बिया खाल्ल्या, तर तुम्हाला नक्कीच त्याचा अंदाज येईल.

हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी सांगितले की, चिया सीड्समध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम व अँटिऑक्सिडंट्स हे घटक शरीराला आतून मजबूत बनवतात. “या बियांतील फायबर आपल्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंना अन्न पुरवते आणि त्यामुळे पचनसंस्था मजबूत राहते,” असे डॉ. सेठी यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या म्हणण्यानुसार, चिया सीड्स त्यांच्या वजनाच्या १२ पट पाणी शोषून घेतात, ज्यामुळे त्या जेलसारख्या होतात. हे जेल पचनक्रिया मंदावते आणि त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही. परिणामी रक्तशर्करा स्थिर राहते आणि वजनावर नियंत्रण मिळविणे शक्य येते.

चिया सीड्स कशा खाव्यात?

डॉ. सेठी यांच्या सल्ल्यानुसार, दररोज दोन टेबलस्पून चिया सीड्स पाणी, दूध किंवा दह्यात भिजवून खावेत. “दह्यात भिजवलेल्या चिया बिया सर्वांत पौष्टिक आणि पचायला सोप्या असतात. तसेच त्याचे सेवन करताना गळ्यात काही अडकण्याचा धोका कमी होतो,” असे त्यांनी सांगितले. या बिया १५ मिनिटांपासून रात्रभर भिजवून ठेवता येतात.

तथापि, डॉक्टरांनी एक महत्त्वाची सूचना दिली आहे “जर तुम्हाला पोट फुगणे (bloating) किंवा IBS ची तक्रार असेल, तर अगदी थोड्या प्रमाणात सुरुवात करा आणि हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा”, असे केल्याने तुमच्या पचनसंस्थेला त्या बदलाला सहज जुळवून घेणे शक्य होईल.

आहारात कशा प्रकारे घ्याव्यात?

चिया सीड्स इतक्या बहुगुणी आहेत की, त्या दही, सॅलड, स्मूदी, सूप, पॅनकेक, ओट्स किंवा नाश्त्यातील कुठल्याही पदार्थात सहज मिसळता येतात.

हार्वर्ड हेल्थनुसार, चिया पुडिंग हा सर्वांत चांगला व आरोग्यदायी पर्याय आहे. त्यासाठी दोन चमचे चिया सीड्स अर्धा कप दुधात किंवा दुग्धजन्य वा वनस्पतीजन्य पदार्थात घालून ते नीट हलवा. ते मिश्रण १५ मिनिटे ठेवून पुन्हा हलवा आणि नंतर ते फ्रिजमध्ये ठेवा. सकाळी त्यावर ताज्या बेरीज, सुकी फळे, दालचिनी किंवा मध घालून या स्वादिष्ट आणि पौष्टिक अशा आहाराचे सेवन करा.

फक्त १४ दिवसांत होणारे बदल :

दररोज चिया सीड्स घेतल्यास पचन सुधारते, कोलेस्ट्राॅल कमी होते, हृदय निरोगी राहते आणि शरीराला आतून स्वच्छता मिळते. तसेच हलके पोट व रक्तशर्करा स्थिर राहून, अधिक ऊर्जा मिळते. अनेकांना फक्त दोन आठवड्यांत फरक जाणवतो.

शेवटी एका वाक्यात या सगळ्याचे सार स्पष्ट करायचे झाले, तर डॉ. सेठी यांचे “फक्त दोन चमचे चिया सीड्स रोज घेण्यामुळे तुम्हाला डॉक्टरकडे लवकर जावे लागणार नाही“ हे वाक्य लक्षात घ्यावे लागेल.